शिवचरित्रमाला - भाग १३६ - मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व

शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापकहोते. पण तेही या स्वराज्याचे प्रजाजनचहोते. राजेपण , नेतेपण आणि मार्गदर्शकगुरूपण या महाराजांच्या वाट्याला आलेल्या भूमिका होत्या. त्या त्यांनी आदर्शपणे पार पाडल्या. सत्ताधीश असूनही जाणत्यांच्या आणि कर्तबगारांच्या पुढे ते सविनय होते. अहंकार आणि उद्धटपणा त्यांना कधीही शिवला नाही.मधमाश्यांप्रमाणे शंभर प्रकारची माणसंत्यांच्याभोवती मोहोळासारखी जमा झाली. त्यांचा त्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे उपयोग केला. यासाऱ्यांना सांभाळण्याचं काम सोपं होतं का ? जिजाऊसाहेब ते काम जाणीवपूर्वक ममतेने आणि मनापासून कळवळ्याने करीत होत्या. माणसांशी वागणं ही त्यांची ' पॉलिसी ' नव्हती. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव होता. सध्याच्या काळात लोकप्रतिनिधित्त्व करणाऱ्या संसदेपासूनग्रामपंचायतीपर्यंतच्या कार्यर्कत्यांनी जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाचा म्हणजेच मातृत्त्वाचाच अभ्यासकरावा. त्या उत्कृष्ट संघटक होत्या. 

शाही धुमाकुळात उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहरात त्या प्रथम राहावयास आल्यावर ( इ. १६३७पासून पुढे) त्यांनी पुण्याभोवतीच्या छत्तीस गावात एकूणच कर्यात मावळात त्यांनी अक्षरश:दारिद्याने आणि हालअपेष्टांनी गांजलेल्या दीनवाण्या जनतेला आईसारखा आधार दिला. आंबीलओढ्याच्या काठावरील ढोर समाजाला त्यांनी निर्धास्त निवारा दिला. बेकार हातांना काम दिले ,काम करणाऱ्या हातांना दाम दिले. प्रतिष्ठीत गुंडांचा सफाईने बंदोबस्त केला. प्रसंगी या अतिरेकी छळवादी गुंडांना त्यांनी ठार मारावयासही कमी केले नाही. उदाहरणार्थ फुलजी नाईक शिळमकरआणि कृष्णाजी नाईक बांदल. यांना शब्दांचे शहाणपण समजेना. त्यांना त्यांनी तलवारीनेच धडादिला. त्यांच्या इतक्या कडकपणाचाही लोकांनी नेमका अर्थ लक्षात घेतला.

लोक जिजाऊसाहेबांच्या पाठिशीच उभे राहिले. कोणीही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला नाही! याच शिळमकर , बांदल आणखीन बऱ्याच दांडगाईवाल्या माणसांच्या घरातील गणगोणानेमहाराजांच्या सांगाती स्वराज्यासाठी बेलभंडार उचलून शपथा घेतल्या. ते महाराजांचे जिवलगबनले. हे सारे श्रेय जिजाऊसाहेबांच्या ममतेला आहे. त्याही अशा मोठ्या मनाच्या की ,चुकल्यामाकलेल्यांच्या रांजणातील पूवीर्चे खडे मोजत बसल्या नाहीत.

जरा पुढची एक गोष्ट सांगतो. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली.अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकरम्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता.जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. अशी ही आई होती.

उद्ध्वस्त झालेलं पुणं आणि परगणा जिजाऊसाहेबांनी संसारासारखा सजविला. पावसाळ्यातचवताळून सैरावैरा वाहणाऱ्या आंबील ओढ्याला त्यांनी पर्वतीजवळ पक्का बंधारा घातला.शेतीवाडीचा खडक माळ करून टाकणाऱ्या आणि जीवितहानी करणाऱ्या या आंबील ओढ्याला त्यांनी शिस्तीची वाहतूक दिली. लोकांना न्याय दिला. शेतकऱ्यांना सर्व तऱ्हेची मदत केली अन् माणसं महाराजांच्या धाडसी उद्योगात हौसेनं सामील झाली.

नुस्त्या घोषणा करून माणसं पाठीमागे येत नाहीत. जोरदार घोषणा ऐकून चार दिवस येतातही.पण पाचवे दिवशी निघूनही जातात. लोकांना भरवसा हवा असतो. त्यांना प्रत्यय हवा असतो.आऊसाहेबांनी मावळ्यांना शिवराज्याचा प्रत्यय आणून दिला. म्हणून मी म्हटलं , की सध्याच्या आमच्या या नव्या हिंदवी स्वराज्यातील निवडून येणाऱ्या अन् न येणाऱ्याही लोकप्रतिनिधींनीजिजाऊसाहेबांच्या कार्यपद्धतीच्या आणि अंत:करणाचा अभ्यास करावा. निवडून आल्यावर पाच वषेर् फरारी होण्याची प्रथा बंद करावी. 


एका ऐतिहासिक कागदात आलेली एक गंमत सांगतो. कागद जरा शिवोत्तरकालीन आहे. पण लक्षात घेण्यासारखा आहे. त्यातील आशय असा तानाजी मालुसऱ्याच्या घरी रायबाचं लगीननिघाले. तो राजगडावर महाराजांकडे भेटायास आला. खरं म्हणजे लग्नाचं आवतण द्यावयासच आला. पण सिंहगड काबीज करण्याच्या गोष्टी महाराजांपुढे चाललेल्या दिसताच त्याने पोराच्या लग्नाचा विचारही कळू न देता , ' सिंहगड मीच घेतो ' म्हणून सुपारी उचलली. ही गोष्टजिजाऊसाहेबांना गडावरच समजली. चांगलं वाटलं. पण थोड्याच वेळात त्यांना कळलं की ,तानाजीच्या घरी लगीन निघालंय. पण तो बोललाच नाही. तेव्हा मी आणि महाराजही तानाजीला म्हणाले , की ' सिंहगड कोंढाणा कुणीही घेईल. तू तुझ्या पोराचं लगीन साजरं कर. 'तेव्हाचं तानाजीचं उत्तर मराठ्यांच्या इतिहासात महाकाव्यासारखं चिरंजीव होऊन बसलंय. तानाजी म्हणाला , ' आधी लगीन कोंढाण्याचं '.

नंतर कोंढाण्याची मोहिम निश्चित झाली. मायेच्या हक्कानं तानाजी आपल्या अनेक मावळ्यांनिशीजिजाऊसाहेबांच्या खाश्या ओसरीवर जेवण करायला गेला. तो अन् सारे पानावर जेवायला बसलेही. अन् तानाजी मोठ्यानं म्हणाला , ' आम्हाला आऊसाहेबानं स्वत:च्या हातानं पंगतीत वाढलं पाहिजे. ' केवढा हा हट्ट. जिजाऊसाहेबांनी चार घास पंगतीत वाढले. वाढता वाढताआऊसाहेब दमल्या. तेव्हा तानाजी सर्वांना म्हणाला , ' आई दमली , आता कुणी तिनं जेवायला वाढायचा हट्ट धरू नका. ' जेवणे झाली. तानाजीसह सर्वांनी आपापली खरकटी पत्रावळ उचलली अन् तटाखाली टाकली.

तानाजीनं निघताना आऊसाहेबांच्या पावलांवर आपलं डोक ठेवलं अन् दंडवत घातला. त्यानेआपल्या डोईचं पागोटं आऊसाहेबांच्या पावलावर ठेवलं. आऊसाहेबांनी ते पागोटं उचलूनतानाजीच्या डोईस घातलं आणि त्याचा आलाबला घेतला. ( म्हणजे त्याच्या कानागालावरून हात फिरवून आऊसाहेबांनी स्वत:च्या कानशिलावर बोटे मोडली) त्याची दृष्ट काढली. 


नंतर तानाजी मोहिमेवर गेला. माघ वद्य नवमीच्या मध्यान्नरात्री सिंहगडावर भयंकर झटापट झाली. तानाजी पडला. पण गड काबीज झाला. तानाजीचं प्रेत पालखीत घालून सिंहगडावरूनराजगडास आणलं आऊसाहेबांना माहीत नव्हतं. कोण करणार धाडस सांगण्याचं ?आऊसाहेबांनी पालखी येताना पाहून कौतुकच केलं. कौतुकाचं बोलल्या. पण नंतर लक्षात आलं ,की पालखीत प्रेत आहे. आऊसाहेबांनी ते पाहून अपार शोक मांडला. या सगळ्या घटनांवरून जिजाबाई समजते. तिची मायाममता समजते. तिचं नेतृत्व आणि मातृत्व समजतं. 


ही हकीकत असलेला कागद कै. य. न. केळकर यांना संशोधनात गवसला.