शिवचरित्रमाला - भाग १०२ - गजान्तलक्ष्मीचे कारंजे

सुरतेवरच्या दुसऱ्या स्वारीनंतर महाराजांना वाटेतच वणी दिंडोरीला मोगली सरदारांनी अडविले. (दि. १६ ऑक्टोबर १६७० या युद्धात महाराजांचा प्रचंड विजय झाला. 

आता 
महाराजांचे लक्ष गेले एका कारंज्यावर. हे कारंजे वऱ्हाडात होते. कारंजे हे अपार संपत्तीचे शहर होते. लाड 'आडनावांची अनेक घराणी. कारंज्यात होती. म्हणून त्याला लाडाचे कारंजे असे म्हणत. अन् या लाडांना कारंज्याचे लाड म्हणत. कारंज्यात व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चाले. इंग्रज ,डच आणि अन्य युरोपीय व्यापारी सुरतेहून खानदेशात आणि वऱ्हाडात मुख्यत: कापसाच्या खरेदीसाठी सतत येत. खानदेशातील नंदुरबार हे शहरही असेच प्रख्यात होते. शिवाय धरणगाव आणि बुऱ्हाणपूरही खूप श्रीमंत होते.

अर्थात सत्ता होती इथं 
औरंगजेबाची. यावेळी बुऱ्हाणपुरास सुभेदार म्हणून होता जसवंत सिंहराठोड. हा जोधपूरचा सरदार. तो महाराजांचा कडवा शत्रू होता आणि औरंगजेबाचा कडवा सेवक होता. अचलपूर उर्फ इरिचपूर येथेही खान-ए- जाम या नावाचा मोगल सरदार फौजबंदहोता. हा सारा नकाशा महाराजांना उत्तम माहीत होता. महाराजांनी पहिला छापा लाडाच्या कारंजावर घालायचे ठरविले. 

तारीख सापडत नाही पण 
महाराज फौजेनिशी (बहुधा पुणे- संगमनेर-विंचूर-आदिलाबाद या मार्गाने) एकदम लाडाच्या कारंज्यावर आले. या क्षणी कारंज्यात उडालेल्या गोंधळ अन् पळापळ चक्रीवादळासारखी झाली. एवढ्या मोठ्या व्यापारी शहराच्या संरक्षणाची व्यवस्था काहीच नव्हती. खान जमानबरोबर लष्कराची छावणी होती. पण ती अचलपूरला जवळजवळ ७० कि. मी. दूर. महाराज कारंज्यात शिरले. त्यावेळी काही इंग्रज व्यापारी आणि दलाल खरेदीसाठी कारंज्यात आले होते. सुरतेतील अनुभवाने शहाणे झालेले हे इंग्रज ताबडतोब मराठी हल्ल्यानेसावध झाले. त्यांनी आपल्या बचावासाठी काय केले त्यांनी स्त्रियांचे कपडे (म्हणजे बहुदा साड्याओढण्या बुरखे इत्यादी असावे) पेहेरले. कारण त्यांना अनुभवाने हे माहीत होते की हे मराठे स्त्रियांच्या वाटेला कधीही जात नाहीत. त्यांचा अपमानही ते कधी करीत नाहीत. या वेषांतरामुळे इंग्रज बचावले. बाकीची व्यापारपेठ मराठ्यांच्या तडाख्यातून सुटली नाही. मोठी संपत्ती नक्की आकडा माहीत नाही) मराठ्यांनी मिळवली. 

या हल्ल्याची बातमी 
खान जमानला अचलपुरात समजली. तो अजिबात डगमगला नाही. आपली फौज घेऊन कारंज्याकडे अगदी शांत आणि संथपणे तो निघाला. कारण मराठ्यांचापाठलाग करण्याचेही पुण्य मिळवायचे आणि मराठ्यांशी मारामारी करण्याची अवघड भानगडही टाळायची असा त्याचा दूरदशीर् मनसुबा होता. मराठ्यांची गाठच पडणार नाही अशा वेगाने तो येत होता. आला. पण त्यावेळी मराठे घ्यायचे तेवढे घेऊन केव्हाच पसार झाले होते. 

महाराजांची इच्छा 
बुऱ्हाणपुरावरही छापा घालण्याची होती. पण जसवंतसिंह तेथे होता. तो कडवा प्रतिकार करील अन् बुऱ्हाणपुरातून त्यामुळे आपल्याला फार काही मिळणार नाही असा व्यापारी हिशेब करून महाराजांनी बुऱ्हाणपुरावर न जाता नजीकच्या बहादुरपुऱ्यावरच फक्त छापा टाकला आणि मिळाले तेवढे घेऊन महाराज परतले. कारण बुऱ्हाणपूर जिंकणे हा काही महाराजांचा हेतू नव्हता. 

महाराजांना संपत्ती हवी होती. 
म्हणून ते मोगली श्रीमंत ठाण्यांवर हल्ले चढवीत होते. यावेळी त्यांनी उत्तर खानदेशातील किंवा पश्चिम वऱ्हाडातील एकही किल्ला किंवा मोगली ठाणी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला नाही. 

हा पैसा त्यांना कशाकरता हवा 
होता तो हवा होता स्वराज्याच्या सर्वांगीण बळकटीसाठी. भावीआक्रमणांना तोंड देण्यासाठी. युद्धसाहित्यासाठी आणि लष्करासाठी. महाराजांना कोण परत पाठवणार होतं मोठेमोठे व्यापार उभारून स्वराज्यासाठी पैसा मिळवावा तर एवढा वेळ आणिस्वस्थता नव्हती. याच श्रीमंत शहरातील हे श्रीमंत व्यापारी दिल्लीहून बादशाहाने खूण केली तरी सक्तीचे नजराणे पाठवीत होते. मग महाराजांनीही पण असेच सक्तीचे नजराणे स्वराज्यासाठी वसूल केले तर काय हरकत होती. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि खंडण्याघेतल्या. म्हणून का रागवायचे हीच सुरत महाराजांच्या आधी पोर्तुगीजांनी लुटली. तेव्हा किंवा नंतरही कोणी काहीही बोलले नाही. 

या 
लुटीचीही शिस्त आणि कडक नियम महाराजांनी घालून दिलेले होते. गडगंज श्रीमंतांकडूनच ते त्यांच्या संपत्तीच्या प्रमाणात म्हणजे तीन टक्के किंवा पाच टक्के अशा पद्धतीने खंडणी मागत. तीमिळाली की पावत्या देत आणि ग्वाही देत की आम्ही पुन्हा तुमच्याकडे खंडणी मागणार नाही. 'लूट या शब्दाचा अनेकांनी जाणूनबुजून बदनामी करण्याकरिता हवा तो अर्थ लावला. मोगली आणि त्यापुढील निरनिराळ्या सुलतानांनी पोर्तुगीजांनी हबश्यांनी आणि पाळीव पेंढाऱ्यांनी महाराष्ट्राची वेळोवेळी अक्षरश: बेचिराख धूळधाण उडवली त्याबद्दल कोणीही बोलत नाही. खरे म्हणजे या सर्व गोष्टींचे मोल स्वराज्याच्या अर्थकारणात आहे. त्याचा अभ्यास झाला पाहिजे.