शिवचरित्रमाला - भाग ८६ - जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात

आरडाओरडा किंकाळ्या गर्जना यांचा एकच कल्लोळ गडावर उसळला.सुस्तावलेल्या अन् गाढ झोपलेल्या अन्जागती गस्त घालणाऱ्या त्या मोगलीसैन्यावर एकदम धगधगते निखारे येऊन पडावेत असा हा तानाजीचा हल्ला होता. इथे मावळ्यांच्यामध्ये जबर इर्षा होती. आत्मविश्वास होता. आपण जिंकरणारच. पण जर समजा कच खाल्ली तर आपल्याला पळून जायलाही वाट नाही. आपण लढलंच पाहिजे जिंकलंच पाहिजे नाहीतर मेलंच पाहिजे पुन्हा असा डाव खेळताच येणार नाही अन् जगून किंवा मरूनही हे पराभवाचं तोंड महाराजांना अन् जिजाऊसाहेबांना दाखवायचं कसं ?पण असला कसला विचारही कोणाच्या मनात येत नव्हता. उदयभानला त्याच्या वाड्यात हा भयंकर हल्ला अकस्मात समजला. इतकी दक्षता घेऊनही हे मराठे गडावर आलेच कसे ,पोहोचले कसे हा सवाल आता व्यर्थ होता. उदयभान ढाली तलवारीनिशी धावला. यावेळी मोगली सैनिकांनी मशाली पेटवल्या असतील का शक्यता आहे. 

अन् प्रत्यक्ष गदीर्त 
उदेयभान आणि तानाजी घुसले. या अचानक हल्ल्याचा मोगली सैन्यावरनक्कीच परिणाम झाला. बराचसा गोंधळ अन् थोडीफार घबराट. युद्ध कडकडत होते. त्यातच उदयभान आणि तानाजी अचानक समोरासमोरच आले आणि घावावरती घाव एकमेकांवर कोसळू लागले. ही झटापट किती वेळ चालली असेल काही सांगता येत नाही. पण प्रत्येक क्षण जगण्या मरण्याच्या तराजूची पारडी खालीवर झुलवीत होता. कुणी कोणाला रेटू शकत नव्हता. कुणी हटतही नव्हता. तेवढ्यात उदयभानचा तलवारीचा कडाडून कोसळलेला घाव तानाजी सुभेदारांच्या ढालीवर पडला. अन् ढालच तुटली. केवढा कल्लोळ! त्याही स्थितीत डोईचं मुंडासं तुटक्या ढालीच्या हातावर घेऊन अन् कमरेचं पटकुरं त्या हातावर गुंडाळीत तानाजी एकांगी लढतहोता. उदयभानला जबर हर्ष झाला असेल की खासा गनीम आता क्षणाक्षणात मारतोच. तो वारावर वार तडाखून घालू लागला. तेवढ्यात ढाल तुटलेल्या हातावर घाव पडला. अन्तानाजीचा हातच तुटला. तरीही रक्त गाळीत उजव्या हातातल्या तलवारीने तो झुंजतच राहिला. दोघंही एकमेकांवर घाव घालीत होते. या क्षणी तानाजी काय ओरडत असेल उदयभान काय ओरडत असेल इतिहासाला माहीत नाही. पण नक्की गर्जत असतील. अन् एका क्षणी तराजूची पारडी हेलकावली. उदयभानचा तानाजीला अन् तानाजीचा उदयभानला कडाडून धारेचा तडाखा बसला आणि दोघंही भयंकर जखमी किंबहुना मृत्युच झेलीत एकाचवेळी भुईवर कोसळले.दोघेही ठार झाले. अन् ही गोष्ट अवतीभवतीच्या चार मावळ्यांना दिसली. अन् ते गोंधळलेच. खचलेच. अन् ओरडू लागले. सुभेदार पडिले सुभेदार पडिले! पळा. अन् हाहा म्हणता सुभेदार पडल्याचा रणबोभाट झाला. बरेचसे मावळे धीर खचून ज्या कड्यावरून दोराने ते चढून आले होते त्या दिशेला धावत सुटले कड्यावरून उतरण्यासाठी वास्तविक उदयभानही पडला होता ना! पण ती वेळ अशी होती ती सांगता येत नाही. ती वेळ यमाची. ती वेळ जिवाच्यामायेची. मावळे ओरडत धावत होते. गदीर्त झुंजत असलेल्या सूर्याजी मालुसऱ्यानं हे पाहिले ,ऐकलं. त्यानं ओळखलं अन् तो त्याच दोरांच्याकडे ताडताड धावत सुटला. पोहोचलाही अन्त्याने गडाखाली सोडलेले दोर जे लोंबत होते ते तलवारीच्या घावानं ताडताड तोडायला सुरुवात केली. तोडले. अन् तसाच तो वळून पळू पाहणाऱ्या मावळ्यांवर ओरडला , ' पळतायभेकडांनो तुमचा बाप इथं झुंजता झुंजता पडला अन् तुम्ही कुठं पळताय थू तुमच्या जिनगानीवर. हे थोबाड कुणाला दाखविणार आहात अरे तुमी कोणाची माणसं महाराजांचीपळता फिरा माघारी! अन् सूर्याजीनं एकच गर्जना केली. हर हर हर हर महादेव पळते होते ते फिरले. सूर्याजीने अन् सर्वांनीच मोगलांच्यावर कडाडून फेरहल्ला चढविला तो त्या सर्वांच्या दोन हातात जणू आठआठ हातांच्या भवानीचं बळ अवतरल्यासारखाच. या भयंकर हल्ल्यात मोगलांची दाणादाण उडाली. गड मराठ्यांनी जिंकला. 

असा हा 
इतिहास. जो सिंहगड पूवीर् आणि नंतरही प्रतिर्स्पध्याशी महिनोन महिने झुंजली. पण हार गेला नाही. तो अजिंक्य गड एका अचानक गनिमी छाप्यात तानाजी सूर्याजी आणि सर्वमावळे यांनी जीव पणाला टाकून फारतर दीडदोन तासात जिंकला. गडावरच्या तोफा मुकाट होत्या. मराठ्यांवर एखादीही तोफ उडविण्याची संधी अन् अवसर मोगलांना मिळाला नव्हता. शत्रूच्या तिप्पट फौैजेचा कमीतकमी वेळेत अन् कमीतकमी शस्त्रांंनिशी पूर्ण पराभव मराठ्यांनीकेला. हे या असामान्य लढाईचंं असामान्य महत्त्व. 

काल्पनिक 
कादंबऱ्या कथा पोवाडे अन् अख्यायिका यांच्या गुंतागुंतीतून सत्य शोधीत शोधीतआपण इथपर्यंत निश्चित येऊन पोहोचतो की सूर्याजी मालुसऱ्यानं आणि त्याच्या मावळ्यांनी एक फार मोठा राष्ट्रीय मोलाचा धडा रक्तानी लिहून ठेवला की नेता पडला तरी झुंजायचं असतं.जिंकायचं असतं. सेनापती पडला तरीही! अन् खासा राजा पडला तरीही! हा शिवाजीराजांनी घालून दिलेला आखाडा आणि आराखडा सूर्याजीनं प्रत्ययास आणून दिला नाहीतर आमची रीत अशी की नेता सेनापती किंवा राजा पडला की सर्वांनी पळत सुटायचं. 

महाराजांना केवढं दु:ख झालं असेल 
याची तुलना सांगायला तराजूच नाही. त्यांच्या तोंडून उद्गार निघाले ते आज शिलालेखासारखे इतिहासात कोरले मात्र गेले आहेत. माझा एक गड आला पण माझा दुसरा गड गेला. '