शिवचरित्रमाला - भाग ९२ - हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड

रायगड किल्ला हा तत्कालीन लष्करी दृष्टीने अभ्यास करण्यासारखा किल्ला आहे. एखाद्या ताटात भाताची मूद ठेवावी तसा हा सर्व बाजूंनी अलिप्त असा डोंगर आहे. रायगड सह्यादीचा पराक्रमी पुत्रच आहे. रायगडाची प्रत्येक दिशा केवळ अजिंक्य आहे. भिंतीसारखे ताठ सरळ कडे पाहिले कीअसं वाटतं हा गड आपल्या अंगावर येतोय. पावसाच्या दिवसांत अन् त्यातल्यात्यात आषाढी पावसांत रायगड चढून जाणं हा एक अघोरी आनंद आहे. आषाढी ढगांची फौज गडाला गराडा घालून तांडव करीत असते. कधीकधी त्यातच वादळ घुसते अन् मग होणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट आपण कधी अनुभवला आहे का वेळ दिवस मावळण्याची असावी हे सारं थैमान सुरू झालेलं असावं अन् आपण गडावरच्या नगारखान्याच्या उत्तुंग माथ्यावर उभे असावं.

रणवाद्यांचा बेताल 
कल्लोळ शिंगतुताऱ्यांचा आणि शंखांचा अचानक आक्रोश रुदवीणांच्या तारा तुटाव्यात असा विजांचा सणाणत सणाणत उठणारा चित्कार पावसाच्या भयंकर वर्षावात डोळे उघडता येत नाहीत पण उघडले तर अवतीभवतीचा तो महाप्रलय कल्लोळ भयभयाट करीतआपल्याला गदागदा हलवत असतो. तो प्रलयंकाल महारुद क्षुब्ध सहस्त्रशीर्ष दुगेर्श शिवशंकर आणि सर्व संहारक चंडमुंडभंडासुरमदिर्नी उदंडदंड महिषासुरमदिर्नी महाकालिका दुर्गाभवानीभयंकर रौद तांडव एकाचवेळी करीत आहेत असा भास व्हायला लागतो. कभिन्न अंधार वाढतच जातो. रायगड हे सारं तांडव आपल्या खांद्यावर आणि मस्तकावर झेलीत उभा असतो. अन् त्याही भयानक क्षणी आपल्याला वाटायला लागतं अर्जुनाला दिसलेलं कुरूक्षेत्रावरचं ते भयप्रद दर्शन यापेक्षाही किती भयंकर असेल! 

असा हा 
पावसाळ्यातला रायगड कोण जिंकायला येईल अन् बिनपावसाळ्यातला रायगडतरी तेही अशक्यच. शिवाच्या भोवती तांडव करणाऱ्या त्याच्या भूतप्रेत पिशाच्च समंधादि भयंकर शक्ती मावळ्यांच्या रुपानं रायगडावरती असायच्याच ना 

अशा 
रायगडात प्रवेश करण्याची कोणा दुष्मनाची हिंमत होती रायगडात प्रवेश करणं शत्रूला अशक्य होतं. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच शत्रूला रायगडावर प्रवेश मिळणं अशक्य होतं. 

या 
रायगडावर शिवाजीमहाराजांनी राजधानी आणली. हिरोजी इंदुलकरासारखा कुशलबांधकामगार महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला. हिरोजी कामाला लागला. रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं. गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले. महादरवाजा चित्ता दरवाजा ,नाणेदरवाजा वाघ दरवाजा अन् अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला. तीन मनोरे रूप घेऊ लागले. नगारखाना सातमाडी महाल पालखी दरवाजा मेणा दरवाजा शिरकाई भवानीचं देऊळ कुशावर्त तलाव गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरूलागले. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली. मधे रस्तासमोर दुसरी रांग. जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं. असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी अन् नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिराजीने सजवला. 

केवळ राजधानीचा 
किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्याबांधणीबाबतीत नव्हती. तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिराजीनं दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे. गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिराजीने खानदानी पडदा सांभाळून केली. या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत , ' झनानखाना किंवा दरुणीमहाल किंवाहरमखाना '. पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत राणीवसा या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला. त्याचं नाव मेणादरवाजा. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली. भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा- सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता वा राजकीय चर्चा करण्याकरता बसावं अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे.

दिवे लावण्याकरता सुंदर कोनाडे 
आहेत. झरोक्यांवर पडदे सोडण्याकरता गोल कड्याही ठेवल्या आहेत. आबदारखाना फरासखाना शिलेखाना जिन्नसखाना दप्तरखाना जामदारखाना ,मुदपाकखाना इत्यादी सारे महाल दरख आणि कोठ्या गडावर बयाजवार होत्या. रात्री सगळीकडे दिवेलागण व्हायची. नगारखाना कडकडायचा. सनईचे सूर कोकणदिव्याला साद घालायचे. गडाचे सारे दरवाजे कड्याकुलुप घालून बंद व्हायचे. तोफ उडायची. गस्तीच्यापाहरेकऱ्यांच्या आरोळ्या लांबून लांबूनही उठायच्या. मशाली पेटायच्या. अन् सारे व्यवहार तेवढ्या प्रकाशात गडावर चालायचे. देवघरात अन् राजवाड्यात उदाधुपाचे अन् चंदनाचे सुगंधदरवळायचे. अन् देवघरात जगदंबेची आरती निनादायची. असा रायगड डोळ्यापुढं आला की मन फार सुखावतं. आजचा उद्ध्वस्त भकास आणि आम्ही लोकांनीही सिगरेटची थोटकं दारुच्यारिकाम्या बाटल्या अन् खरकटे प्लॅस्टिकचे कागद आणि पिशव्या अस्ताव्यस्त फेकून अन् ठिकठिकाणी भिंतींवर आपली नावं लिहून विदुप केलेला गड पाहिला की स्वत:च्याच मनाला सुरूंग लागतो. त्याच्या चिंधड्या उडतात. अन् वाटतं , ' तुझ्या विछिन्न रूपाला पाहुनि फाटतो ऊर. '