शिवचरित्रमाला - भाग ४३ - क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील

शाहिस्तेखानवरच्या छाप्याच्या बातम्या औरंगजेबास तपशीलवार समजल्या. त्याचा संताप वाढतही राहिला. आता या सीवाच्याविरुद्ध नेमके कोणते पाऊल टाकावे याचा विचार तो करीत होता तेवढ्यात सुरतेवरती महाराजांचा छापा आणि सुरतेची बदसुरत कशी झाली आहे याचाही तपशील त्याला दिल्लीत समजला. त्याच्या संतापात भर पडली. पण अभ्यासात भर पडलेली दिसत नाही. या सगळ्याच मोगलांचा अभ्यास अगदी शून्य वाटतो. खूप मोठं सैन्य तोफखाना खजाना हत्ती आणि अफाट युद्धसाहित्य याच गोष्टींवर या दिल्ली दरबारचा प्रचंड विश्वास होता. मराठ्यांवर नवी मोहिम काढायची म्हणजे या सर्व सार्मथ्यात आणखी वाढ करायची हाच यांचा अभ्यास आणि निर्णय. 'शिवाजी हे प्रकरण औरंगजेबास कधीच समजले नाही. 

खरोखर 
शिवाजी हे प्रकरण आजही २१ व्या शतकात जर खरंच समजले तर काय होईल ?पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले , ' जगाच्या पाठीवर जर कोणाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल आणि ते बळकट अन् समृद्ध करायचे असेल तर (त्या राष्ट्राने वा समाजाने) छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्राचा अभ्यास (अन् अनुकरणही) करावयास हवे. 

प. नेहरू यांनी या पूर्ण आशयाचे उद्गार 
नागपूर येथे धनवटे बिल्डींगवर शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले त्या प्रसंगी काढले. 

महाराज सुरतेहून निघाले. सह्यादीचा घाट 
चढून ते नासिक जिल्ह्यात पोहोचले. तेथून घाटमाथ्याने राजगडकडे निघाले. 

याच काळात म्हणजे दि. २ 
जाने. १६६४ रोजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे हे कर्नाटकात शिमोग्याजवळ होदीगेरी या ठिकाणी घोड्यावरून दौडत असता अपघात होऊन पडले. मृत्यूपावले. ही दु:खद खबर दि. ५ फेब्रु. १६६४ यादिवशी राजगडावर पोहोचली. 

थोडासा तपशील असा 
महाराज सुरतेच्या लुटीसह फेब्रुवारी प्रारंभी लोणावळ्याच्या पुढे पोहोचले. तेवढ्यात (बहुदा फेब्रुवारीस) महाराजांना छबिन्याच्या हशमांनी पुण्याकडची खबर कळविली असावी की मोगलांची फौज पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने येत आहे. महाराजांनी ताबडतोब सर्व लूट नेताजी पालकरांबरोबर शेजारच्याच लोहगडावर सुरक्षिततेकरिता पाठविली. मोगल अंगावर येत आहेत हे पाहून महाराजांनी वडगावजवळ मोगलांची वाट अडविण्याकरिता नारो बापूजी देशपांडे नऱ्हेकर या आपल्या सरदारांस सांगाती सैन्य देऊन पाठविले. महाराज उरवडे घोटवडे तव मुठाखिंड मोसे पानशेत खामगांव खिंड या राजगडमार्गाने पुढे गेले. वडगांवपाशी नारो बापूजी देशपांडे याच्या सेनेची मोगलांशी गाठ पडली. या लढाईत नारोबापूजी ठार झाला. पण मोगलांना काहीच साध्य झाले नाही. शिवाजीराजे राजगडकडे गेले लूट लोहगडावर बंदोबस्तात पोहोचली. 

महाराज 
खामगावाजवळ पोहोचले. तेथून दक्षिणेस राजगड सुमारे २० किलोमीटरवर आहे.राजांना शहाजीमहाराजांच्या अपघाती मृत्यूची बातमी येथेच समजली. सुरतेची स्वारी यशस्वी झाली नियतीने मात्र वडिलांच्या प्राणावर आघात करून त्यांना दु:खात लोटले. 

अत्यंत 
तातडीने महाराज राजगडावर पोहोचले. तेथे आणखी एक भयंकर दु:खाने भरलेले ताट नियतीने वाढून ठेवलेले होते. मातु:श्री जिजाबाईसाहेब या सती जाण्याच्या तयारीत होत्या. वडील गेले आता आईपण निघाली. प्रयत्नांची शिकस्त करून महाराजांनी शथीर्ने आऊसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त करण्यात अखेर यश मिळविले. आऊसाहेब थांबल्या. 

हा सारा 
प्रचंड कल्लोळ आयुष्यभर महाराजांच्या भोवती चितेसारखाच ज्वाला नाचवीत होता. प्रत्येक प्रसंगाला ते तोंड देत होते. 

महाराजांना कोणाची मदत 
होती कोणाचीही नव्हती. तापी-नर्मदेच्या उत्तरेला अवघा हिंदुस्थान मोगलांची सेवा करीत होता. राजपुतांच्याकडे मदतीच्या अपक्षेने पाहण्याची सोयच नव्हती. याच राजपुतांच्या जीवावर औरंगजेबाचे राज्य सुरक्षित होते. 

पण इथेच 
शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याच्या तत्त्वज्ञानातील एक महान तत्त्व सतत टवटवीतपणे बहरत होते. स्वावलंबन. कोणावरही अवलंबून न राहता स्वराज्याच्याच बळावर स्वराज्याचाचविचार विस्तार आणि समृद्धी करायची हे महराजांचे महान तत्त्व होते. 

अजूनही पुण्यात मोगल छावणी होतीच. 
शाहिस्तेखान आसाम-बंगालच्या सुभेदारीवर ढाक्याकडे निघून गेला होता. पण पुण्यात छावणी कायम होती. सिंहगडाला जसवंतसिंह याने घातलेला वेढा अजून चालूच होता. महाराज मोगलांच्या पोटात सुरतेपर्यंत गेले आणि लूट घेऊन परत आलेसुद्धा याचा या जसवंतसिंहाला पत्ताच नव्हता. अगदी उघड आहे. तसा पत्ता त्याला असतातर त्याने महाराजांना सिंहगडाच्या पश्चिमेलाच अडवले असते. जाऊच दिले नसते. निदान परतीच्या वाटेवर महाराजांना त्याने राजगडाकडे येऊच दिले नसते. पण त्याला कशाचाही पत्तानव्हता. यातच मोगलांची ठिसूळ लष्करी स्थिती दिसून येते. यालाच मी अभ्यासशून्य मोगलाई 'असे म्हणतात. 

गेल्या १८ 
वर्षांत (इ. १६४६ ते १६६४ स्वराज्याच्या शत्रूंना कुठेच यश मिळाले नाही. महाराजांचे काही तुरळक पराभवही झाले. उदाहरणार्थ चाकणची लढाई. पण यातून शत्रूनी कोणताच ठोस अभ्यास केलेला दिसत नाही. अन् महाराजांचा अभ्यास थबकलेलाही दिसत नाही. या काळात काही लढाया ते हरले पण सर्व युद्ध जिंकली. लढायांमुळे अखंड अशांतता स्वराज्यात होतीच की. पण स्वराज्यातील नागरिकांनीही आपले शेतकरी जीवन आणि बलुतेदारी कुठेहीढासळू दिली नाही. मांजर उंचावरून पडले तरी जमिनीवर पडताना ते चार पायांवरच उभे पडते. स्वराज्यही असेच मांजराच्या कुशलतेने आणि कोल्ह्याच्या कौशल्याने सह्यादीच्या कुशीत जगत होते.