बहलोलखान पठाणाने आपली फौजप्रतापरावांच्या गराड्यावर सोडली.मराठ्यांची कोंडी फोडण्याकरता बहलोलची फौज मराठ्यांवर निकराने तुटून पडली. मराठ्यांनी शाही फौज अचूक कोंडली होती. बाहेर पडायला शत्रूला वाट मिळेना , फट मिळेना बहलोलचे सारे हल्ले मराठ्यांनी परतवून लावले. फौज पुन्हा कोंडली गेली. सूर्य माथ्यावर तळपत तळपत चढत होता.पाणी ? जर आपण लौकरात लौकर यागळफासातून बाहेर पडलो नाही तर पाण्यावाचून मरायची वेळ येणार आहे , हे बहलोलला समजत होते.
त्या मानानं प्रतापरावांचे सैनिक सुखरूप झुंजत होते. त्यांना पाणी मिळण्याच्या वाटा आणि ती चिमुकली डोण नदी मोकळी होती. खरोखर प्रतापरावांनी या बहलोली सैन्याला गराडा टाकण्याच्या वेळीच जर झोपेतच त्यांच्यावर घाव घालून तोडातोडी केली असती , तर तासा दीड तासातच हे युद्ध रावांनी जिंकलं असतं. पण शाही फौजेला मराठी तडाखा दाखविण्यासाठी राव शिकारीसारखा खेळ मांडून बसले होते.
एक दिवस उलटला , दोन दिवस उलटले , तीन-चार- पाच तरीही कोंडी फुटत नव्हती. मराठेहटत नव्हते. बहलोलची अवस्था व्याकूळ झाली होती. विजापुराहून मदत मागवावी , तरीही अशक्य होतं. रस्तेच मराठ्यांनी बंद करून टाकले होते. यावेळी मोगलांचा सरदार खानजहानबहाद्दूर बहाद्दूरखान कोकलताश हा मिरजेपाशी होता. त्याने बहलोलच्या मदतीस नव्हे , पण मराठ्यांच्या विरुद्ध हल्ला करण्याकरता एकदा चाल केली. पण मराठ्यांनी त्याचा हल्लापाचोळ्यासारखा उधळून लावला. तो पुन्हा आलाच नाही.
वैऱ्यावरही येऊ नये अशी वेळ बहलोलवर येऊन पडली होती. पाणी नाही , पाणी नाही.
आता पाण्याविना बहलोलची घोडी तडफडू लागली. मरू लागली. पाणी नाही. आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार! अपुरे पाणी किती पुरविणार ? पाणी होते. पुरेपूर होते , ते फक्त मराठ्यांच्या तलवारीत.
पंधरा दिवस उलटले. बहलोेलची काय अवस्था झाली असेल ? त्याची तर अशी उमेद होती की, कोल्हापूर अन् पन्हाळा तर जिंकतोच , पण कोकणातही उतरतो. अन् दर्यावर आदिलशाहीचा शाही शिक्का उमटवतो. पण पाणीच नाही.
वीस दिवस उलटले. बहलोलची जनावरेच काय पण आता माणसेही पाण्यावाचून तडफडू लागली.
यावेळी महाराज शिवाजीराजे पन्हाळगडावरच होते. त्यांना नितांत खात्री होती की , माझा डाव फत्ते पावणार. शत्रूचे डंके आणि झेंडेच काय , पण प्रत्यक्ष शत्रूच्या सरदारांना आणि सेनापतीला ही आमचे राव गिरफ्तार करतील. कब्जात घेतील.
प्रतापरावांना समोर दिसणारी बहलोलची पाण्याविना दाणादाण समजत होती. पण सेनापतीच्या कठोर मनानं ते शत्रू सैन्याचा सर्व बाजूंनी गळा आवळून उभे होते.
हा इतिहास म्हणजे केवळ योगायोग का ? केवळ नशीबाचा खेळ का ? गेली तीनशे वर्ष सुलतानांच्या गुलामगिरीत केविलवाणे कण्हत अन् रडत मराठी माणसं जगत होती. पण आपल्या मनगटाच्या बळावर आज मराठी माणसं अशी जिद्द गाजवीत होती. महाराजांनीच त्यांना शिकवलं होतं की मनात आणा , तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. अफगाणिस्तानातल्या एका नामवंत पठाणाला एका मराठी प्रतापवंताने चिमट्यात पकडले होते. आता आपले होणार तरी काय , हेबहलोलला समजत नव्हते. उभी असलेली माणसं त्याच्या डोळ्यादेखत पाणी पाणी करीत कोसळत होती. उंटांच्या पोटातही पाणी उरले नव्हते.
प्रतापराव या साऱ्या पठाणी फौजेची कत्तल करणार होते का ? त्यांनी तशी शत्रूची कत्तल करावी असे महाराजांना वाटत होते का ?
नाही! ती मराठी संस्कृतीच नव्हती. पण शत्रूचे सेनापती मराठी झेंड्याच्या पायाशी शरण यावेत ,त्यांनी या झेंड्याच्या सावलीत खुशाल जगावं , शत्रूत्त्व सोडावं , स्वराज्याची सेवा करावी अशीचमहाराजांची इच्छा आजपर्यंत दिसून आली नव्हती काय ? इथं या उमराणीच्या रणांगणावर शत्रूचा सेनापती हा शरण येऊन आपल्या पुढे दाखल व्हावा हीच इच्छा महाराजांची होती.
महाराज त्या विजयाच्या वार्तेची वाट पाहात होते. आणि मग ?