शिवचरित्रमाला - भाग ६५ - मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था

राजकारणाचा खेळ हा आट्यापाट्यांच्याखेळाइतकाच सावधपणानं खेळावा लागतो. शिवाजीराजे आता आग्ऱ्याच्या कैदेतला हा खेळ आट्यापाट्यासारखाच अत्यंत सावधपणे आणि बुद्धिबळाइतक्याच प्रतिभेने खेळत होते. त्यांचे चौफेर सर्व क्षितिजांपर्यंत लक्ष आणि कान टवकारलेले होते. 

महाराजांना आता पहिला मोठा प्रेमाचा
अडसर आडवा येत होता तो रामसिंहाचा.कारण रामसिंहाने जमानपत्र बादशाहाला लिहून दिलं होतं. त्यामुळे जोपर्यंत जमानपत्र अस्तित्त्वात आहे तोपर्यंत रामसिंहाच्या जिवाच्या सुरक्षिततेची काळजी आता महाराजांना वाटत होती. पण स्पष्ट शब्दांत ते बोलूही शकत नव्हते. ते स्वत:ही रामसिंहाला वचन देऊन बसले होते. या काळात मिर्झाराजाचीही मुलाला म्हणजे रामसिंहाला दोन-तीन पत्रे आलीच की , ' तू काळजी घे. 

औरंगजेबाने 
एके दिवशी अगदी सहज सुभेदार फिदाई हुसेन खान याला म्हटले की , ' फिदाई ,तुझ्या हवेलीचे जे बांधकाम चालू आहे ते लवकर पुरे कर. 

फिदाई 
हुसेन खान हा एक अतिशय सरळ सज्जन पण कर्तबगार माणूस होता. तो आग्रा सुभ्याचा सुभेदार होता. त्याची स्वत:ची एक भव्य हवेली यावेळी तो बांधत होता. औरंगजेबाच्या डोक्यातअसा डाव घाटत होता की ही त्याची हवेली बांधून पूर्ण झाली की त्या हवेलीत अचानक शिवाजी-संभाजीराजे यांना चांगल्या जागी राहण्यासाठी नेऊन ठेवायचे. अगदी कडक बंदोबस्तात. अन् मग तिथेच खोटी नाटी कारणे सांगून राजांना मारून टाकायचे. हा पाताळयंत्री डाव इतर कोणालाही माहिती नव्हता. खुद्द फिदाईलाही तो माहित नव्हता. औरंगजेबाने आता एकमेव लक्ष केंदित केले होते या हवेलीच्या बांधकामावर. ते बांधकामही झपाट्याने चालू होते. 

इथेच औरंगजेब चुकला. आपल्या 
या हवेलीतील हवेशीर राजकारणाच्या पलिकडे तो सीवा आणखीन काही भयंकर डावपेच आखीत असेल याची पुसटशीही कल्पना औरंगजेबाला आलीनाही. राजकारण कधी आखलेल्या फुटपट्टीच्या रेघेने होत नसते. चाणक्यासारखी माणसे वळसे घेत घेत शेवटी शत्रूचा गळा अचूक आवळतात. महाराजांचं राजकारण नागीणीसारखे वळसे घेत चालू होते. 

महाराजांनी पहिले प्यादे अडीच घरं 
हलविले. दक्षिणेतील माझे सर्व किल्ले म्हणजे सर्व स्वराज्यच की!) मी बादशाहांच्या स्वाधीन करून बादशाह सांगतील ती कामगिरी करणार आहे ,'असा साळसूद आव ते आणीत होते. बोलूनही दाखवत होते. 

आणि 
अचानक एके दिवशी महाराजांची तब्येत बिघडली. कसंसच होऊ लागलं. खरं म्हणजे काहीही होत नव्हतं. हे ढोंग होतं. आपण आजारी असल्याचे ते उत्तम अभिनयाने येणाऱ्या-जाणाऱ्या सरदारांना आणि सिद्दी फुलादखानलाही दाखवत होते. महाराजांचे दुखणे हळूहळू वाढतच होते. म्हणजेच पसार होण्याची बळकट तयारी चालू होती. वैद्य हकीम आणि औषधे यांचीही रहदारी सुरू झाली होती. एकेका दिवसाने नाटक पुढे सरकत होते. 

एके दिवशी महाराजांनी 
बादशाहाकडे आपला अर्ज पाठवला की , ' औषधोपचार चालू आहेत. पण बरे वाटत नाही. तरी गोरगरिबांस व फकिर- गोसाव्यांस दानधर्म करण्याकरिता मिठाईवाटण्याची मला परवानगी असावी. मी मिठाईच्या डाल्या हस्तस्पर्श करून येथून बाहेर पाठवीन. ती मिठाई बाहेर वाटली जाईल. फकीर साधुसंतांचा मला दुवा मिळेल. त्याने तरी मला बरे वाटेल. तरी आपली परवानगी असावी. 

येथे एक आश्चर्याचा धक्का देणारी 
गोष्ट सांगतो. मिठाईचे पेटारे येणार आणि ती मिठाई पुढे वाटली जाणार ही एक अगदी साधी सरळ कल्पना होती. हा अर्ज बादशाहाकडे गेला. आश्चर्य असे की कोतवाल सिद्दी फुलादखानाने या कल्पनेबद्दल शंका व्यक्त केली आणि बादशाहास नम्रतेची सूचना केली की , ' या सीवाला ही मिठाईची परवानगी देऊ नका. मला धोका वाटतो. 

म्हणजे फुलादखानालाही यांत 
चुकचुकल्यासारखे काही वाटलेले दिसते. पण औरंगजेबाला त्यात काहीच वाटले नाही. त्याला शंभर टक्के खात्री होती की सीवा माझ्या कडेकोट कैदेत आहे. अन्लवकरच त्याची रवानगी फिदाईच्या हवेलीत व्हायचीच आहे. बादशाहाचे लक्ष अगदी पोपटाच्या डोळ्याप्रमाणे हवेलीच्या पूर्णतेकडे लागलेले होते. 

एके 
दिवशी महाराजांनी रामसिंहाकडे ६५ हजार रुपये कर्जाऊ मागितले. औरंगजेबाने या कर्ज देण्या-घेण्याला मुळीच आक्षेप घेतला नाही. कारण त्यात औरंगजेबाचे काहीच जाणार नव्हते. त्याचे लक्ष होते फक्त हवेलीकडे. तो हवेलीतली हवा किल्ल्यात बसून खात होता. 

मिठाईच्या 
पेटाऱ्यांची ये-जा सुरू झाली. महाराज हात लावीत होते. पेटारे बाहेर जाऊन मिठाई वाटली जात होती. रामसिंहाकडून घेतलेले कर्ज महाराज अचूक वापरीत होते. 

एक दिवस महाराजांनी 
रामसिंहाला म्हटले की , ' भाईजी माझ्याकरिता तुम्ही जमानतीतअडकलेले. तुम्हाला किती त्रास होतोय. आता तुम्ही बादशाहांना सांगून ही सर्व जबाबदारी काढून घेण्यासाठी जमानतीचा अर्ज रद्द करून घ्या. रामसिंहाला यातील गुप्त डावाची शंकासुद्धा आली नाही. उलट तो नाही नाही महाराज. तुमची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मीजामीन अर्ज रद्द करून घेणार नाही असे निक्षून म्हणाला. त्यामुळे महाराजच अडचणीत अडकले. आता या भोळ्या बिचाऱ्याला मी कसं काय समजावून सांगू खरं बोलायची सोय नव्हती. कारण हा रामसिंह बादशाहाशी निष्ठावंत होता ना! त्या निष्ठेपाई त्यानी उलटाच काही प्रकार केला तर महाराज मधात पडलेल्या माशीसारखे अडकले होते. उडताही येत नव्हते अन् बुडताही येत नव्हते.