स्वत: पूर्ण सावध राहून शत्रूला गाफील बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा पुरेपूर फायदा उठवायचा हा शिवाजीराजांचा डाव. हाच त्यांच्याबुद्धीबळाचा डाव. आपल्या वकीलाच्यामार्फत महाराज खानाला आपल्याचक्रव्यूहात गुंतावित चालले होते. खानाने प्रतापगडच्या पायथ्याशी यायचं मान्य केलं.
खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवर खान यायला कबूल झाला ही खानाची चूकच नाही का ? नाही. खानाला येणंभागच होतं. नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता ? त्याला शिवाजीराजा आपल्या मगरमिठीत हवा होता. त्याकरीता अखेर त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता तरी यावच लागलं असतं. त्याने सरळ विचार केला की , शिवाजी आपल्या भेटीसाठी गडावरून खाली यायला तयार होतोय. म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच , विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय तेही आपल्या फौजेसह. म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हेलक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरविलं.
यात त्याची काहीच चूक नाही. तो चुकला स्वत:च्याच गाफीलपणामुळे. राजकारण ,दारुगोळ्याचं कोठार आणि तपोसाधना यांत किंचितही गाफील राहून चालत नाही. तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो. दारुगोळ्याचं कोठार उडवायला कुठूनठिणगी येईल याचाही नेम नसतो अन् राजकारणात एखादा चाणक्य , कृष्ण किंवा शिवाजीराजा केव्हा समोरच्याला उलथंपालथं करून टाकील याचाही नेम नसतो. खान याबाबतीत अत्यंत बेसावध राहीला. तेही स्वत:च्या मनात शिवाजीराजाचा विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून.
खान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला. राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं अन् विजापुरला न्यायचं हे त्यानं अगदी निश्चित ठरविलं होतं.
या प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले होते. ते प्रतापगडावर राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू पावल्या. (दि. ५ सप्टेंबर १६५९ ) हे दु:ख सामान्य होतं का ? त्यांचा पुत्र संभाजीराजा हा अवघा दोन वर्षाचा होता. जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढीत होती. आईचीचिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती. आईवर कमालीचं प्रेम करणारा हा पुत्र होता.
एक गोष्ट सर्वात चिंतेची होती , ती महाराजांच्यावर अपरंपार पेम करणाऱ्या मावळ्यांच्यामनस्थितीची. हे मावळे महाराजांवर रामायणातल्या हनुमंतासारखे अन् वानरदळासारखे प्रेम करीत होते. त्यांचा महाराजांना प्रथमपासूनच आग्रह होता की , ' महाराज , खानाला जातीने भेटू नका , धोका आहे. तो घात करील या डोंगरदऱ्यात खानाशी आम्ही झुंजतो. वर्षनवर्ष ही झुंजतो. पण तुम्ही त्या आगीत शिरू नका. '
मावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम अलौकीक होते. पण महाराजांचा डाव त्यामुळे अडखळतहोता. शत्रूच्या जास्तीतजास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी , कमीतकमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता. यावर हे सवंगडी म्हणत होते , ' हे जमलियास ठीक. पण न जमलियास कैसे होईल ?'
महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा संघर्षच होता.
आणि महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलंस्वप्नच सांगितलं. महाराजांचे शब्द असे , '' श्री भवानी आमच्या स्वप्नात आली. श्री आम्हांस बोलली की , ' लेकरा , त्याने (खानाने) माझा अपमान केला. त्वा काम काळजीने करावे. तुजला यश लाभेल. मीतर तुझी तलवारच होऊन राहिली आहे. ' श्री आम्हांस प्रसन्न झाली. ''
अन् मग अवघ्यांना पटलेचकी आता यश मिळणार. महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हाअचूक उपयोग. श्रद्धा हे सार्मथ्य आहे. अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही. पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढविण्यासाठी असा उपयोग केला.
महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचे नाव ' भवानी ' असे ठेवले.
खरंच महाराजांना स्वप्नात भवानीदेवी दिसली की ? ती बोलली का ? श्रीचं जाणे! पणस्वराज्यावर आलेलं भयंकर संकट या श्रीवरच्या सश्रद्धेनेच उधळलं गेलं. राज्य वाचलं , राजा वाचला. ध्वज वाचला हे मात्र सत्य. ज्याने त्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा.
मात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व काम अत्यंत सावधपणे , शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होते. खान महाबळेश्वरपर्यंत येऊन दाखल झाला होता.