शाहिस्तेखानाच्या फटफजितीनंतर ,त्याच्याच हाताखालचा सरदार जसवंतसिंह राठोड हा खूप मोठी फौज घेऊन पुण्याशेजारच्याच सिंहगडाला वेढाघालण्यासाठी आला. त्याने गडाला मोर्चे लावले. त्याच्याबरोबर त्याचा मेव्हणा बंुदीमहाराजा भावसिंह हाडा हाही होता. झुंज सुरू झाली.
शाहिस्तेखानाची झालेली फजिती सर्वातजास्त असह्य होत होती या जसवंतसिंहाला आपण पुण्यात लाल महालाभोवतीच्या छावणीत असताना खानावर छापा पडावा हा जणू या सिंहाला स्वत:चाच अपमान वाटत होता. झालेल्या फजितीचा थोडातरी बदला घेण्याकरीता आपण शेजारचा सिंहगड घ्यावा असा जसवंतचा हेतू होता.
हा वेढा चालू असतानाच सिंहगडच्या पश्चिमेच्या बाजूने स्वत: महाराज पाच हजार घोडदळ घेऊन सुरतेवर गेले. जसवंतला याचा पत्ताच नव्हता. महाराज सुरतेहून परत असेच जसवंतच्या पश्चिमबाजूने राजगडला गेले. जसवंतला याचाही पत्ता नव्हता. बातमीदार नाहीत , लष्करी गस्त नाही , सावधपणा नाही. कशी या मोगलांना कल्पना आली की , हे मराठे कोल्हे आपल्या अवतीभोवती आट्यापट्या खेळताहेत अन् आपल्याला त्यांचा भयंकर धोका आहे. पण केवळ प्रचंड युद्धसाहित्य , पैसा आणि अपार सैन्य याच्या जिवावर आपण मराठ्यांना मोडून काढणार आहोत अशी स्वप्न हे लोक पाहत होते. निव्वळ हा त्यांचा भाबडेपणा होता.
आता पाहा , दि. ६ एप्रिल १६६ 3 या दिवशी शाहिस्तेखानावर महाराजांचा छापा पडला. त्या दिवसापासून ते पुढे मिर्झाराजा आणि दिलेरखान दुसरी प्रचंड मोहिम घेऊन याच पुण्यात येईपर्यंत, म्हणजेच मार्च १६६५ पर्यंत मोगलांचा मुक्काम पुण्यात होताच. या पावणेदोन वर्षात मोगली सरदारांनी काय काय मिळवलं ? काहीही नाही. जसवंत आणि भावसिंह हे सिंहगडाला गराडा घालून बसले होते. प्राप्ती काय ? शून्य. मधूनमधून मराठ्यांच्याच हातचा मार खात होते.
याच काळातील शिवाजी महाराजांची कमाई लक्षात घ्यावी. सुरतेची खंडणी ही त्यांची प्रचंड आथिर्क कमाई. मुधोळकर बाजी घोरपड्यांचा समूळ फडशा , कुडाळवर खवासखानाचा पूर्ण पराभव , सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ , जिजाऊसाहेबांची महाबळेश्वरास सुवर्णतुळा दानधर्म , कारवारवरील आरमारी स्वारी अन् याशिवाय अनेक लहानमोठी स्वराज्यातील कामे यशस्वी. हा हिशोब पाहिल्यावर मोगल आणि मराठे यांचा उद्योग कोणत्या काळ काम आणि वेगाने चालला होता हे लक्षात येते.
महाराजांचा कामाचा हा झपाटा पाहिला की , त्यांच्या ध्येयवादाची कल्पना येते. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपण मराठे आणि आपला महाराष्ट्र स्वराज्य मिळवीत आहोत , याची सावध जाणीव महाराजांना आणि त्यांच्या सौंगड्यांना होती.
पाहा. या साऱ्या उद्योगात उपभोगाला , उनाड चैनबाजीला , आळसाला अन् आरामाला कुठे जागा सापडते का ? नाही , नाही , नाही. जीणशीर्ण अवस्थेतून स्वतंत्र होणाऱ्या राष्ट्राने या चंगळबाजीच्या वासालाही उभे राहू नये. पहिल्या दोन पिढ्यांनी करायचे ते राष्ट्र उभारणीसाठीकष्ट , कष्ट आणि कष्टच. त्याची गोड फळे खायची ती पुढच्या पिढ्यांनी. आपण फक्त करायची साधना आणि आराधना. आपण जगले पाहिजे व्रतस्थ वारकऱ्यासारखे.
हे सारे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनात अखंड दिसून येते. म्हणूनच त्याही वेळचे लोक म्हणत की , हे राज्य म्हणजे देवताभूमी , हे राज्य श्रीच्या वरदेचे आहे. हे राज्य व्हावे हे श्रीचे मनात फार आहे. मराठीयांचे गोमटे करावे यासाठी अवघा डाव मांडिला.
हे सारं स्वराज्यावर औरंगजेबाच्या वतीने चालू न येणाऱ्या राजपुतांना , बुंदल्यांना , जाटांना आणि शाही छावणीत इमानेइतबारे चाकरी करणाऱ्या पंडितांना कधी दिसलेच नाही का ? दिसले असेल , पण उमजले नाही. कारण देश आणि समाज यांच्याशी काहीतरी आपल्याला करावयास हवे ही भावनाच शून्यात होती. खाना पिना , मजा करना या पलिकडे त्यांना जीवनच नव्हते.
जसवंतसिंगने सिंहगडला वेढा घातल्याला पाऊण वर्ष होऊन गेले होते. परिणाम शून्यच. अखेर एके दिवशी जसवंतसिंहाने गडावर सुलतान ढवा केला. म्हणजे काय ? म्हणजे एकवटून गडावर हल्ला चढविला. पण तो हल्ला गडावरच्या मराठ्यांनी पार चुरगाळून काढला. हल्ला वाया गेला. पण मराठ्यांनीही एके दिवशी (२८ मे १६६४ ) गडावरून बाहेर पडून पायथ्याशी असलेल्या जसवंतसिंहाच्या छावणीवर भयंकर हल्ला चढविला. त्यांनी मोगलांना झोडपून काढले. खुद्दजसवंतसिंहालाही जखमा झाल्या. जसवंतसिंह आणि भावसिंह अवघ्या मोगल फौजेनिशी पुण्याकडे धूम पळाले. पूर्ण पराभव. हे दोन सिंह जिवंत सुटले हीच कमाई.
म्हणजे थोडक्यात हिशोब असा की शाहिस्तेखानच्या या टोलेजंग मोहिमेत मोगलांची कमाई काय? तर फक्त चाकणचा छोटासा किल्ला.
खरोखर हा सारा इतिहास चित्रपटाच्या (डॉक्युमेंटरीज) माध्यमातून तुम्हा उमलत्या तरुणांपुढेमांडला पाहिजे.