आजवर अधिक खाण्याविषयी लोकांकडून पुष्कळसं बोलून घेतल्यावर, अधिक खाण्याविषयी मला थोडंसं बोलायला हरकत नाही. 'नकटं व्हाव, पण धाकटं होऊ नये' म्हणतात. त्याच चालीवर 'मठ्ठ व्हावं, पण लठ्ठ होऊ नये'. अशी एखादी म्हण मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही. जो तो आमचं अन्न काढतो. बहुतेकांची समजूत लठ्ठ्पणाचा अधिक खाण्याविषयी संबंध आहे अशी का व्हावी मला कळत नाही. कमी खाणारा हा विनोदाचा विषय होत नाही. आता हडकुळ्या माणसाला 'पाप्याचं पितर' वगैरे म्हणतात, नाही असं नाही; पण नाटकां सिनेमांत पापी माणसं मात्र चांगली धटिंगण दाखवतात. पापी माणसांचे पितर हडकुळे असतील हा शोध कोणी लावला देव जाणे. मात्र रावण कंस हिरण्यकश्यप वगैरे ख्यातनाम पापी माणसांचे पितर हडकुळे असतील याच्यावर माझा नाही विश्र्वास बसत. सदैव थट्टेचा विषय आहे तो लठ्ठपणा. खंर म्हणजे त्याच्या निषेधार्थ लठ्ठ माणसांची एक भारतीय पातळीवरून संघटना काढली पाहिजे. बाकी लठ्ठ लोकांची कुठल्याही पातळीवरून संघटना काढण्या- ऎवजी जाडीवरूनच काढावी लागेल. हीही एक अडचण आहे. शिवाय भारतीय संघटना म्हणजे आंतरभारतीसारखं 'लठ्ठंभारती' वगैरे नाव यायचं, म्हणजे पुन्हा विनोदच.
अधिक खाण्याविषयी मुख्य राग म्हणजे त्यातून माणसाचा लठ्ठपणा वाढीला लागतो. ही एक चूक आहे. मी शेकडो बारीक माणसं सपाटून खाताना पाहीली आहेत; पण त्यांच्याविरुद्ध अधिक खाण्याचा सकृद्दर्शनी पुरावा नसतो. कितीही खा, ही माणसं अगं धरतच नाही आणि आमच्यासारखी काही माणसं एवढंसं खाल्ल तरी त्याची पावती अंगावर मोकळेपणी वागवतात.
अधिक खाण्याविषयी जाऊ दे. पण एकूण खाण्याविषयी बोलण्या वरच एकूण शिष्ट मंडळींचा राग असतो. गवय्ये जसे मैफिलीविषयी कुणाचीही पर्वा न करता बोलत असतात, किंबहूना तबलजी तर अमक्या-तमक्या गवय्याला आपण कसा खाल्ला हेही सांगतात, तसे काय खवय्येही बोलू शकणार नाहीत. पण त्यांना मात्र बोलण्याची चोरी, हे खूप आहे!
अधिक खाण्यामुळं प्रकृती बिघडते, असा एक डॉक्टर, वैद्द वगैरे मंडळीनी आज अनेक वर्ष अपप्रचार चालवला आहे. त्यामागला त्यांचा धूर्त हेतू पुष्कळांच्या लक्षात आलेला दिसत नाही. लोकांनी पोळ्या अधिक खाऊन डॉक्टर, वैद्द वगैरे लोकांना काय फायदा होणार? पोळ्यांऎवजी त्यांच्या औषधाच्या अधिक गोळ्या खाव्या हा त्यांचा सरळ हेतू आहे. त्यात त्यांची चूक काहीच नाही. प्रत्येक जण आपापला माल
खपवण्याची धडपड करणारच. पण औषधाच्या गोळ्यांना आपण किती बळी पडावं हे आपण लक्षात घेतलं पाहीजे.
माणसांच थोडंसं मोटारीसारखं आहे. प्रत्येक गाडीला जसं कमी-जास्त पेट्रोल लागतं, तसचं माणसांचं आहे. माझ्या एका स्नेहाचे आजोबा होते. सकाळी उठल्याबरोबर न्याहरीलाच मुळी त्यांना दोन वाट्या श्रीखंड आणि तीनचार लाडू लागत. एवढा ऎवज सकाळी एकदा पोटात गेला, की त्याच्यावर चांगलं शेरभर धारोष्ण दूध घेत. आणि म्हणत, "चला, आता जेवायला मोकळा झालो." बारा-साडेबारा झाले की भुकेनं
व्याकूळ व्हायचे. भोजनाचा तपशील न्याहरीच्या तपशिलाच्या अंदाजानं कुणालाही जेवणाला आधार म्हणून चारच्या सुमाराला चार पदार्थ तोंडात टाकून रात्रीचं जेवण सुर्यास्तापूर्वी घेत आणि शतपावली वगैरे करून चार इकडल्यातिकडल्या गोष्टी झाल्या, की कुठं उकडलेल्या शेंगाबिंगा खाऊन झोपत. झोपण्यापूर्वी लोटीभर दूध घेण्याचं व्रत त्यांनी आजन्म पाळलं वयाच्या ब्यायण्णावाव्या वर्षी ते निजधामाला गेले. आयूष्यात नित्याच्या आहाराप्रमाणे त्यांनी अनेक आघात पचवले. शेवटी शेवटी गेल्या महायुद्धाचा मात्र त्यांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. म्हणजे युद्धात होणा-या हानीबिनीचा नव्हे. रेशनिंगचा माणसांचं खाणं मोजूनमापून मिळणार, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. तर सांगायचं तात्पर्य, अधिक खाणं यातला
'अधिक' हा शब्दच अधिक आहे. त्या अधिकाला काही अर्थच नाही. मोटरला पेट्रोल अधिक लागतं म्हणण्यापैकी आहे हे. कशापेक्षा अधिक हा प्रश्न महत्वाचा. मोटरला स्कूटरपेक्षा पेट्रोल अधिक लागतं. लागणारच त्यांच्या घडणीतच फरक आहे. जे मोटरचं तेच माणसांचं.
काही गोष्टी तर अधिक खाल्ल्याच जात नाहीत. उदाहरणार्थ, उकडलेल्या शेंगा. प्रथम ज्या वेळी आपल्यासमोर ती रास आणून एखादी सुगृहिणी-ह्यादेखील माउल्या आता फारशा राहिल्या नाहीत. जाऊ द्या-तर एखादी सुगृहिणी ज्या वेळी उकडलेल्या शेंगाची रास टाकते त्या वेळी " अहो, एवढ्या कोण खाणार आहे?" असाच आवाज उठतो. आणि काही वेळानं "थोड्या उरकल्यात कां ग?" अशी पृच्छा होते. हे कां? खूप खाण्यानं आरोग्य बिघडतं असा एक लोकभ्रम आहे. माझ्या मित्राच्या न्याहरीला श्रीखंड खाण्या-या आजोबांसारखे मी अनेक जिवंत पुरावे सादर करू शकलो असतो: पण पूर्वीच्या खूप खाऊन ऎंशी वर्ष जगणा-या म्हाता-यांसारखे हल्लीचे ऎंशी वर्षाचे म्हातारे राहिले नाहीत. हल्लीच्या म्हाता-यांत काहीच दम नाही. तरूण असल्यासारखे आपली फिगर बिघडेल म्हणून मोजकं खातात. खरं तर खाण्यानं फिगर किंवा
आरोग्य काही बिघडत नाही. ज्याला खूप खाता येत नाही त्याला आरोग्य म्हणजे काय ते कळलंच नाही.तळलेले, भाजलेले, पोळलेले, उकडलेले, शिजवलेले, कच्चे असलेही पदार्थ खाऊन जो टूणटुणीत राहतो तो निरोगी माणूस, बशीत असलेला पदार्थ हा खाण्यासाठी असतो, अशी माझ्या एका खवय्या मित्राची व्याख्या आहे. बशीतून येणारी एकच गोष्ट उचलण्याच्या लायकीची नसते असं त्याचं मत आहे.
प्याशनेबल हाटेलात बशीतून येणारं बिल त्याला तेवढा तो हात लावत नाही.
गाण्याप्रमाणं खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! तर श्रीखंड पावाला लावून खा," म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही. खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहाबरोबर भलतंच खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.
पण हा काळ जाऊन पुन्हा एकदा अधिक खाण्याविषयीचा अनादर दूर होईल याची मला खात्री आहे. समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन भरपूर पचवणारं राष्ट्र ही आहे. माणसं एकदा खाण्यात गुंतली की काही नाही तरी निदान वावदूक बडबडतरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय? आणि केव्हा?
"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" म्हटलंय ते काय उगीच? जठराग्नीला भरपूर आहूती पडल्या पाहिजेत. सध्या जरा ही अन्न-परिस्थितीची लहानशी अडचण आहे म्हणून. नाही तर 'अधिक धान्य पिकवा'सारखी 'अधिक पंक्ती उठवा' ची चळवळ सुरू करायला हरकत नाही. तोपर्यंत खायला मिळतं तेच अधिक म्हणण्या खेरीज गत्यंतर नाही. आजकालचे शेतकरी देखील पूर्वीसारखं लोक भक्कम खात नाहीत म्हणून अधिक धान्य पिकवत नसावेत. तज्ज्ञांनी या मुद्याचा अवश्य विचार करावा ही विनंती.