काही (बे)ताल चित्रे - अघळपघळ - पु.ल.देशपांडे Aghal Paghal by Pu La Deshpande

अघळपघळ - पु.ल.देशपांडे  Aghal Paghal by Pu La Deshpande

झपताल त्रिताल एकताल इत्यादी भारतीय संगितातील ताल ठारावीक मात्रांमधे बसवले आहेत. त्यामुळे त्या तालांतल्या तालचित्रांना काहीतरी चौकट आहे. प्रस्तुत बेतालचित्रांना कुठलिच मात्रा लागु पडत नाही. परंतु बेताल चित्रांत देखिल एक सुक्ष्म ताल आणि तत्रं दडले आहे. शोधुन काढणारास सापडेल; सापडुन दाखविणारास बक्षिस मात्र नाही. कारण ही चित्रे आसपासचीच आहेत तेव्हा सापडणे अवघड नाही. तालचित्रांत ते कार्य कठीण आहे. बेताल चित्रांत सम सापडणे मात्र बिकट आहे. नाही तरी मी मी म्हणणार्‍या गवयांना ती कधी वेळेवर सापडणे?

दादरा

पार्श्वभुमी : चाळीतला दादर! (इथे अनेक बेतालचित्रे होतात. त्यांतली काही टिपली आहेत)

डोळे फुटले का?
सांभाळून बोला!
तुम्ही सांभाळुन चाला -
सांभाळूनच चालतोय
मग मी देखिल सांभाळुनच बोलतोय!
इतकी कसली मस्ती आलिये तुम्हाला?
मग मस्ती काय तुम्हालाच यावी? रेडीयो घेतला म्हणजे काय विमान नाही घेतलं -
तुम्ही घेऊन दाखवा!
पानवालेसुद्धा घेतात रेडीयो
मग पानाचं दुकान काढा! तरी बरं -
काय बरं?
कंपाउंडर तो कंपाउंडर!
खर्डेघाशापेक्षा बरा!
बाटल्याभरु कंपाउंडर
वेळकाढु कारकुंडा!
हातातलं तुप सांडलं, तुझा बाप भरुन देणार का?
तुप? खोबरेल तेलाला तुप म्हणतात का तुझ्या जातीत?
जात काय काढशी?
काढीन!
काढ काढ, माझी काढता येइल, तुझी कशी काढणार?
का? काढुन बघ -
असली तर काढायची ना -
फाट!
खल्ल! चष्मा फोडलास भरुन घे माझ्या!
फाट!
फट
ओ~य!दादरा: आणखी एक बेतालचित्र


इतकं काही नको ओळख नसल्यासारखं तोंड चुकवून जायला -
इश्श! तोंड चुकवायला काय कर्ज नाही घेतलं!
पण ब्लाउज घेतला होतास तो? बहुतेक हरवला असेल! जॉंर्जेटच्या साडीसारखा.
तीन दमडीचा ब्लाउज!
म्हणजे तुला महागच!
पन्नास ब्लाउज आणून देइन -
शेवटी मधूला सोडुन लॉंड्रीवाल्याशीच जमवलस वाटतं?
काय म्हणून?
त्याशिवाय पन्नास ब्लाउज कुठून देणार? मधुनं दिली वाटतं चाट!
अशी चाट खायला मी म्हणजे तू नव्हे! तरी बरं अरविन्दा गेला त्या मंदाच्या मागं -
हो जातोय! डोळे नाही फुटले त्याचे चकणीच्या मागे जायला -
तुला पाहतांना फुटले होते वाटतं?
कां, तुझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणुन?
असल्या छप्पन अरविंदाना पातळं धुवायला ठेविन मी !
हो क्का? चाळीतली पातळं धुवायचं कंत्राट घेतलय का तुझ्या पोष्टमन बाबांनी?
आहाहा! तरीच एस्सेसीत गचकलीस तीनदा! पोष्टमास्तरला पोष्टमन म्हणत नाहीत इंग्रजीत!
तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!
चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!
आईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत -
हो, तुझी आई म्हणते कोकिळाच की नाही! तरी बरं, परवा सगळी चाळ जमा झाली -
आणि तुझ्या आईच्या झिंज्या पकडल्या तेव्हा वाजवल्या ते का नाही सांगत?
हॉ हॉ हॉ ~!
वेडावतेस काय माकडासारखी -
तुझा अरविन्दा एक माकड आहे. म्हणुन सगळीच माकडं वाटली तुला? राधेला म्हणे सगळीकडेच कृष्ण दिसत होता.
ही ही ही ही! गणपती उस्तवात चोरुन दुसऱ्यांच्या कविता आपल्या नावावर म्हटल्या म्हणजे काय सगळीकडे काव्य नको.
चोरायला काय तुझे बाबा नाही मी. पुरुषासारखा पुरूष असून कोळसे चोरतो!
बाबांच नको हं नाव घेऊ!
मम्मीला सांग तुझ्या. मला कशाला सांगतेस? दिवसभर तर नाव घेते. गोपाळ गोपाळ गोपाळ करुन.
माडर्न मम्मी तुझी- लिपष्टिक लावली म्हणून काय अक्कल नाही आली!
मग तुम्ही फासा तोंडाला-तुमचे कोणी ओठ धरले आहेत?
तुझी मम्मी ओठाला लावते का लिपस्टि~~क? मला वाटलं. समोर आलेल्या दाताला-
खरे दात आहेत - कवळी नाही तुझ्या आई सारखी!
चप्पल मारीन, सांगते!
आहे का पायात? वा वा! आहे की! तरीच हल्ली रोज देवळात जातेस - रोज नवी चप्पल!
बघायचिय का?
बघू - माझीच असेल!
ही बघ .. फाट!