आमचा हसवणारा मित्र..
(अस्मिताताई बाविस्कर आणि आनंद कुलकर्णी यांचे ह्या लेखासाठी खुप खुप आभार.)
पु लंना "पी. एल." म्हणणाऱ्यांच्या पिढीतला मी आहे. कारण माझी त्यांची ओळख साठ वर्षांपासूनची- म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयापासूनची. त्यांच्या खट्याळपणाच्या, महाविद्यालयात नव्याने आलेल्या मुलांची खिल्ली उडवण्याच्या, उत्स्फूर्त विनोदाच्या अशा कितीतरी आठवणी मनात दाटून आल्या आहेत. वयोमानाप्रमाणे जशा आठवतील तशा थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
सुरवातीला त्यांच्या उत्स्फूर्त विनोदाचा एक नमुना देत आहे. सवाई गंधर्व महोत्सव सुरू झाल्यापासून मी आर्य संगीत प्रसारक मंडळाचा कमिटी मेंबर आहे. प्रसंग होता सवाई गंधर्वांचा पुतळा संभाजी पार्कमध्ये बसवला त्या वेळचा. कार्यक्रमानंतर काही निवडक लोकांना सहसचिव डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्या "आलापिनी' बंगल्यावर जेवण होते.
पी. एल., महापौर या नात्याने ना. ग. गोरे, आयुक्त भुजंगराव कुलकर्णी, वामनराव देशपांडे, पं. फिरोज दस्तूर, मी, डॉ. गंगूबाई हनगल वगैरे मंडळी जेवणास हजर होते. जेवणाच्या टेबलावर ना. ग. गोरे, पी. एल., भुजंगराव कुलकर्णी असे बसले होते. ससोर बाकीचे आम्ही लोक होतो. जेवणाचा बेत उत्तम केला होता. सगळे लोक आता जेवण्यास सुरवात करणार, इतक्यात पी. एल. डॉ. नानासाहेबांना म्हणाले, "नाना, तुम्ही जेवणाचा बेत फारच उत्तम केला आहे; पण मला आज जेवण जाईल का नाही याची शंका आहे.''
डॉ. नानासाहेबांनी त्यांना विचारले, "काहो पी.एल., पोट बरोबर नाही का?'' तेव्हा पी. एल. म्हणाले, ""तसं काही नाही नाना, पण माझ्या एका बाजूला नाग व दुसऱ्या बाजूला भुजंग असताना मला कसे जेवण जाईल?'' आणि प्रचंड हशा पिकला.
आमच्या महाविद्यालयीन जीवनात तर पी. एल. विनोदाचा शिडकावाच करीत. बाहेरगावाहून आलेल्या मुलांच्या ते सारख्या फिरक्या घ्यायचे. आमच्याबरोबर हैदराबादचा करमरकर नावाचा मुलगा होता. जिमखान्यावर फिरताना पी.एल.नी त्याला सांगितले, "करमरकर, पुण्यात ट्रॅफिकचे नियम फार कडक असतात. इथे पायी चालणाऱ्यालासुद्धा वळायचे असले, तर त्याला कुणीकडे वळायचे त्या दिशेकडे हात दाखवावा लागतो.'' तेवढ्यात आम्ही "गुडलक'कडून भांडारकर रोडकडे वळणार होतो व करमरकर सगळ्यात डाव्या बाजूला होता. त्याला पी. एल. म्हणाले, "अरे करमरकर, डावा हात दाखव, आपल्याला डावीकडं वळायचं आहे'' आणि खरोखरच करमरकरने वळण्यासाठी चक्क डावा हात दाखवला व आम्ही सर्व जण वळेपर्यंत त्याला खाली हात करू दिला नाही.
आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. ती नेहमी डाव्या मनगटावर पट्टीसारखा मोठा पांढरा रुमाल बांधायची व त्याचा एक वेढा अंगठा व अनामिकेच्या मधून घ्यायची. सर्वांना या रुमाल बांधण्याबद्दल उत्सुकता होती. तिच्या खूप ओळखीचा एक मुलगा आमच्या ग्रुपमध्ये होता. त्याला पी. एल.नी विचारले, "काय रे, तुझी ती मैत्रीण हाताला रुमाल का बांधते?'' तो म्हणाला, "तसं काही कारण नाही. उगीचच बांधते.' तेव्हा पी. एल. त्याला म्हणाले, "हात लेका! तू तिच्या इतका जवळचा मित्र असून तुला काहीच कसं माहीत नाही? तिच्या हातावर एक छोटासा केसांचा पुंजका आहे, तो लोकांना दिसू नये म्हणून ती रुमाल बांधते. खात्री नसेल तर विचार तिला?''
आम्ही कॉलेजच्या आवारात फिरत असताना मागचा- पुढचा काही विचार न करता त्या मुलीला थांबवून तिला म्हणाला, "कुसुम, मला माहीत आहे तू हाताला रुमाल का बांधतेस ते?'' ती मुलगी एकदमच चकित झाली. आम्ही बाकीचे थोडे पुढे जाऊन गंमत पाहत उभे राहिलो. ती त्याला म्हणाली, "काय माहिती आहे रे तुला?'' तो म्हणाला, "तुझ्या हातावर केसाचा लहान पुंजका आहे, तो झाकण्यासाठी तू रुमाल बांधतेस.'' ती जी भडकली, तिने तरातरा हातावरचा रुमाल काढला आणि त्याला हात दाखवला. त्याच्यावर मार खायचीच पाळी आली होती. एवढे झाल्यानंतरसुद्धा पी. एल.नी त्याचा ग्रह कायम ठेवला. त्याला सांगितले, "अरे, ती कसं सांगेल कुणाला, की माझ्या हातावर केसाचा पुंजका आहे म्हणून? माझी एक आतेबहीण आहे, तिनं मला खासगीत हे गुपित सांगितलं आणि तू तरी अगदीच भोट, असल्या गोष्टी कधी विचारायच्या असतात का? बरे तिने प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली नाही. नाही तर तुला त्यांनी रस्टिकेट केलं असतं.''
कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पी. एल. तर उत्सवमूर्तीच असत. पी. एल.चे एक खास दोस्त होते श्री. श्याम देशपांडे. तो उत्तम तबला वाजवत असे. हैदराबाद संस्थानातील एका श्रीमंत जहागीरदाराचा मुलगा (तो पुढे आयएएस झाला व कर्नाटक सरकारमध्ये सेक्रेटरी होता). त्याला सगळे "नबाब' म्हणायचे. आम्ही जेव्हा दोन आणे तासांनी सायकल घ्यायचे, त्या वेळेस हा श्याम देशपांडे पाच रुपये तासांनी श्री. जोग यांच्याकडून भाड्याने मोटारसायकल घेऊन फिरायचा (व्यक्ती आणि वल्लीमधील "भय्या नागपूरकर' हे शब्दचित्र त्याच्यावरच आहे). पी. एल.ची. पेटी व साथीला श्याम देशपांडे याचा तबला हे नेहमी ठरलेले.४० सालच्या गॅदरिंगमध्ये पी.एल.नी एक कव्वाली बसवली होती. त्यात पी. एल. मध्यभागी दाढीमिशा लावून, गोंड्याची टोपी घालून, गळ्याला रंगीत रुमाल, जरतारी जाकीट, लेंगा व पठाणी पद्धतीचा कमीस अशा वेशात पेटी घेऊन बसले होते. शेजारी तबल्यावर श्याम देशपांडे व बाजूला आम्ही इतर मित्रमंडळी गोंड्याच्या टोप्या घालून कव्वालीला साजेसा पोशाख घालून बसलो होतो.कव्वालीचा साधारण अर्थ असा असतो, "त्याला एक मुलगी भेटते, त्याला ती आवडते, ती त्याच्या बरोबर हिंडते-फिरते, हॉटेलमध्ये जाते आणि शेवटी काय झाले ते सांगते!''. सर्व आठवत नाही. कवाल म्हणतो, "ओ मुझे बहोत चहाती थी, मेरे साथ घुमती थी, "लकी'मे कटलेट बी खाती थी, "गुडलक'में चिकनबी खाती थी'' वगैरे वगैरे.
"लेकिन, एक दीन उसने मुझे बतायारे, बतायारे'' आणि आम्ही लोक त्याला विचारतो "क्या?'' त्या वेळेस पी. एल. म्हणतात, ``पर्वतपें अपना डेरारे'' असे म्हटल्यावर अँफी थिएटर कोसळून पडले की काय असे जबरदस्त स्टॅंपिंग झाले. बऱ्याचशा प्रोफेसरना, विनोद काय झाला, एवढे स्टॅंपिंग का झाले, हे कळलेच नाही. (व्ही. शांताराम यांचे याच नावाचे पिक्चर नुकतेच त्यावेळेस लागले होते.) या झाल्या जुन्या आठवणी! ते अलीकडेच शस्त्रक्रिया करून अमेरिकेहून परत आल्यानंतर मी भेटावयास गेलो असताना सुनीताबाईंनी, एवढी मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतरसुद्धा त्यांची विनोदबुद्धी किती जागृत होती याचा एक नमुना सांगितला. तिथे त्यांची काळजी घेणारी जी मुख्य नर्स होती तिची समजूत अशी, की एवढा मोठा भारतातला लेखक, म्हणजे त्याचा भला मोठा बंगला असणार. बॅकयार्ड, बाग, समोर भलेमोठे लॉन असणार. पी. एल. यांचा आवाज नीट बाहेर येत नव्हता म्हणून त्यांनी तिच्याकडे तक्रार केली तेव्हा तिने त्यांना सल्ला दिला ,"मिस्टर देशपांडे, तुम्ही तुमच्या बंगल्याच्या पुढील दरवाजात उभे राहा आणि तुमच्या मिसेसना तुमच्या बंगल्याच्या लॉनच्या दुसऱ्या टोकाला उभे राहावयास सांगा आणि तुम्ही जोरजोरात माय हनी, माय स्वीट हार्ट, माय डिअर अशी हाक मारा, म्हणजे तुमचा आवाज मोकळा होईल.'' हे तिने सांगितल्यावर लगेच पी. एल. तिला म्हणाले, "माझी हाक ऐकून माझी शेजारीण धावत आली तर मी काय करू? हे ऐकल्यावर ती नर्स खळाळून हसली.
सुनीताबाईंनी पी. एल.करिता काय केले नाही? लोक जरी (मी सुद्धा) त्यांना घाबरत होते, तरी त्यांनी पी.एल.मधला लेखक जागवला, फुलवला, जिवापाड जपला आणि पी. एल.नी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेला पैसा सुनीताबाईंनी उत्तम प्रकारे जपला. स्वतःच्या साध्या राहणीपुरता लागेल तेवढा वापरला व उरलेला सर्व पैसा काहीही गवगवा न करता समाजाच्या कल्याणासाठी दानशूर कर्णाप्रमाणे वाटला. याचे सर्व श्रेय पी. एल.नी कित्येक भाषणांत उघडपणे सुनीताबाईंना दिले आहे.
पी. एल.च्या आजारातही स्वतःची दुखणी विसरून त्यांची जी जिवापाड सेवा शुश्रूषा केली, तिला तोड नाही. लक्ष्मणाच्या या ऊर्मिलेचे मन फारसे लोकांनी जाणलेच नाही...
- म. का. पारुंडेकर