(भाई)गीरी Bhaigiri Poem On Pu La Deshpande

अक्षरांची रत्ने खुलवत राजा होता अवतरलेला
गेली वर्षे सरली वर्षे दरवळ त्याचा पण उरलेला

राजा होता थोडा डांबिस थोडा अल्लड थोडा ग्यानी
ह्या राजाचा रुबाब होता एक मनोहरशी फ़ुलराणी

ह्या राजाची गोष्ट निराळी ह्या कुलुपाला नव्हती किल्ली
ह्या राजा दिसल्या होत्या काही व्यक्ती काही वल्ली

त्या वल्लीची बात निराळी नाथा,नंदा, अंतु बर्वा
ह्यातिल खरा नि खोटा कुठला तुम्हीच वाचा तुम्हीच ठरवा

ह्या राजाची कधी फ़सवणूक कधी उगाची खोगिरभरती
ह्या राजाने चालत न्हेले आम्हा तुम्हा चांळीं वरती

कधी जहाला धोंडो जोशी कधी बबडुचे लाडु वळतो
हया राजाचा थाट हे न्यारा ज्याला जुळतो त्याला कळतो

कधी असामी गुणगुणला तो कधी उगाचच शुन्य जहाला
ह्या राजाचा सुर गवसला ज्याला बस तो धन्य जहाला

-- मकरंद सखाराम सावंत