रावसाहेब - Raosaheb by Pu La Deshpande

"दिल्ले दान घेतले दान पुढच्या जन्मी मुस्सलमान" असा एक आमच्या लहानपणी चिडवाचिडवीचा मंत्र होता. दिल्ले दान परत घेणा~याने मुस्सलमानच कशाला व्हायला हवे ? दानतीचे दान काही धर्मावारी वाटलेले नाही. पण 'दाना'ला मुस्सलमानातल्या 'माना'चे यमक जुळते, एवढाच त्याचा अर्थ. पण दिल्ले दान कसलाही विचार न करता परत घेणारा देवाइतका मक्ख दाता आणि घेता दुसरा कोणीही नसेल.

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला काही उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात. पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्याचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे-येणे होते --- भेटणे-बोलणे होते --- पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरी नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी, --- कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात.


बेळगावच्या कृष्णराव हरिहरांशी अशीच गाठ पडली. त्यांना सगळे लोक 'रावसाहेब' म्हणायचे. ही रावसाहेबी त्यांना सरकारने बहाल केली नव्हती. जन्माला येतानाच ती ते घेऊन आले होते. शेवटपर्यंत ती सुटली नाही. बेताची उंची, पातळ पांढरे केस मागे फिरवलेले, भाग्याची चित्रे रेखायला काढतात तसले कपाळ, परीटघडीचे दुटांगी पण लफ्फे काढल्यासारखे धोतर नेसायचे, वर रेशमी शर्ट, वुलन कोट, एका हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि दुसऱ्या हाताच्या बोटांत करंगळीच्या आणि अनामिकेच्या बेचकीत सिगरेट धरलेली, तिचा चिलमीसारखा ताणून झुरका घ्यायची लकब. जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते रस्त्यातल्या भिकाऱ्यापर्यंत कुणालाही, दर तीन शब्दांमागे कचकावून एक शिवी घातल्याखेरीज गृहस्थाचे एक वाक्य पुरे होत नसे. मराठीला सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठी साज.

साधे कुजबुजणे फर्लांगभर ऐकू जावे इतका नाजूक आवाज ! कुठल्याही वाक्याची सुरवात 'भ'काराने सुरू होणाऱ्या शीवीशिवाय होतच नसे. मराठीवरच्या कानडी संस्कारामुळे लिंगभेदच काय पण विभक्तिप्रत्यय-कर्ता-कर्म-क्रियापदांची आदळआपट इतकी करायचे की, दादोबा पांडुरंग किंवा दामले-बिमले सगळे व्याकरणवाले झीटच येऊन पडले असते. शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजत असेल तर समजो बापडे, पण जगाच्या दृष्टिने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता. आवेग आवरता येणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते. रावसाहेबांना तेवढे जमत नव्हते. तरीही रावसाहेब सभ्य होते. काही माणसांची वागण्याची तऱहाच अशी असते. की त्यांच्या हाती मद्याचा पेलादेखील खुलतो, आणि काही माणसे दूधदेखील ताडी प्याल्यासारखी पितात. रावसाहेब षोकीन होते. पण वखवखलेले नव्हते.

जीवनात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले. पण उपाशी वाघ काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर नेईल ? सोन्याच्या थाळीतून पहिला दूधभात खाल्लेल्या धनुत्तर हुच्चराव हरिहर वकिलाच्या किटप्पाने पुढच्या आयुष्यात कधीकधी शिळ्या भाकरीचा तुकडाही मोडला होता. पण काही हस्तस्पर्शच असे असतात, की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. रावसाहेबांची घडण खानदारी खरी, पण माणूस गर्दीत रमणारा. अंतर्बाह्य ब्राँझने घडवल्यासारखा वाटे. वर्णही तसाच तांबूस-काळा होता. सिगरेटचा दमदार झुरका घेताना त्यांचा चेहरा लाल आणि काळ्याच्या मिश्रणातून होतो तसा होई. मग दहांतल्या पाच वेळा त्यांना जोरदार ठसका लागे. सिगरेट ओढतानाच काय, पण जोरात हसले तरी ठसका लागायचा. कारण ते हसणेदेखील बेंबीच्या देठापासून फुटायचे. स्मितहास्य वगैरे हास्याचे नाजून प्रकार त्या चेहऱ्याला मानवतच नसत. एकदम साताच्या वरच मजले.ह्या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टूडिओत पडली.

दहापंधरा वाद्यांचा ताफा पुढ्यात घेऊन मी गाणे बसवीत होतो. रेकॉर्डींगच्या आधीची साफसफाई चालली होती. विष्णुपंत जोग आपल्या पहाडी आवाजात गात होते. चाल थोडी गायकी ढंगाची होती. जोगांचा वरचा षड्ज ठ्यां लागला आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर ह्यांच्या वर चढलेल्या आवाजात कोणीतरी ओरडले --- "हा__ण तुझ्या आXX!"

ही इतकी सणसणीत दाद कोणाची गेली म्हणून मी चमकून मागे पाहिले. बाळ गजबर रावसाहेबांना घेऊन पुढे आले आणि

मला म्हणाले ---"हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बरं काय ----"मी रीतसर नमस्कार ठोकला आणि रावसाहेबांनी आमची आणि त्यांची शाळूसोबत असल्यासारखा माझ्या पाठीत गुद्दा मारला.

"काय दणदणीत गाणं हो xxxxx !" रावसाहेबांच्या तोंडची वाक्ये जशीच्या तशी लिहायची म्हणजे मुष्किलच आहे. शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेली माणसे अश्लील -- अश्लील म्हणून ओरडायची. (तबीयतदार तज्ञांनी फुल्या भरून काढाव्या.)

"वा !--- पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं,

"कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या. "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें माइकचं बोंडूक वर उचलायला लावू या की. बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे xxxचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला.

स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः !

हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले. रावसाहेबांचा हा अवतार मला अपरिचित असला तरी आमच्या स्टुडिओतल्या मंडळींना ठाऊक असावा. कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर लोक मनसोक्त हसत होते. रेकॉर्डिस्टने त्यांना आपल्या बूथमध्ये नेले आणि रावसाहेब त्या काचेमागून माना डोलवायला लागले. त्या माणसाने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकले.

त्यानंतर वर्षा-दोन वर्षांतच मी बेळगावला प्राध्यापकी करायला गेलो, आणि पहिल्या दिवशीच रावसाहेबांच्या अड्ड्यात सामील झालो. रावसाहेब सिनेमाथिएटरांच्या व्यवसायात होते. बेळगावच्या रिझ थिएटरातला बैठकीचा अड्डा हा रावसाहेबांचा दरबार होता. त्या दरबारात अनेक विसंवादी पात्रे जमत. त्या आर्चेस्ट्र्याचे रावसाहेब हे कंडक्टर होते. राजकारणातल्या माणसांना काय तो तिथे मज्जाव होता. म्हणजे कुणी मज्जाव केला नव्हता, पण त्या खुर्च्यांमध्ये मानाची खुर्ची नसल्यामुळे ती जात त्या दिशेला फिरकतच नसे. रिझ थिएटरच्या बाजूला एक ऑफिसची छोटीशी बंगली होती. तिच्या दारात संध्याकाळी खुर्च्या मांडल्या जात. पंखा चालू केल्यासारखी संध्याकाळी सहाच्या सुमारास नेमकी त्या बोळकंडीतून वाऱ्याची झुळूक सुरू व्हायची. एक तर बेळगावी लोण्याइतकीच तिथली हवाही आल्हाददायक. हळूहळू मंडळी दिवसाची कामेधामे उरकून तिथे जमू लागत. त्या बैटकीत वयाचा, ज्ञानाचा, श्रीमंतीचा, सत्तेचा -- कसलाही मुलाहिजा नव्हता. एखाद्या खिलाडू कलेक्टराचेदेखील रावसाहेब "आलं तिच्च्यायला लोकांच्यात काड्या सारून --" अशा ठोक शब्दांत स्वागत करायचे. रावसाहेबांच्या शिव्या खायला माणसे जमत. मग हळूच व्यंकटराव मुधोळकर रावसाहेबांची कळ काढीत. व्यंकटराव मुधोळकर धंद्यानं रावसाहेबांचे भागीदार. पण भावाभावांनी काय केले असेल असे प्रेम. दोघांची भांडणे ऐकत राहावी. एखाद्या शाळकरी पोरासारखे ते हळूच रावसाहेबांची कळ काढीत.


"काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय --" बस्स. एवढे पुरे होई.

"हं -- बोला काडीमास्तर --" रावसाहेब त्यांना काडीमास्तर म्हणत. ह्या दोघांची मैत्री म्हणजे एक अजब मामला होता. मुधोळकर कुटुंबवत्सल, तर रावसाहेबांच्या शिष्टमान्य संसाराची दुर्दैवाने घडीच विस्कटलेली. मुधोळकरांनी व्यवहारातली दक्षता पाळून फुकट्यांच्या भल्याची पर्वा करायची नाही तर रावसाहेबांनी विचार न करता धोतर सोडून द्यायचे आणि वर "लोकांनी काय पैसा नाही म्हणून नागवं हिंडायचं का हो !" म्हणून भांडण काढायचे. पण जोडी जमली होती. लोकांच्या तोंडी हरिहर - मुधोळकर अशी जोडनावे होती.


त्या अड्ड्यात शाळा आटपून मिस्किल नाईकमास्तर येत -- गायनक्लासातल्या पोरांना सा-रे-ग-म घोकायला लावून मनसोक्त हसायला आणि हसवायला विजापुरे मास्तर येत -- डॉ. कुलकर्णी -- डॉ. हणमशेठ यांच्यासारखे यशस्वी डॉक्टर येत -- कागलकरबुवा हजिरी लावीत -- पुरुषोत्तम वालावलकरासारखा तरबेज पेटीवाला "रावसाहेब, संगीत नाटकाचे जमवा" म्हणून भुणभुण लावी -- विष्णू केशकामतासारखा जगमित्र चक्कर टाकून जाई -- मधूनच रानकृष्णपंत जोश्यांसारखे धनिक सावकार येत -- बाळासाहेब गुडींसारखे अत्यंत सज्जन पोलीस अधिकारी येत -- मुसाबंधू येऊन चावटपणा करून जात... रात्री नऊनऊ वाजेपर्यंत नेमाने अड्डा भरायचा. पण सगळ्यांत मोठा दंगा रावसाहेबांचा. त्यांचा जिमी नावाचा एक लाडका कुत्रा होता. त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या कळत असाव्या. तोदेखील "यू यू यू यू" ला जवळ न येता "जिम्या, हिकडं ये की XXच्या " म्हटलं तरच जवळ यायचा.

सिनेमाच्या व्यवसायात रावसाहेबांचे आयुष्य गेले. मॅनेजरीपासून मालकीपर्यंत सिनेमाथेटरांचे सगळे भोग त्यांनी भोगले. पण पंधरापंधरा आठवडे चाललेला सिनेमादेखील कधी आत बसून पाहिला नाही. नाटक आणि संगीत हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय.

कर्नाटकातली वैष्णव ब्राह्मणांची घरे म्हणजे अत्यंत कर्मठ. त्या एकत्र कुटुंबातल्या सोवळ्या-ओवळ्यांच्या तारेवर कसरत करीत पावले टाकायची. त्यातून रावसाहेबांचे वडील म्हणजे नामवंत वकील. वाड्याच्या त्या चौदा चौकड्यांच्या राज्यातली ती त्या काळातल्या बाप नामक रावणाची सार्वभौम सत्ता. पोरे ही मुख्यतः फोडून काढण्यासाठी जन्माला घातलेली असतात, असा एक समज असायचा. नफ्फड बापदेखील आपल्या पोराला सदवर्तनाचे धडे द्यायला हातात छडी घेऊन सदैव सज्ज. इथे तर कर्तबगार बाप. घर सोन्यानाण्याने भरलेले. असल्या ह्या कडेकोट वातावरणात विष्णुसहस्त्रनामाच्या आणि तप्तमुद्रांकित नातलगांच्या पूजापाठांच्या घोषात कृष्णरावांच्या कानी बेळगावच्या थिएटरातल्या नाटकांच्या नांद्यांचे सूर पडले कसे हेच मला नवल वाटते.
(अपुर्ण)..