बॉस …...- संदिप खरे....Boss by Sandip Khare

बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा…
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा…
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा…
मी लग्नाळलेला… वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून 

कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'…
यथावकाश माझं लग्न झालं…
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले…
बघता बघता 'अतिपरिचित' झाले….
आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही…
आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही…
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो…
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता' 
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते…
उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी…


बॉस …...- संदिप खरे....Boss by Sandip Khare