'प्रेमदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर
अर्थात दस्तूरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.लं. - सुनीताबाईंचं नातं
इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!................
उन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो. खूप वॆळ त्याच्याकडे बघितलं,की डोळे दुखतात थोडेसे चालायचंच. समोर रस्त्यावरच्या वर्दळीकडे भाईकाका टकटक बघत राहिले. रोज सकाळी अंघोळ किंवा स्पंजीग आटोपलं, की कुणीतरी त्यांना इथं आणून बसवतं. कुणीतरी म्हणजे बहुधा माईच. या खिडकीशी बसायचं आणि चिटकुला ब्रेकफास्ट करायचा. कितीही बेचव असला, तरी भाईकाका तो ऎन्जाय करायचे. हळूहळू त्यात पाखरांची किलबिल ऎकायची. द्र्ष्टीशेपात येणारा झाड्झाडोरा आनंदी वृत्तीन न्याहाळायचा. एखादी झकासशी टेप लावून देऊन माई आपल्या कामात बुडून जायच्या. भाईकाकांचे खरपुड्लेले पाय तबल्याच्या ठेक्यानिशी किंचित हलत, तेव्हा खुप सुंदर वाटतं .......
गेली काही वर्ष तरी हेच रुटिन आहे. औषधाच्या गोळ्या आणि न बाधणारा माफक आहार. पुन्हा औषधाच्या गोळ्या ठरलेल्या वेळी झोपलंच पाहिजे हि माईची शिस्त. कधी कधी भाईकाका गमतीनं म्हणत, 'अर्धशिशीला माई ग्रेन' का म्हणतात, कळलं का तुला!बाहेरची वर्दळ बघत बसण्याचा कंटाळा आला, की भाईकाकाचं काहीही दुसऱ्याला करायला लागता कामा नये, असा त्यांचा हट्ट असे. हा हट्टच रोज भल्या पहाटे त्यांना उठवी. रात्री अंथरुणाला पाठ टेकेर्यतं त्यांच्या मनात भाईकाकांच हवं-नको बघणं याच्याशिवाय दुसरं काही नसे. भाईकाकासुध्दा त्यातलेच. 'माई किती करतात!' आम्ही आहोत ना!' असं सांगणाऱ्या आसपासच्या मंडळीसमोर भाईकाका फक्त हसायचे. काही म्हणता काही बोलायचे नाहीत. जणू आपलं सगळं फक्त माईंनीच करावं, अशी त्याचीचं अपेक्षा असायची.....
'रवी मी.... दीनानाथाच्या सुरांची लड चमकून गेली आणि भाईकाका खुशालले. खुर्चीच्या हातावर बोटांनी त्यांनी हलकेच ठेका धरला. जांभळया-लाल रंगाच्या एखादा फलकारा वेडीवाकडी वळणं घेत जावा, तशी नाटकाची घंटा त्यांच्या मनात घुमली. धुपाचा गंध दरवळलला. उघडलला जाण्यापूर्वी मखमली होणारी अस्वस्थ थरथर त्यांना स्पष्टपणे जाणवली आणी त्यांनी खुर्चीच्या पाठीवर हलकेच मान टेकून डोळे
मिटले.
पाहिल्यापासून माई तशी भलतीच टणक किंबहुना तिचा हा कणखरपणा पाहूनच आपण तिच्याकडे ओढले गेलो. गॊरी गोरी पान, बारकुडी अंगकाठी, साधीसुधीच सुती साडी; पण त्या नेसण्यातही किती नेटनेटकेपण. या मुलीच्या अंगावर एकही दागिना नाही, हे सुद्धा कुणाच्या लक्षात आलं नाही कधी....कुठल्या तरी संस्थेच्या वर्धापनासाठी ही आपल्याला घ्यायला आली होती. टांग्यात मागं आपण आणि मधू
मांडीवर तबला नि डग्गा घेऊन बसलेले. सुपात पेटी! टांग्येवाल्याच्या शेजारी ही बारकीशी पोर. घोड्याच्या पाठीवर वाटेल तसा चाबूक ओढणाऱ्या टांगेवाल्याला तिनं कसला झापला होता. 'चलना हे तो ठीक सें चलाव! नाही तर मी चालवते!!'टांग्यातून उतरल्यावर हिनं त्याला पैसे विचारले. "द्या आणा-दीड आणा,"
तो म्हणाला."आणा की दीड आणा?"मधूच्या बरोबरीनं आपण कित्येक दिवस या मुलीची नक्कल करत असू. पुढं आशाच काही सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वारंवार भेटी होऊ लागल्या. ती आली, की मधू ढोसकण्या द्यायच्या. आपण बोअर झाल्याचा आव आणायचो. अशा माईशी मी लग्न करणारे, हे कळल्यावर मधू हैराण झाला होता. म्हणायचा, 'अरे लेका, तू गाण्याबजावण्यातला माणूस. तुझं काय जमणार या इस्त्रीवालीशी?
पण, माई इस्रीवाली नव्हतीच. कॉलेजची सहल होती तेव्हा हे कळलं सिंहगडावर सगळे पोचल्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी कोंडाळं करून बसले. मी पाहुणा आघाडीचा आणी तरीही स्वस्तात पटलेला भावगीत गायक! पोरीबाळीसमोर भाव खात पाच-सहा पदं म्हटली. हाताच्या तळव्यावर हनुवटी रेलून शांतपणे ही ऎकत होती. मग मैत्रिणींनी आग्रह केल्यावर तिनं कविता म्हटली. कुठली बरं?आठवलं! माधव जूलियनांची-
कोठे तरी जाऊन शीघ्र विमानी
अनात ठिकाणी...
स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे,
प्रेम इमानी
तेथे चल राणी!
भाळ न इथे प्रिती धनाविण कुणाला,
ना मोल गुणाला,
लावण्य नसे जेथे जणू चीज किराणी
तेथे चल राणी!....
पेटीवर सूर धरता धरता स्पष्टपणे जाणवलं. आपण आता, या क्षणी, इथं सिंहगडावर, प्रेमात पडत आहोत.... इस्त्रीवाली पाणी खूप खोल होतं.हिच्या व्यक्तिमत्त्वातलं तो करडेपणा, खरखरीतपणा, खोटा आव आहे काय? सोर्ट ओफ डिफेन्स मेकनिझम? तिच्या ठायी खरोखर हे इतकं मार्दव आहे? वस्तुतः जूलियनांची ही कविता आपल्याला अजिबात आवडायची नाही. उगीच आपलं 'ट' ला 'ट' आणि 'राणी' ला 'पाणी'! पण माईनं ती कविता अक्षरशः उलगडून दाखवली. नुसतीच कविता नव्हे रीतीभाती पल्याडच्या तो चांद्रप्रदेशही दाखवला....
चार-आठ दिवस गेल्यावर एक पत्र लिहिलं आणि माईला आपल्या भावना कळवून टाकल्या. आता 'हो' म्हण. मी मोकळा झालो आहे.उलट टपाली पाकीट आलं. फोडलं तर आत आपणच पाठवलेलं पत्र.... साभार! त्याच कागदाच्या पाठीमागं मात्र दोनच शब्द होते : 'अर्थात होय!".
चार-आठ दिवस गेल्यावर एक पत्र लिहिलं आणि माईला आपल्या भावना कळवून टाकल्या. आता 'हो' म्हण. मी मोकळा झालो आहे.उलट टपाली पाकीट आलं. फोडलं तर आत आपणच पाठवलेलं पत्र.... साभार! त्याच कागदाच्या पाठीमागं मात्र दोनच शब्द होते : 'अर्थात होय!".
पुढं माईनं सगळाच ताबा घेतला. लग्नाची तारीख तिनंच ठरवली. नोंदणी पद्धतीनंच करायचं, हा देखील निर्णय तिचाच. घर मांडायची वेळ आली तेव्हा, तिनं आपल्याशी फारशी चर्चासूघ्दा केली नाही. आपण गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये, रेकार्डिंगमध्ये बूडालेलो आणी ही बाई भाड्याच्या घरं शोधतेय पागडीसाठी हुज्जत घालतेय. अर्थात, आपल्याला बहुधा हे जमलंही नसतं. पुढंही कधी काही करायची वेळ आली नाही,
माईनं ती येऊ दिली नाही.
मित्रमंडळ मोठं होतं कामही खूप होती टाईम मेनेजमेंटच्या बाबतीत आपला मामला तसा यथातथाच. माईनं हे सगळं मोडून काढलं पार्ट्या-पत्त्यांचे अड्डे बंद झाले नाहीत, कमी मात्र झाले. आयुष्याबद्दलच्या तिच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. स्थैर्य माणसाची वाढ रोखतं, अस ती अधुनमधुन ऎकवायची भरपूर काम मिळत होती पैसा हाती खेळू लागला होत; पण माईच्या अंगावर दागिना काही कधी चढला नाही. लोकप्रियतेचा उन्माद कधी तिनं चढू दिला नाही. माईनं आपले हातपाय सतत हलते ठेवले. धाव धाव धावायचं, विश्रांतीला थोडं थांबायचं पुन्हा पळायला सुरवात करायची माईंमुळे हे सगळ सहज वाटत होत आपण धावतोय, हे तरी कुठं कळत होतं?
ऎके दिवशी तिनं सहज विचारल्यासारखं विचारल्यासारखं विचारलं, " अजून किती दिवस नाटकं करणार आहेस रे?""म्हंजे, समजलो नाही!""नाही, बरेच दिवस रमलायस म्हणून विचारते!" त्या दिवशी संघ्याकाळी 'ललितरंग' च्या जांभेकराना आपण सांगून टाकलं 'पुढचा महिना प्रयोग करीन. एक तारखेपासून नाटकं बंद!' त्या दिवसापासून ग्रीजपेण्ट गालाला लावला नाही. आयुष्यही तसं उतरणीला लागलं होतं.
सत्कार-समारंभाचाही कंटाळा येऊ लागला होता. वक्तृत्व कितीही चांगलं असलं, तरी भाषणं देणार किती?
आणि आता ही स्थिती. अशा विकलांग अवस्थेत एखाद्या म्हताऱ्याला वीट आला असता.असह्य अवस्थेत खितपत राहण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटलं असतं; पण माईनं यातलं काही काही जाणवू दिलं नाही. लग्न ठरल्यापासूनच ती अशी वागत नाही का?
माई हे माझ्याच व्यक्तिमत्त्वाचं एक्स्टेन्शन आहे, असं मला वाटलं. अर्थातच तिला हे वाक्य आवडणार नाही बाण्याची आहे; पण खरं सागांयच, तर तो स्वतंत्र बाणा माझाच आहे. माझंच ते तुलनेनं धड असलेलं शरीर आहे. समोर लगबगीनं मीच चालतो आहे. त्या शरीरात स्वतंत्र आत्मा आहे आणि त्याचं नाव माई आहे,
इतकंच! माई माझा स्वाभिमान आहे. आख्खं आयुष्य ती माझा 'इगो' म्हणूनच वावरली आहे.
इथं समर्पण हा शब्द समर्पक ठरणार नाही. एकमेकांचा 'इगो' होणं, येस, धिस इज दी राइट स्टेटमेण्ट!
माई माझा इगो आहे आणि तिचा मी......
"उठतोस का रे..... बरं वाटतंय ना!"
"अं?"
"अरे ती मुलं आलीत-बच्चूच्या क्लबातली. तुला 'विश' करायचं म्हणतात."
"आफकोर्स.....आफकोर्स," भाईकाका हळूहळू सावरून बसले.
आम्ही गुपचुप त्याच्यांसमोर गेलो. त्यांच्या हाती टवटवीत गुलाबांचा
गुच्छ दिला.
"भाईकाका, आज व्हेलेंटाइन डे आहे ना, म्हणून आलोय!"
"काय आहे....... आज?"
"व्हेलेंटाइन डे!"
"ओह.....सो नाईस आफ यू. मी तुमचा व्हेलेंटाइन काय!"
"भाईकाका, तुम्ही आख्ख्या महाराष्टाचे व्हेलेंटाइन!"
मिस्कील नजरेनं भाईकाका हळूहळू म्हणाले. आम्ही टाळ्या वाजवल्या. भाईकाका दिलखुलास हसले. ते पाहून माई गर्रकन वळल्या आणि सरबत करण्यासाठी आत गेल्या.
झळझळीत उन्हाचा सोनेरी पट्टा थेट आतवर आला होता....................