पुलंचं देणं Pu La

' पुलं'चं लिखाण, त्यांचे परफॉर्मन्सेस आजही अनेकांना आनंद देतात, क्षणभर का होईना त्यांच्या निखळ विनोदातून जगण्यातल्या दैनंदिन विवंचनांचा विसर पडतो... 'पुलं'च्या या मोठेपणाची जाणीव मराठीतून एमए करूनही केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या या लेखकाला आहे. म्हणूनच कामाच्या निमित्ताने त्यांचा 'पुलं' आणि सुनिताबाईंशी जो काही संबंध आला, ती त्यांना त्यांच्या आयुष्यातील फार मोलाची कमाई वाटते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात, निमित्त पुलंच्या नुकत्यात पार पडलेल्या जयंतीचं...

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ; विद्याथीर् सहाय्यक समितीचा एक विद्याथीर् दुकानाचे दार उघडून आत आला. 'तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे.' -त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून 'सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत'- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गिऱ्हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 'हो लगेच निघतो' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गिऱ्हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. 'पुलं'चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गिऱ्हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. 'राहू द्या होे; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही.' त्याच्या या वाक्यातून 'पुलं'बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मागीर् लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महषिर् देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी 'रुपाली'मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि 'या' म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले. 'थोडावेळ बसा; भाई जरा नाश्ता करतो आहे' असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या. आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो. इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुचीर् देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. 'चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका' म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या. त्यांचे लक्ष नाही असे पाहून 'फार लहान करू नका, थोडेच कापा' पुलं माझ्या कानात कुजबुजले. माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या. पहिल्याच दिवशी पुलं त्यांना 'पुलं-स्वामिनी' का म्हणतात याचा अर्थ उमगला. त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतींच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व 'वा छान!' म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गंुडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले. 'चंदकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं, 'नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की 'हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणाऱ्या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील.' त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या 'तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय?' मी मनात म्हणालो 'मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते. म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता. शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो, 'एक आनंदाचं देणं'. पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे... '

- चंदकांत बाबुराव राऊत
शनीवार, नोव्हेंबर ११ २००६
महाराष्ट्र टाईम्स