पुलदैवत PuLaDaivat

साल आहे १९५६. माहीम कोळीवाडय़ाची वस्ती.. कोळ्यांच्या एका दुमजली घरात तळमजल्यावरच्या ४ खोल्यांत भाडेकरू.. त्यातल्या एका खोलीतल्या खिडकीच्या चौकटीत गजाला धरून ५ वर्षांचा मुलगा (अस्मादिक) मजेत बसलाय. घरमालकांच्या रेडिओवर गाणं लागतं.. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनांत, नाच रे मोरा नाच..’ मी खिडकीत उभा राहून पायाने ठेका धरतो.. मला अत्यंत आवडलेलं असं ते पहिलं-वहिलं गाणं. पुढे काही वर्षांनी त्यातला आशाताईंचा मयूरपंखी, मखमली आवाज दाट ओळखीचा झाला. या गाण्यावर सुरांचं मोरपीस फिरविणाऱ्या जादुगाराशी दोस्ती व्हायला आणखी काही पावसाळे सरले. पुलंची पहिलीवहिली भेट, अशी मला नकळत त्यांच्या सुरेल सुरावटीतून झाली.. आणि पुलं भेटत राहिले, वेगवेगळ्या रुपात बहुरूप्यासारखे.. तुडुंब आनंद देत राहिले, वेगवेगळ्या स्वरूपात खेळियासारखे..

५८ साली आम्ही वांद्रय़ाच्या खेरनगर हाऊसिंग कॉलनीत राहायला आलो. तोपर्यंत मी शाळेत जात नव्हतो. पुलंसारखीच मलाही शाळा अजिबात प्यारी नव्हती. आजचे माझे चित्रकाराचे हात मात्र चौथ्या वर्षीच दिसायला लागले होते, असं वडीलधारी मंडळी म्हणतात. त्या काळी प्ले-ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी ही फॉरिनची तमाम मंडळी आपल्या शारदेच्या अंगणात उगवली नव्हती. त्यामुळे आईने माझा पहिलीचा अभ्यास घरीच करून घेतला. एक दिवशी वडिलांनी ‘पाटी नाही तर फाटी’ असं अव्वल घोषवाक्य म्हटल्याबरोबर आमचं अडेलतट्टू झटकन हललं. पहिलीची परीक्षा वगैरे पास होऊन एकदम दुसरीत दाखल झालो. पुढं पुलंच्या लिखाणातून त्यांचा लहानपणीचा शाळेविषयीचा तिटकारा वाचून मलाही अगदी धन्य-धन्य वाटत असे, एवढय़ा थोर व्यक्तींशी आपलं कुठं तरी छान गोत्र जुळतंय म्हणून. चौथीपर्यंत माझी शाळेची गाडी व्यवस्थित रुळाला लागली होती. पाचवीत असताना वर्गातल्या मुलांनी नाटक केलं, ‘वयम् मोठम् खोटम्’.. मोठय़ा मोठय़ा डोळ्यांचा जगदीश वागळे त्यातलं मुख्य पात्र होता. प्रत्येक लहानग्याला मोठ्ठं व्हायची घाई लागलेली असते. त्याला मोठेपणातले तोटे ठसठशीतपणे दाखविणारं पुलंचं हे बालनाटय़. त्यातल्या विनोदी, धम्माल नाटय़ाबरोबरच नाटकाच्या नावातल्या नादानेही लक्षात राहिलं.

त्यानंतर ६७ सालची गोष्ट.. आमचा मुक्काम बोरिवली पूर्वेकडची पटेल चाळ. मी श्रीकृष्ण हायस्कूलचा १० वीचा हुशार विद्यार्थी. असो, तर एकदा सकाळी ट्रान्झिस्टरवर गांधीजींच्या ‘सत्याचे प्रयोग’च्या वाचनाचा एक भाग ऐकला. ‘सत्य’ हे मूल्य जपणाऱ्या महात्म्याच्या लेखनाचं वाचन ‘सौंदर्य’ हे मूल्य जोपासणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथांच्या घराण्यातले आपले पुलं करीत होते. किंचित सर्द आवाज, स्पष्ट उच्चार व आपुलकीनं जवळीक साधणारं सहज बोलणं. या त्रिवेणी संगमातून लेखनातले भाव गहिरे करणारं पुलंचं वाचन मला विलक्षण भावलं. पुढे त्यांनीच याला नाव दिलं ‘अभिवाचन’. अलगदपणे मी सत्याचे प्रयोग अभिवाचनाचा एक अखंड श्रोता झालो.

पुढच्या वर्षी एस. एस. सी.ला मराठीत पुलंचा धडा होता, ‘माझी लंडन यात्रा’ त्यांच्या ‘अपूर्वाई’ प्रवासवर्णनातला. त्यातलं सुरुवातीचं वाक्य अजूनही आठवतंय, ‘यजमानीणबाई’ (एअर होस्टेस) दाराशी उभ्या राहून प्रत्येकाचा आपल्या कमावलेल्या हास्यासहित निरोप घेत होता. ‘एव्हाना कमावलेलं शरीर मी निरखलं होतं, पण कमावलेलं हास्य ही फ्रेझ नवीनच होती. तिच्या ताजेपणामुळे ती कायमची घर करून राहिली. (आता आमच्या बाजूलाच एअर इंडियाची सोसायटी असल्यामुळे, तिथून कधी मधी दिसणाऱ्या एअर होस्टेसना पुलंनी अनुभवलेल्या त्या कमावलेल्या हास्यासाठी मी गुपचूप निरखित असतो.) मिस्तर धेसपांदेनी लंडनची सफर तिथल्या आडदांड बॉबीसकट इतक्या खुसखुशीतपणे घडवून आणली की केव्हा एकदा ‘अपूर्वाई’ वाचतो असं झालं होतं. वर्गातल्या मित्राने- अनिल वाघने- अपूर्वाई वाचायला दिलं नि काय सांगू गोनिदांच्या भाषेत कसं अगदी गोविंद गोविंद वाटलं आणि मग एकाचा हात धरून दुसरं, मग तिसरं, मग चौथं अशी पुलंच्या पुस्तकांची छानशी साखळी-साखळी अनिल तयार झाली- ‘पूर्वरंग’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘तुझे आहे तुजपाशी..’

दरम्यान, आचार्य अत्र्यांचं ‘मी कसा झालो’ वाचलं. त्यातला आचार्याबरोबरचा तरुण पुलंचा फोटो पाहिला. (तरुण फक्त तनाने बरं का, कारण मनाने पुलं तर ‘चिरबाल्यात’ होते. म्हणून तर त्यांनी जगण्यातलं कुतूहल अखंड तेवत ठेवलं होतं. नंतर उतारवयातल्या संधिवातासारख्या दुखण्यात तापलेल्या सांध्यांनी कुरकुर केली तेव्हा पुलंनी त्यांच्यावरही विनोदाची एक चुरचुरीत खमंग फोडणी ठेवून दिली. शिवाय हे निर्व्याज बाल्य जीवापाड जपायला पुलंना सुनीता नावाची आई व मैत्रीण पत्नीरुपाने लाभली होती. सुनीता वहिनी त्यांच्या पत्नी, सखी, सेक्रेटरी, टीकाकार व चालकही होत्या. अशी पाचपदरी राजकन्या जिंकायला पती ‘अमर्याद पुरुषोत्तम’च हवा.) तरुण पीएल व प्रौढ पिके दोघेही हाडाचे शिक्षक. महाराष्ट्राच्या एका उत्तुंग, अष्टपैलू लाडक्या व्यक्तिमत्त्वाशेजारी दुसऱ्या पिढीतलं होऊ घातलेलं उत्तुंग, अष्टपैलू लाडकं व्यक्तिमत्त्व. त्या वेळी आचार्याना माहीत असतं हा पीएल पुढे आपली गादी समर्थपणे चालवणार आहे, तर ते गरजले असते, ‘गेल्या दहा हजार वर्षांत महाराष्ट्राने इतके लाड कुणाचे केले नाहीत आणि येत्या..’

‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये अनुरागी काकाजीविरुद्ध विरागी आचार्य असं सुरेख द्वंद्व मांडून काकाजींच्या रुपाने पुलं जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडून दाखवतात. मला बालकवींची एक ओळ आठवते, ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनि घ्यावे..’ पुलंनी सौदर्याचे असे असंख्य दंवबिंदू चातकाच्या आतुरतेने अलगद टिपले. स्वत:च्या उत्तुंग प्रतिभेने त्यांचे अगणित मोती करून कुबेराच्या औदार्याने आम्हा रसिकांना ओंजळी भरभरून दिले, इथे देणाऱ्या दिव्य कलावंताचे दोनच हात, तर घेणाऱ्या रसिकांचे हजारो हात असूनही आमचीच झोळी दुबळी ठरली..

याच सुमारास रवींद्रमध्ये ‘बटाटय़ाची चाळ’ पाहिलं. माझ्यासाठी हे पुलंचं पहिलं प्रत्यक्ष दर्शन. त्याआधी शि. द. फडणीसांनी चितारलेली, सशासारखे पुढचे दोन दात दाखवीत कोवळं ससुलं हसणारी, कुरळ्या केसांची पुलंची मूर्ती डोळ्यासमोर होती. तिचं सजीव झालेलं गोमटं शिल्प प्रेक्षकांवर गारूड करीत होतं. आतापर्यंत चाळीतलं जीवन मी पुरेपूर अनुभवलं होतं. पुलंनी या एकपात्री प्रयोगात चाळीतली अनेक पात्रं आपल्या सशक्त व सहज अभिनयाने जिवंत केली. त्यांच्या परस्पर संबंधातल्या आपुलकीच्या भावनेतून तयार झालेला एक सुंदर ‘चाळ’ बांधून पुलंनी रंगदेवतेला पदन्यासासाठी अर्पण केला आहे असं वाटतं..

‘बटाटय़ाची चाळ’मध्ये पुलं लेखन, दिग्दर्शक व अभिनय या तीन रंगांत दिसले, तर फार पूर्वी त्यांनी उभारलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य कृष्णधवल ‘गुळाच्या गणपती’त बघायला मिळालं. टीव्हीवर दाखवलेल्या ‘गुळाच्या गणपती’चे सबकुछ पुलं होते. कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत, दिग्दर्शन व प्रमुख भूमिका; पण नायक कसा तर किराणा मालाच्या दुकानात काम करणारा, भोळा-भाबडा नाम्या. दिवास्वप्न बघत बघत, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधि ज्ञानेशाची..’ म्हणत डोलणारा नाम्या पुलंनी बारीक सारीक तपशिलासकट साकारला. हा अभंग गायला पुलंनी केलेली पंडित भीमसेनजींची निवड म्हणजे द्रोणाचार्यानी भीष्माचार्याना दिलेलं सुरांचं आग्रहाचं आमंत्रण होतं. एखाद्या गाण्यासाठी दुसरा गळा असूच शकत नाही, इतकं सुंदर अद्वैत हे सुरेख गाणं आणि सुरेल गळा यांचं होतं.. १९७७ च्या आसपास देशभरात आणीबाणी सुरू झाली. तिला कडाडून विरोध करणाऱ्यात भाई अग्रभागी होते. भाईंनी आणीबाणीवर भाषणात तोफा डागायला सुरुवात केली. त्या वेळी महाराष्ट्रातल्या एका थोर, गुणग्राही राष्ट्रीय नेत्याने केलेल्या अवहेलनेचं हलाहलही त्यांनी शिवाच्या सहजतेने पचविलं. ‘सौंदर्य’ हे मूल्य हळुवारपणे जोपासणारी मृदु व्यक्ती ‘स्वातंत्र्य’ हे मूल्य प्रखरतेने पाळताना किती कठोर होऊ शकते याचा तो जिवंत व ज्वलंत वस्तुपाठ होता. (पुढे कित्येक वर्षांनी सुनीता वहिनींनी लिहिलेल्या ‘आहे मनोहर तरी’च्या शीर्षकाचा अंकुर भाईंच्या या तेजस्वी धगीतून उगवला होता की काय?)

१९८१ च्या मेमध्ये मी चाळीशी ओलांडली. त्या वाढदिवसाला लहान भावाने साईनाथने ‘शुक्रतारा’ कॅसेट भेट दिली. तिला निवेदन होतं पुलंचं- एका सुंदर भिजलेल्या सुरांची दुसऱ्या सुंदर भिजलेल्या शब्दांनी ओळख करून दिलेलं. त्यात पुलं शिताफीने १९५३-५४ सालच्या रम्य आठवणींत अलगद शिरतात. अरुण दातेंच्या गळ्यात इतका भिजलेला सुंदर सूर आहे हे गुणग्राही पुलंनी पहिल्यांदा जाणलं. त्यांनी ते अरूच्या रसिकराज वडिलांना रामूभय्या दात्यांना सांगितलं.. आणि मग.. अवघं मराठी मन अरुण दातेंच्या गाण्यांमध्ये भिजू लागलं, डुंबू लागलं, डोलू लागलं..


त्यानंतर तीन-चार वर्षांनी.. एकदा संध्याकाळी व्ही. टी. (आताचे सी. एस. टी.) स्टेशनवर डेक्कनमध्ये एका व्हीआयपींना भेटायला गेलो होतो. कुपेच्या बाजूने आत शिरताना बघतो, तर समोरून साक्षात पुलं येत होते. त्यांना पुढे येऊ देण्यासाठी मी आदराने स्मित करीत क्षणभर थांबलो. त्यांचा मिष्कील, मोकळा हसत प्रश्न, ‘जायला निघालाय, की पोहोचवायला आलाय?’ मी किंचित बावरलो, गहिवरलो. एक तर लहान असल्यापासून ज्याच्यावर भक्ती जडली तो ‘पुरुषोत्तम’ प्रत्यक्ष समोर दर्शन देतोय आणि दुसरं माझ्याशी बोलतोय, मला विचारतोय. परमेश्वराने अचानक प्रगटावं आणि म्हणावं, ‘वत्सा वर मागा..’ तर भक्ताची जशी खुळ्यागत अवस्था होईल तशीच माझी झाली. ती संध्याकाळ सोनेरी झाली अन् अलगद मनाच्या गाभाऱ्यात जाऊन बसली..

मध्ये ७-८ वर्ष गेली.. एकदा रात्री टी. व्ही.वर पुलंची आणखी मैफील. त्यात पुलं म्हणाले, ‘‘पुस्तकातले शब्द जिवंत नसतात. वाचताना तेच शब्द सजीव होतात, श्वासातली ऊब पांघरून येतात.. एखाद्याचं बोलणं ऐकून तो कुठल्या प्रांतातला आहे हे मी जिल्ह्याच्या पातळीपर्यंत सांगू शकतो.’’ शब्द ‘अक्षर’ असतात हे अगदी शाळेत असल्यापासून पाठ झालं होतं; पण सरस्वतीच्या या लाडक्या सुपुत्राने केलेलं ‘वाचिक’ शब्दाचं निरूपण साक्षात्काराचा एक उत्कट क्षण पाजळून गेलं. पुलंनी त्यांच्यावर रवींद्रनाथांचा खूप प्रभाव पडल्याचं सांगितलंय. रवींद्रनाथांच्या साहित्यातलं मूळ सौंदर्य हुडकण्यासाठी पुलं ५० व्या वर्षी वंग भाषेच्या प्रेमात पडले. या प्रौढ, मनस्वी प्रेमवीराला तीही पटकन् वश झाली असावी. पुढे पुलंनी रवींद्रनाथांची एक आठवण सांगितली. कविराज रोज पहाटे उठून गच्चीवर जात असत. शिष्यांचं कुतूहल जागं झालं, गुरुदेव रोज पहाटे कुठे जातात? एकाने न राहवून, धीर करून विचारलं. गुरुदेव उत्तरले, ‘सूर्योदय बघायला’ शिष्यांचा पुढचा चौकटीतला प्रश्न. ‘पण रोज रोज सूर्योदय काय बघायचा?’ सौंदर्याचा तो निस्सीम पुजारी समजावू लागला, ‘बाळांनो, रोजचा सूर्योदय वेगवेगळा! कालचा आज नाही, आजचा उद्या नाही, उद्याचा परवा नाही..’

९९ ची राखी पौर्णिमा.. छोटय़ा बहिणीने, मनीषाने एक सुरेल बंधन भेट दिलं. ‘स्वराभिषेक- पंडित जितेंद्र अभिषेकींच्या दोन कॅसेटसचा संच. त्यातल्या दोन गीतांचे शब्द पाडगावकरांचे तर संगीत पुलंचं आहे. ‘माझे जीवन गाणे’ ऐकलं की वाटतं, गीतकार, संगीतकार व गायक या तीन श्रेष्ठींचं ‘गाणं’ झालेलं ‘जीवन’ कानांतून तनात वाहतंय नि तनातून मनात झिरपतंय. नंतरचं ‘शब्दांवाचून कळले सारे’ ऐकल्यावर माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले प्रेमविवाह केलेले दोन मिष्कील, तरुण मजनू- पाडगावकर आणि पुलं. तिसरे गंभीर अभिषेकी ‘जितेंद्र’ असल्यामुळे यांच्या प्रेमपंथापासून दूर दूर राहिले असावेत असं वाटतं.

या सर्व अनुभूतींवर कळस चढविला तो पुलंच्या एका अप्रकाशित पत्राने. २००० च्या आठ नोव्हेंबरला पुलं आपल्यात नव्हते. १२ जूनला पुलंची पावलं स्वर्गीची वाट चालू लागली होती, सुखाची लाट रसिकांसाठी मागे ठेवून.. पाच नोव्हेंबरला ‘लोकसत्ता’ने पुलंनी ५७ साली पायलट मेहुणे चंदू ठाकूर यांना लिहिलेलं पत्र छापलं. (ही ठाकूर मंडळी वाहनं चालविण्यात वाकबगार असावी. चंदू ठाकूर विमान सराईतपणे चालवायचे तर सुनीता वहिनी कार!) शिवाय १९८० मध्ये ते पत्र हाताला लागल्यावर पुलंनी लिहिलेलं दुसरं छोटं पत्रही वाचकांपुढे ठेवलं. त्यात पुलं लिहितात..

‘‘..जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. तो अर्थ काही तरी घेण्यापासून नसून काही तरी देण्यात असतो. जीवनाला आपण काही तरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुद्धीने द्यावे लागते आणि मग जीवनाला अर्थ येतो.’’
‘‘जीवनाचा मळा आपण शिंपावा, उगवलं तर उगवलं, मग कुठल्याही क्षेत्रांत तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा.’’
‘‘..ज्या दिवशी जन्माला येणं जस्टिफायेबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू; पण आज हाती आलेल्या क्षणांचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या या क्षणांची मजा हीच, की ते दुसऱ्याला दिलं तर त्या जीवनाचं सोनं, नाही तर शुद्ध माती!’’

कोणत्याही निराश झालेल्या मनाला संजीवनी मिळावे, असे हे अमृतकण वाचून मी थक्क झालो. अष्टांग योगामध्ये यम, नियम अशी सुरुवात करून साधक समाधीत विराम पावतो. तसंच पुलंची लेखन, अभिनय, संगीत, वादन, शिक्षण, वक्तृत्व, दातृत्व ही सात अंगं पार केलेलं माझं मन पत्ररुपाने प्रगटलेल्या पुलंच्या साधुत्वाजवळ नतमस्तक झालं, कृतार्थ झालं.. पुलदेमधला ‘दे’ नियतीने पुलंच्या हाती देण्यासाठी सोपवलेला ‘वर’ होता. तो त्यांनी दशदिशांतून उधळून दिलेला पाहून नियतीही कृतकृत्य झाली असेल. पुलंनी ‘दे’कारांची अशी चौफेर केलेली टोलेबाजी बघून त्यांच्या जमान्यातले सी. के., आमच्या पिढीचा सुनील व आताच्या जनरेशनचा सचिन या दिग्गज बल्लेबाजांनीही आपआपल्या बॅटी गुपचूप म्यान केल्या असत्या..

पुलं सुनीता वहिनींसह देण्याच्या आनंदडोही अगदी आकंठ बुडाले होते. विचार, उच्चार व आचार या त्रिसूत्रींतून उभयतांचं मन, तन व धन ‘दानरंगी’ रंगलं. पुलंनी सकस साहित्यातून सात्विक विचार दिले, सृजनाची अनिवार ओढ दिली, सुरावटीतून सुरेल संगीत दिलं, प्रस्तावनेतून उत्कट उत्तेजन दिलं, एकपात्री प्रयोगातून सहज अभिनय दिला, संवादातून सदभिरूची दिली, अभिवाचनातून गहिरं भावदर्शन दिलं, संवादिनीतून संपन्न सूर दिले, देणग्यांमधून सहृदयता दिली आणि सुखी जीवनाचा ओंकार दिला. प्रभु रामचंद्रांच्या दासांच्या- स्वामी समर्थाच्या- ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ या अवघड प्रश्नाला लक्ष्मणरावांच्या सुपुत्राच्या- पुलंच्या- सोऽहम्ने मनस्वी हुंकार खात्रीने दिला असला पाहिजे..

पन्नास वर्षांच्या प्रवासातले पुरुषोत्तमांच्या परीस स्पर्शाने पवित्र झालेले हे क्षण. या क्षणांची ही छोटीशी माळ माझ्या पुलदैवताला आणि सुनीतावहिनींना कृतज्ञतेने अर्पण.. ज्या माऊलीनं पुलंबरोबर कारमधून प्रवास करताना नाइलाजाने स्टीअरिंग व्हील सतत आपल्या हाती ठेवलं, पण जीवनातल्या यात्रेत जी जाणीवपूर्वक सतत पीलियन रायडर होऊन पुलंना स्फूर्ती, शक्ती, युक्ती व भक्ती अखंड देत राहिली.. अष्टपैलू सृजनाआडच्या त्या उत्कट समईला.. आणखी काही वर्षांनी मी आजोबा झालेलो असेन.. मांडीवर एखादं नातवंडं खेळत असेल.. माझी पिकलेली मिशी ओढणाऱ्या नातवंडाला मी गोष्ट सांगेन, ‘एक होते पुलं..’

मोहन रत्नाकर रावराणे
८ नोव्हेंबर २००९
लोकसत्ता