काही विशिष्ट प्रदेशांच्या आणि राष्ट्रांच्या जीवनात काही भाग्ययोग येतात. तेथील जीवनसंचिताचा आविष्कार करणारे प्रतिभावंत साहित्यिक, चित्रकार, नट, गायक आणि प्रज्ञावंत त्यांना लाभत असतात. बंगालला रवींद्रनाथ आणि शरच्चंद्रांच्या रूपाने थोर साहित्यिक लाभले. प्रदेशाची सीमा ओलांडून ते साऱ्या भारतवर्षाचे रवीचंद्र ठरले. मानबिंदू ठरले. त्यांचा भारतीय मनावरील प्रभाव, परिणाम आणि संस्कार सर्वज्ञात आहे.
महाराष्ट्राला महानुभव पंथापासून आतापर्यंत अशी प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा लाभलेली आहे. अलीकडच्या कालखंडातील पु. ल. देशपांडे हे सव्यसाची साहित्यिक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कितीतरी पैलू. प्रत्येक पैलू तेजोमय. इतरांचेही जीवन उजळून टाकणारा. आल्हाद देणारा अंतर्मुख करणारा, जीवनातील सुसंगतीवर प्रेम करायला लावणारा. "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' या शब्दांत त्यांचा झालेला गौरव सार्थ आहे. लाड पुरवण्याइतके त्यांचे व्यक्तिमत्त्व लोभसवाणे होते, कलासक्त होते, समृद्ध होते. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संचितावर निस्सीम प्रेम करणारा त्यांच्यासारखा माणूस दुर्मिळच. ते गुणवान गुणी माणसाची कदर करणारे आणि "गुण गाईन आवडी' हेच त्यांचे ब्रीद. "व्यक्ती आणि वल्ली', "गणगोत', "गुण गाईन आवडी', "मैत्र', "आपुलकी' या पुस्तकांतील व्यक्तिचित्रांची मालिका वाचा. या एकूण परिक्रमेत सामान्यांपासून असामान्यापर्यंतच्या अंतरंगातील सत्त्वधारा हेरण्याची त्यांची चोखंदळ, रसिक आणि मर्मगाही वृत्ती दिसून येते.
पुलं श्रेष्ठ विनोदकार होते. पण, एवढ्यापुरती त्यांच्या कर्तृत्वाची व्याप्ती मर्यादित करता येणार नाही. जीवनाचे सजग भान ठेवून त्यांनी गंभीर लेखनही तेवढ्याच तन्मयतेने केलेले आहे. ते सरसरमणीय आणि अंतर्मुख करणारे आहे. जीवनोत्सुकता, जीवन सौंदर्यावरील उत्कट प्रेम आणि जीवनाच्या सर्वंकष पैलूंचे सम्यक आकलन करून घेण्याची प्रगल्भता ही त्यांच्या स्वभाव धर्माची त्रिसूत्री होती. समकालीन जीवनवास्तवावर चिंतनशील वृत्तीने हसतमुख राहून भाष्य करणारा त्यांच्यासारखा साहित्यिक विरळा. पु. ल. देशपांडे आपल्यातून १२ जून २००० रोजी गेले. नऊ वर्षे झालीत त्या घटनेला. पण आजही पुलं आपल्या अवतीभोवती वावरत आहेत असेच वाटत राहते. याचे कारण त्यांनी अक्षरांच्या माध्यमातून निर्माण केलेले आनंदविश्व. आपला लेखक आपल्या नित्य अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनणे हादेखील एक भाग्ययोग. पुलंच्या विविधरंगी आणि विविधढंगी विनोदाने आमच्या जीवनशल्यांवर नेहमीच खपली धरली गेली. आमचे जीवन सुसह्य झाले. झाले काय? महाराष्ट्राची चतुःसीमा या श्रेष्ठ साहित्यिकाने आपल्या साहित्यभूमीद्वारे कधीच पार केली होती. त्यामुळे ते भारतात सर्वमान्य झाले. परदेशातही त्यांची कीर्ती पसरली.
पुलंचे गुणवैशिष्ट्य हे की, त्यांनी स्वतःला आत्मकोशात कधी गुरफटून घेतले नाही. ते समाजसन्मुख राहिले. समाजाचे झाले. स्वागतशीलता हा त्यांचा स्थायी भाव. त्यामुळे ते सदैव सूर्यफुलासारखे सतेज आणि टवटवीत राहिले. अनारोग्याचा बाऊ त्यांनी कधी केला नाही. त्यामुळे मनाने ते निरंतर प्रसन्न राहिले. समाजाची निरागसता आणि निरामयता त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जपली.
या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करणाऱ्या माणसांविषयी पुलंनी सदैव "मैत्र' जोडले. त्यांनी आपल्याला आवडलेल्या व्यक्तींच्या शब्दमूर्ती घडवल्या. त्या अप्रतिम आहेत. "गुण गाईन आवडी' हे त्यांच्या ग्रंथासंपदेतील अक्षय लेणे. नाट्य व संगीताचे क्षेत्र पुलंना अधिक प्रिय. अर्थात त्या क्षेत्रातील केशवराव दाते, बापू माने, राम गणेश गडकरी यांना प्राधान्य मिळाले. भास्करबुवा बखले, मल्लिकार्जुन मन्सूर, लता मंगेशकर, वसंत पवार, पं. वसंतराव देशपांडे आणि कुमारगंधर्व या दिग्गज गायक-गायिकांविषयी त्यांनी समरसतेने लिहिले. समर्पित भावनेने देशकार्य आणि समाजकार्य करणाऱ्या बाबा आमटे, सेनापती बापट, डॉ. राममनोहर लोहिया यांच्यावरचे लेख वाचल्यानंतर पुलंच्या श्रद्धास्थानांची कल्पना येते. बा. भ. बोरकर आणि इरावतीबाई कर्वे यांच्यावरील लेख म्हणजे त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा अंतर्वेध. अशी ही नाट्य, संगीत, साहित्य या कलांसंबंधीची रंगलेली मैफल कधी संपूच नये असे वाटते.
"गणगोत' मध्ये चिरपरिचित थोर माणसे जशी भेटतात तशीच सर्वसामान्य माणसेही भेटतात. छोट्या दिनेशपासून मोठ्या विनोबांपर्यंतची मंडळी येथे भेटते. शून्यातून नवी सृष्टी करणारे प्रकाशक रा. ज. देशमुख येथे भेटतात. अभिजात आणि अभिरुचीपूर्ण ग्रंथांची निगुतीने जोपासना करणारे "इंटरनॅशनल'चे विठ्ठलराव दीक्षितही भेटतात. ही मांदियाळी भेटल्यामुळे आपण समृद्ध झाल्याची जाणीव होते. या आनंदविश्वात आपण रममाण होतो. "व्यक्ती आणि वल्ली' मधील जिवंत आणि रसरशीत व्यक्तिचित्रे. हा मराठी व्यक्तिचित्रांमधील चिररुचिर आविष्कार आहे. अस्थी-चर्म-मांस-पेशीयुक्त आशयद्रव्याला येथे पुलंच्या प्राणशक्तीचा चैतन्यशील स्पर्श होऊन, ही पात्रे रसिकांबरोबर संवाद साधायला लागतात. "आपुलकी' मधील व्यक्तिचित्रे म्हणजे पुलंच्या हृदयस्थ श्रीमंतीचे प्रकटन. यातील सौहार्दाचा भाव हा पुनःपुन्हा स्मरण करण्यासारखा.
पुलंच्या "बटाट्याची चाळ', "खोगीर भरती', "नस्ती उठाठेव', "गोळाबेरीज', "हसवणूक', असा मी असामी', "अघळपघळ', "उरलं-सुरलं' आणि "पुरचुंडी' या विनोदी लेखनाचा परामर्श स्वतंत्र रीत्या घ्यायला हवा. कोटीयुक्त भाषाशैली, समकालीन समाज जीवनाचे बारकावे आणि विडंबन कौशल्य हे या विनोदी लेखनाचे गुणविशेष आहेत. मराठी भाषेवरील विलक्षण प्रभुत्व आणि असामान्य बुद्धिमत्ता यांचा स्वरसंगम या लेखनात आढळतो. निखळ आनंदाचे कारंजे निर्माण करणारी निर्मितीशील प्रतिभा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ठायी आहे. शिवाय समष्टिमनाच्या कंगोऱ्यांकडे सूक्ष्मपणे पाहण्याचे आणि त्यांच्यातील विसंगती नेमकेपणाने हेरण्याचे कौशल्य पुलंकडे आहे.
"अपूर्वाई', "पूर्वरंग' आणि "वंगचित्रे' ही पृथगात्म प्रवृत्ती दर्शवणारी प्रवासवर्णनेही पुलंनी लिहिली आहेत. "अपूर्वाई' आणि "पूर्वरंग' ही प्रवासवर्णने विनोदी लेखनाच्या अंगाने विकसित झालेली आहेत. अनेक वाङ्मय प्रकारांना कवेत घेण्याची अपूर्वाई "अपूर्वाई' आणि "पूर्वरंग' मध्ये आहे. "वंगचित्रे' हे प्रवासवर्णन आगळे-वेगळे आहे. आत्मचरित्राचे काही विलोभनीय रंग त्यात मिसळले आहेत. लालित्याच्या अनेक छटा त्यात दिसतात. चिंतनाची ऊब त्याला प्राप्त झालेली आहे. पन्नासाव्या वर्षी बंगाली शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेने पुलं १९७० मध्ये शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिले. तेथे रमले. या रमणीय वास्तव्यातील संस्मरणे अत्यंत प्रसन्न शैलीत त्यांनी टिपलेली आहेत. "वंगचित्रे' वाचल्यावर न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या रवींद्रनाथांच्या, शरच्चंद्राच्या अन बंकीमचंद्राच्या भूमीत सहजतेने पावले पडायला लागतात. "पाताय पाताय टुपुर टुपुर नुपूर मधुर बाजे' असे रवींद्रसंगीताचे नादनिनाद उमटतात. बदलत्या काळातही रवींद्रनाथांचा वाङ्मयात रममाण होणारा आणि सांस्कृतिप्रिय बंगाल अंतर्यामी जागवण्याचे सामर्थ्य पुलंच्या तेजस्वी, काव्यात्म आणि मधुर लेखनात आहे.
पुलंनी "तुझे आहे तुजपाशी'सारख्या नाटकातून काकाजींसारखी अजरामर व्यक्तिरेखा निर्माण केली. मराठीच्या नाट्यसंसारात काकाजींचे विस्मरण रसिकांना कसे होईल? मराठी नाटकाला नवी आशयसूत्रे पुरवण्यासाठी "सुंदर मी होणार?', "ती फुलराणी' व "एक झुंज वाऱ्याशी' इत्यादी नाटके त्यांनी रूपांतरित केली. पण, ती पुलंस्पर्शामुळे रूपांतरे वाटत नाहीत. या भूमीत रूजून आलेली स्वतंत्र नाटके वाटतात.
पुलंच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष येथे अधोरेखित करायला हवा. मराठीतील अनेक प्रथितयश लेखकांच्या साहित्यकृतींना प्रस्तावना लिहून त्यांनी पाठराखण केली आहे. बा. भ. बोरकर (आनंदयात्री रवींद्रनाथ), प्रकाश नारायण संत (वनवास), राम नगरकर (रामनगरी), दया पवार (बलुतं) आणि आनंद यादव (झोंबी) यांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना उल्लेखनीय आहेत. सहानुभूतिपूर्ण दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व समजून घेणे हा त्यांचा स्वभावधर्म. दया पवारांच्या लेखनाचा उद्देशून ते "दुःखानं गदगदलेलं झाड' असे म्हणतात, तर आनंद यादवांच्या "झोंबी' या आत्मचरित्रात्मक कादंबरीला उद्देशून "एक बाल्य हरवलेलं बालकांड' असे म्हणतात.
पुलंच्या हसवणाऱ्या अक्षरांनी आजवर अक्षरक्षितिज निर्माण केले आहे. या अक्षरक्षितिजाकडे जाणारी पाऊलवाट ही असीम आनंदाची आहे...
-- डॉ. सोमनाथ कोमरपंत