संस्कार --- पु.लं. देशपांडे Sanskar by Pu La Deshpande

संस्कारांचे वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रुढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे त्या रुढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कॄत असे सोयिस्कर ग्णित मांडले जाते.

लहान मुलांच्यावर संस्कार म्हटले की, मराठी मध्यमवर्गिय किंवा उच्च मध्यमवर्गिय लोकांच्या डोळ्यांपुढे प्रथम 'शुभं करोति कल्याणमय', मुजं, देवाची प्राथना अशा प्रकारचीच चित्रे उभी राहतात. या देशातल्या अपार दारिद्र्याशी टक्कर घेत जगणार्‍या समाजाला तर लहान मुलांवर संस्कार करणे वगैरै परवडतच नाही. रस्त्याकाठी गवत वाढते तशी मुले वाढतात पण जो सुस्थित समाज मानला जातो, तिथेही 'संस्कार' या शब्दामागे हिंदूचे सोळा संस्कार याहून फारशी निराळी कल्पना नसते. अमेरिकेत स्थायिक होऊन तिथली जगण्याची पध्द्त पाळणारे आईबापदेखील इथे येऊन आपल्या मुलाची 'मुंज' लावतात आणि मुलावर भारतीय येतात आणि होमहवनाच्या संस्कारात आपला लग्नसमारंभ पार पाडून बायकोसकट परततात. 'अमेरिकेत राहिला तरी आपले संस्कार विसरला नाही हो-' हे वर कौतुक. (या संस्कारात हुंडा घेणे, वस्तु पाहावी तशी मुलगी पाहणे वगैरै सर्व काही बसते,)

संस्काराचे वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रूढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे त्या रूढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कृत असे सोयेस्कर गणित मांडले जाते. आपल्या घरातला केरकचरा शेजारच्या वाडीत टाकणे, खिडकीतून पान खाऊन थुंकणे अगर केसांची गुंतवळ टाकणे हा संस्कारहीनतेचा नमुना मानला जात नाही.

वरच्या गॅलरीत लुगडी, चादरी वगैरै वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यतं लोंबू देणे किंवा वेळेचे बंधन न पाळता आपल्यासाठी कुणालाही तिष्ठत ठेवणे किंवा पूर्वसूचना न देता कुणाकडेही गप्पांचा अड्डा जमवायला जाणे आणि भेटीची वेळ ठरवूनही वेळेवरही न जाणे, लोकांना तिष्ठत ठेवणे- असली वागणूक के एक संस्कार नसल्याचे लक्षण आहे हे फारसे कुणाला पटलेले दिसत नाही.

जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत, त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिध्द होते ती खरी संस्कृतीः ग्रंथात असते ती नव्हे. जीवनात आपल्याइअतकाच दुसर्‍याही माणसाला निर्वेधपणाने जगायचा अधिकार आहे हे जोपर्यत आपण मानत नाही, तोपर्यतं आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही. म्हणून स्वतःचे आणि ज्या समाजात आपण जगतो आहोत त्या समाजाचे जीवन आपल्या वागण्याने अधिक दुःखमय होणार नाही, अशा दक्षतेने जगण्याची जाणीव मुलांच्यात लहानपणापासूण निर्माण करणारे संस्कार कुठले याचा विचार सतत व्हायला हवा.

जी सुस्थित माणसे आहेत त्यांच्यावर तर अशा त-हेच्या चांगल्या सामाजिक जाणिवा जागृत करून मुलांना वाढविण्याची अधिक जबाबादारी आहे. कारण त्यांच्या वागण्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्या घरातल्या मुलांना, दुर्बल परिस्थितल्या मुलांना आधाराचे हात देण्याची सवय अधिक कटक्षाने लावावी लागते. मुलांमध्ये वास्तविक ही सहानभूती उपजत असते. श्रीमंत आईबापच त्यांच्यात नकळत गरीब मुलांविषयी तीटकारा उत्पन्न करत असतात. माझ्या मित्राची मुलगी एकदा आपल्या आईला रोजच्या डब्यातून गोड पदार्थ पाठवू नकोस. नुसती पोळभाजी पाठव, असे सांगू लागली. वास्तविक या पोरीला गोडाची आवड. त्या मुलीने आईला सांगितले, की तिच्या वर्गातल्या तिच्या ज्या आवडत्या मैत्रिणी आहेत त्यांच्या पालकांना मुलीच्या डब्यातून गोड पाठवणे परवडत नाही. त्यामुळे हिला एकटीला गोड खाणे आवडत नाही. सहा-सात वर्षाच्या मुलीला हे कळू शकते. मुलीच्या मनातल्या सहानभूतीचा आईलाही खूप अभिमान वाटत होता. तो रास्तच होता.

मी एकदा चांगल्या श्रिमंतांच्या मुलांच्या म्हणता येईल, अशा एका शाळेत समारंभाचा पाहुणा म्हणुन गेलो होतो. कुठल्याही शाळेचे चारित्र्य तिथे विद्यार्थ्यासाठी असणार्‍या मुत्र्या आणि पायखान्यांच्या अवस्थेवरून ध्यानात येते, असे माझे मत आहे. त्या शाळेची इमारत मोठी होत.

"तिथं नको. वर मुखाध्यापकांच्या खोलीत स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. तिथं आपण चला - " कुणीतरी लगबगीने म्हणाले.

"असू दे - इथं काय वाईट आहे? " असे म्हणून मी त्या दिशेला गेलो. सार्वजनीक म्युनिसिपाल्टीच्या किंवा एस.टी स्टँडवरच्या मुतार्‍या इतकीच ही शाळेची मुतारी गलिच्छ होती. मुलांनी सर्वत्र शौच करुन ठेवलेले होते. जीचघेणी दुर्गंधी होती. मी काहीही न बोलता परत फिरलो. शिक्षकांच्या लक्षात आले. "मुलं ऎकत नाहीत..." अशासारखे ते काहीतरी पुटपुटले.

मी विचारले, "संडास कसा वापरावा याचे तुम्ही काही संस्कार मुलांच्यावर केलेत का?"संडास आणि संस्कार हे दोन शब्द मी एका वाक्यात आणलेलेही त्या 'सरां' ना रूचले नसावे. चहापानाच्या वेळी काही पावलांची गाठ पडली. त्यापैकी तिथले संडास स्वच्छ असतात की नाही, तिथे पिण्याची भांडी निट घासलेली असतात किंवा नाही, आपली मुले डब्यातील पोळीभाजी कुठे बसून खातात, त्यांचे खाणे झाल्यावर मुलांनी हात पुसले की नाही हे पाहणारे कुनी असते की नाही. यापैकी कशाचीही चौकशी केलेली नव्हती. किंबहुना मी 'शैक्षणिक समस्या'. 'आकृतीबंध' यांसारख्या विषयांवर न बोलता 'शालेय संडास' हा विषय सुरू केल्याची नाखुशीच त्या शिक्षाकांच्या आणि पालकांच्या चेहर्‍यावर दिसत होती.

जरा वय वाढले की त्यांना मित्रमैत्रिणीत रमायला आवडते, तरीही आईबापांचा सहवास त्यांना हवाच असतो. आपल्या मित्रमैत्रिणींचे गैरहजेरी जाणवावी असेही वाटते. शक्य असल्यास आपल्या एखाद्या गरीब मित्राला आर्थिक साहाय्य करण्यात आईवडिलांनी पुढाकार घ्यावा अशी एखाद्या मुलाची इच्छा असते. अशा प्रकारच्या संस्कारांतून आईवडिलांनी मुलाचास्वतःविषयीचा विश्वास वाढवत वाढवत त्याला स्वातंत्र्याचा आनदं मिळवायला पात्र करायला हवा. त्यासाठी मुलांशी सतत आनंदाच्या वातावरणात संवाद हवा. तो नसतो म्हणून तर जनरेशन गॅप पडते. वाढत्या वयातल्या मुलामुलींचे आणि पालकांचे संबंध बिघडण्याचे महत्वाचे कारण या पालकांनी मुलांसाठी आपल्या आयूष्यातला वेळेच खर्च केलेला नसतो हे त्यांच्यावर लादायचे. आपल्या देशात गुलामी वृत्तीची जोपासना केवळ बाप असल्यामुळे सर्वांनी आपले पाहीजे आणि आपण म्हणतो तेच खरे अशा वृत्तीने संसार चालवण्यार्‍या कुटंबप्रमुखांनीच केलेली आहे. मुलांनी काय व्ह्यायचे, मुलींनी कोणाशी लग्न करायचे, किती शिकायचे हे सारे या गृहस्थाने ठरवायचे.

यालाच शिस्त, संस्कार,आज्ञाधारकता वगैरै मानण्यात येऊ लागले. माझे एक सामान्य आर्थिक परिस्थितीतले स्नेही आपल्या आठ-नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन गाण्याच्या बैठकीला आले होते. मी विचारले, "मुलाला गाण्याची आवड आहे वाटतं?" ते म्हणाले, "नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वाच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज या गाण्याला यायंच का, असं विचारल आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला? आयूष्यभर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो'." 'संस्कार' याचा अर्थ या बापाला कळला असे मला वाटते.

('बियॉण्ड फ्रेंण्डशिप' च्या सौज्यनाने)पु.लं. देशपांडे.