विवाहानिमित्त पुलोपदेश Vivahanimitta Pulopdesh


पुलोपदेश 
-----------------------------------------------

डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र...

पु. ल. देशपांडे,
१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे - ४.८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात
महत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर 'लग्न' या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. "A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding".लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या
माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा 'मी अव्यवस्थित आहे', या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे 'तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस', असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही!) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. ('तरुणी' हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)
गाफीलपणाने खोकला काढलास तर 'हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-?' या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.

सुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले? या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे! डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे!) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही!) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.

कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव (अख्यक्ष शेणवी सहकारी पेढी) विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्मेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी 'पंजा'चे राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणा-या 'शॉपिंगला' उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल,याचे ''अरे वा!'', ''छान!'', ' O Wonderful!'' अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना 'ही साडी नेसू का?' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा! हूंss! - हो हो -, छान - फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर 'ही नेसतेस?' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू? तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्वाचा नाही. त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, साली बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. साली टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, साले बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम साली आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे. कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू? तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो. तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे? साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला? - करणार काय? मीच इडियट साला. वाईफचा बर्थ डे विसरलो. ''

असो. नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणा-यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमख्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवोन संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल. तथास्तु.

तुझा
पी. एल. काका आणि सुनिता मावशी