शिवचरित्रमाला - भाग १०४ - गुणीजनांचा राजा

राजपुरीच्या किल्ल्यावर मध्यरात्रीदारूगोळ्याचा प्रचंड स्फोट झाला. मराठीसैन्य मारले गेले. जे कोणी मराठे सिद्दींना जिवंत सापडले त्यांचेही मरण अटळच होते. किनाऱ्यावर वा सागरात एखाद्या गलबतावर सिद्दींना कुणी मराठे सैनिक जिवंत सापडले तर त्यांना हे सिद्दी कधीही सोडत नसत. त्यांना ते भयंकररीतीने ठार मारत असत. शिवाजी महाराजांचे सैनिक होणे हे एक खडतर व्रतच होते. हे व्रत शिवसैनिकांनी तान्हाजीप्रमाणे बाजी प्रभूप्रमाणे बाजी पासलकरांप्रमाणे येसबा दाभाड्यांप्रमाणे आणि गडकोटांच्या तटाबुरुजांप्रमाणे सांभाळलं. 

एक विलक्षण गोष्ट 
या राजपुरीच्या भयंकर रात्री घडली. शिवाजी महाराज हे रायगडापासून एकमजल अंतरावर या रात्री छावणीत होते. मध्यरात्रीचा हा सुमार. महाराजांना गाढ झोप लागली होती. एवढ्यात अचानक महाराज दचकून जागे झाले. पहाऱ्यावर असलेली भोवतीची मराठी माणसे झटकन जवळ आली. महाराज एकदम का जागे झाले अन् का बेचैन झाले हे त्यांना समजेना. महाराज त्यांना म्हणाले , ' काहीतरी भयंकर घोटाळा झाला आहे. ताबडतोब दांडा राजपुरीकडे स्वार पाठवा. खबर आणा. 

एक दोन 
स्वार राजपुरीच्या रोखाने दौडत गेले. राजपुरीच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच त्यांना समजले की रात्री राजपुरीवर सिद्द्यांचा हल्ला झाला. दारूगोळ्याचं कोठार उडालं. राजपुरी गेली. सिद्द्यांचे निशाण लागले. स्वार परतले. महाराजांना ही खबर त्यांनी सांगितली. हा एक फार मोठा धक्काच होता. दु:खही होते. पण उपाय काय जंजिऱ्याची मोहिम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. राजपुरीचे अपयश कुणामुळे या खबरा इंग्रजास समजल्या. त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे अर्थ लावला की मराठी सैनिक राजपुरीस दारू पिऊन चैनीत नाचगाणी करीत होते. त्यामुळे हा पराभव मराठ्यांचा झाला. पण ही शक्यता वाटत नाही. कारण लष्करी छावणीत आणि किल्लेकोटांत ताडी माडी दारू वा अमलीपदार्थ यांना सक्त बंदी होती. राजपुरीसारख्या जंजिऱ्याच्या ऐन तोंडावर असलेल्या या मराठी ठाण्यांत अशी दारूबाजी घडणे संभवनीय वाटतच नाही. शिवकालीन स्वराज्याच्या इतिहासात अशा गाफीलपणाने वा व्यसनबाजीने आत्मघात झाल्याचे एकही उदाहरण अजून तरी सापडलेले नाही. हा व्यसनबाजीचा आरोप महाराजांनीही केल्याची नोंद नाही. 

हा केवळ 
त्रयस्थांनी केलेला तर्क आहे. मात्र शत्रूचेही कौतुक केले पाहिजे की त्यांनीमराठ्यांइतकेच कुशलतेने गनिमी काव्याचे युद्धतंत्र वापरून हा अवघड डाव फत्ते केला. यातूनही खूप शिकण्यासारखे असते. शत्रूचे डावपेच कसे असू शकतात याचाही धडा मिळतो. राजपुरीमुळेजंजिऱ्याची मोहीम स्थगित करावी लागली आणि महाराजांनी मोर्चा वळविला मोगलांकडे. यापूवीर् कोकण किनाऱ्याचा महाराज किती गंभीरपणे विचार करीत होते हेही लक्षातघेण्यासारखे आहे. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांचे वास्तव्य सर्वांत जास्त दिवस कोकण भागात झाले. कोकणात किल्ले दोन प्रकारचे. सागरी आणि किनारी. सागरी किल्ला बेटावर बांधलेला असायचा. त्याला म्हणायचे जंजिरा आणि किनाऱ्यावरचा किल्ला हा एका किंवा दोन बाजूंनी जमीन असलेला आणि एका बाजूनी समुद असलेला असा असायचा. महाराष्ट्राच्या एकूण सागरी किनाऱ्यावर सागरी आणि किनारी अशा किल्ल्यांची संख्या सुमारे ६५ होती. त्यापैकी खांदेली उंदेली दुर्गाडी अलिबागपासून ते तेरेखोलपर्यंत बहुसंख्य किल्ले महाराजांनी काबीजकेलेले होते. काही थोडेसेच किल्ले जंजिरेकर सिद्दी पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज यांच्या ताब्यात होते. मुंबईचा किल्ला ज्याला आपण आज फोर्ट म्हणतो तो इंग्रजांनीच बांधला.माहिमपासून थेटवर सुरतेपर्यंत कोकण किनाऱ्यावर महाराजांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. हा भाग मुख्यत: पोर्तुगीज इंग्रज आणि मोगल यांच्या कब्जात होता. 

महाराजांचे 
आरमार उत्तम होते. यात शंका नाही. साठ किंवा काही साठाहूनही अधिक टनवजनाची गलबते स्वराज्यात होती. 

आरमारावरील माणसे उत्तम 
दर्जाची लढाऊ होती. खरोखर त्यांच्या शौर्याला तोड नव्हती. स्वराज्यात असलेले किनाऱ्यावरचे एकही ठाणे शत्रूला कधीच जिंकता आले नाही. यातच या सागरी समाजांचे म्हणजे आगरी कोळी भंडारी आणि कोकणी मराठे यांचे सार्मथ्य अन् निष्ठा व्यक्त झाली होती. पुढच्या काळात तर औरंगजेबाला महाराष्ट्राशी पंचवीस वर्ष अव्याहत झुंजूनही कोकणात अजिबात यश मिळाले नव्हते. शाहजादा अजीम शहाबुद्दीन खान आणि सरदारखानयांच्यासारख्या उत्तम मोगली सेनापतींनाही कोकण किनाऱ्यावर यश मिळाले नव्हते. उलट त्यांनी मारच खाल्ला होता. क्वचित कल्याण भिवंडीसारखे खाडीवरचे मराठी ठाणे मोगलांनी जिंकले. पण ते पुन्हा मराठ्यांनी थोड्याच अवधीत काबीज केले असे दिसून येते. 

कोकणात स्वराज्य आल्यानंतर एक गोष्ट 
निश्चित प्रभावीपणे दिसून येत गेली की कोकणी गावांना व जनतेला चाचे लोकांचा आणि फिरंगी घुसखोरांचा उपदव झाला नाही. तो बंदच झाला.कोकणातील जनतेला फार हाल सहन करावे लागत होते. ते पूर्ण बंद झाले. महाराजांनी आता तर राजधानीच कोकणात आणली. रायगड हा कोकण आणि मावळ यांच्या घाटमाथ्यावरच उभा आहे. महाराजांनी सर्वात जास्त उपयोग करून घेतला कोकणातील मनगटांचा आणि बुद्धीमत्तेचा. राष्ट्र उभे करायचे असेल तर सोन्याच्या कणाकणाप्रमाणे गुणी कष्टाळू प्रामाणिकआणि हुशार माणसे वेचावी लागतात. त्यात जातीपातींचा भेदभाव करून चालत नाही. तो केल्यास राष्ट्र कधीही समर्थ होत नाही. संपन्नही होत नाही. गुणी माणसे हाताशी धरून ती घडवावी लागतात. महाराजांनी अशी माणसे घडविली. 

दौलतखान 
लायजी सरपाटील मायनाक भंडारी सिदी मिस्त्रीखान इब्राहिम खान ,वल्लभदास सुंदरजी परभुज बाळाजी आवजी चित्रे रामाजी अनंत सुभेदार दादंभट उपाध्येविश्वनाथ भट्ट हडप बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर सुभानजी नाईक कृष्णाजी नाईक ,अडिवरेकर तावडे दसपटीकर शिंदे मोकाशी खानविलकर सावंत धुळप शिकेर् केशव पंडित पुरोहित आंगे दर्यासारंग आणखी किती नावं सांगावीत शाई पुरणार नाही. कागदपुरणार नाही. महाराजांचे मन मात्र अशी माणसे जमविताना पुरून उरत होतं. म्हणूनच कोकणपट्टा अजिंक्य बनला. ही सांगितलेली यादी मुख्यत: कोकणातील कर्तबगार घराण्यांचीच आहे.