शिवकालातील हिंदुस्थानच्या राजकीय स्थितीचा विचार मनात येतोच. महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांनी स्वातंत्र्यासाठी शत्रूविरुद्ध उठाव केला. त्यांना एकच शत्रू नव्हता. विजापूरचा आदिलशाह , दिल्लीचा औरंगजेब , जंजिऱ्याचा सिद्दी , गोव्याचा पोर्तुगीज , मुंबईचा इंग्रज , गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि अंतर्गत अनेक स्वकीय संधीसाधून स्वराज्याला विरोध करत होते ,त्यांचीही संख्या थोडी नव्हती. यातीलगोवळकोंड्याच्या कुतुबशाहाशी प्रत्यक्ष संघर्ष फारसा घडला नाही. पण बाकी सर्वांशी महाराजांना झुंज द्यावी लागत होती.
डच , फेंच , अरब इत्यादी परकीय त्यामानाने लहानलहान असलेले महत्त्वाकांक्षी व्यापारीही थोडा थोडा त्रास देतच होते. या सर्व शत्रूंत काही सागरी शत्रू होते. बाकीचे भुईशत्रू होते. एवढ्याया अफाट शत्रूबळाशी झुंजत झुंजत महाराजांना स्वराज्याचा विस्तार आणि संरक्षण करण्याचा उद्योग किती कष्टमय पडला असेल याचा विचार आपल्या मनात येतच नाही. आपण फक्तशिवचरित्रातील नाट्यमय घटनांवर लुब्ध होतो अन् पुस्तक मिटवून आपल्या संसारात लगेच मग्नही होऊन जातो.
या साऱ्या राजकीय संकटांच्या वणव्यात उभ्या असलेल्या पण तरीही स्वातंत्र्यांच्या ईश्वरी कार्यात तन्मय झालेल्या शिवाजीराजांच्या जीवनकार्याचा आपण सर्व बाजूंनी विचार , मनात आणिअनुकरणही करण्याचा प्रयत्न केला नाही , तर करमणुकीशिवाय आपल्या पदरात काहीही पडणार नाही.
वर्तमानकालीन म्हणजेच आजची आपल्या देशाची आणि संपूर्ण भारतीय जनतेची मनस्थिती आणि कृती पाहिली की , मन चिंतेने काळवंडून जाते. स्वार्थ , व्यसनाधीनता , जातीद्वेष ,भाषाद्वेष , प्रांतद्वेष , धर्मद्वेष , बेशिस्त आणि बेकायदेशीर वागणूक , एक का दोन ? अनंत आत्मघातकी व्यक्तिगत आणि सामूहिक कृत्यांचे पुरावे म्हणजे आमची रोजची वृत्तपत्रे. आम्ही आमच्या अविवेकी वर्तनाचा कधी विचारच करणार नाही का ? उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो गावांना वणवण करावी लागते अन् अनेक राष्ट्रीय जलाशयातले पाणी आणि वीज आम्ही चोरून वापरतो. अनेक जलायश फुटतात अन् पाणी स्वैर वाहून जाते.
एक की दोन ? किती यातना सांगाव्यात! वास्तविक जीर्णशीर्ण अवस्थेत शेकडो वषेर् गुलामगिरी भोगून सुदैवाने स्वतंत्र झालेल्या या देशाच्या पहिल्या दोन पिढ्यांना चंगळवादी जीवन जगण्याचा अधिकारच नाही. कष्ट , शिस्त , योजनाबद्धता , प्रामाणिक व्यवहार आणि उदात्त महत्त्वाकांक्षा हीच आमची आचारसंहिता असायला हवी ना! मग आम्ही शिवचरित्रातून काय किंवा अन्यआदर्शांतून काय , शिकलोच काय ? आम्ही भारावलेल्या मनाने तात्पुरते चांगले असतो. स्मशानवैराग्य आणि हे चांगलेपण सारखेच. तात्पुरतेच.
एकदा एक असाच तात्पुरता भारावलेला एक भक्त स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीस (दर्शनास!) गेला. अन् म्हणाला , ' स्वामीजी , मला देवासाठी , समाजासाठी अन् देशासाठी खूप काहीतरी चांगले करावेसे वाटते. मी काय करू ? तुम्ही सांगाल ते मी करीन. '
यावर स्वामीजी अगदी शांतपणे म्हणाले , ' तू , फक्त एकच माणूस ' चांगला ' बनविण्यासाठी सतत प्रयत्न कर. बस्स! हीच ईश्वरसेवा आहे. '
त्यावर त्या माणसाने विचारले , ' कोणाच्या माणसाला मी चांगला करू ? असा माणूस मला नेमका कुठे भेटेल ?'
त्यावर स्वामीजी म्हणाले , ' तो माणूस तुझ्या अगदीच जवळ आहे. तो तूच आहेच. तू स्वत:ला 'चांगलं ' बनविण्याचा प्रयत्न कर. '
असा प्रयत्न मी स्वत: खरंच करतो का ?
आळस , अज्ञान , मोह अन् स्वार्थ याचीच नकळत वा कळूनही मी आराधना करीत तर नाही ना! अखेर ही आराधना दुर्गुणाचीच ठरेल. ही आराधना करवंटीची ठरेल. शिवचरित्राचा प्रत्येक ' मी 'ने मनापासून विचार केला तर स्वामी रामकृष्णांच्या शब्दांप्रमाणेच चांगला होण्यासाठी तो ' एक माणूस ' त्याला स्वत:तच सापडेल. तो त्यातला ' माणूस ' त्यालाच दाखवून देण्याचं काम करावं लागेल आईला , वडिलांना आणि शाळा कॉलेजातील सरांना.