नाथा कामत हे प्राणिमात्र माझ्या जीवनात का म्हणून आले आहे आणि दातांत काहीतरी अडकावे तसे का अडकून राहिले आहे, माझ्या मनात त्याच्याविषयी निश्र्चितपणाने कोणत्या भावना आहेत, याचा अजून माझा मलाच नीट उलगडा झालेला नाही या जन्मात होणार नाही.
"बाबा रे ! तुझं जग निराळं आणि माझं निराळं!" नाथा कामत कुळकर्ण्याच्या हॉटेलात हातातले भजे दोन्ही बाजूंनी राणीछाप रुपया निरखून पाहावा तसे उलटून पालटून पाहत मला अनेक वेळा हताश होत्साता सांगत होता. त्याच्या ह्या अशा वागण्यातल्या दोन गोष्टी मला आवडत नाहीत. एक म्हणजे खाण्याचा पदार्थ निरखून पाहत खाणे. नाथा कामताला ही फार वाईट खोड आहे. अर्थात आपले सर्व उसासे, निःश्र्वास इ० माझ्यावर सोडण्यासाठी मला तो होऊन हॉटेलात घेऊन जात असल्यामुळे त्याने भजेच काय पण बटाटेपोह्यांतला प्रत्येक पोहा आणि मातीत सोने सापडावे तस्स दुर्मीळ मार्गाने सापडणारा बटाट्याचा एक-सहस्त्रांश तुकडा जरी निरखून पाहिला तरी मला त्याबद्दल तोंड उघडता येत नाही. पण दुसरी न आवडणारी गोष्ट मात्र तापदायक आहे. मला कुणी 'बाबा' शब्दाचे 'हे बाबा'. 'भो बाबा' किंवा 'बाबा रे' हे संबोधन वापरले की चीड येते. 'बाबा रे' ह्या शब्दाने वाक्याची सुरूवात करणारी माणसे ऎकणाराला एकदम खालच्या पातळीवर आणून बसवतात. 'बाबा रे' ह्या शब्दापुढे "वत्सा, तू अजाण आहेस.". "बेटा, दुनिया काय आहे हे तू पहिचानलं नाहीस", "हा भवसागर दुस्तर आहे.", "प्राण्या, रामकथारस पी" अशांसारखी अनेक वाक्ये गुप्तपणाने वावरत असतात.
नाथा कामताच्या वाक्यातला 'बाबा रे' हा एवढा तिरस्कारणीय अतएव त्याज्य जातीचा शब्द सोडला तर `त्याचं जग निराळं आणि माझं जग निराळं' ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. मी राष्ट्रभाषेत `गौ आदमी' किंवा अलाघरची गाय होतो. ("शुद्ध बैलोबा आहे" हे माझ्याविषयीचे ज्येष्ठ नातलगांतली चालू मत चिंत्य आहे.) मी अल्लाघरची गाय होतो आणि नाथा कामत हा-- अलाघरी असतात की नाही मला ठाऊक नाही, पण--अलाघरचा मोर होता. सदैव आपला पिसारा फुलवून नित्यनुतन लांडोरीच्या शोधात. त्यला घडवताना विधात्याने रोमियो, मजनू, फरहाद, हिररांझा ह्या पंजाबी नरमादीपैकी जो कोणी नर असेल तो, सोणीमहीवालमधला वाल किंवा महीवाल आणि क्लिंओपात्रा ते कान्होपात्रा ह्या व अशांसारख्या हजारो सुंदरींवर जीव ओवाळीत राहणे एवढेच कार्य केलेले जे जे म्हणून परदेशी व एतद्देशीय गडी होऊन गेले त्यांचे नकाशे संबंधित अधिका-यांकडून मागवले असतील आणि त्यानंतर नाथा कामत नावाचा पदार्थ तो विधाता करिता होऊन चार महिन्यांच्या शेपशयनी जाता झाला असेल.
कुठल्याही शहरवस्तीतल्या रस्त्यातून नाथा कामताबरोबर चालत जाण्यापेक्षा गोवीच्या वाळवंटातून भर दुपारी अनवाणी धावत जाणे अधिक सुखावह! पातळ, लुगडे किंवा स्कर्ट गुंडाळून द्र्ष्टिपथातून काहीही सरकल्यासारखे झाले की नाथा कामताचे पंचप्राण डोळ्यांत येऊन गोठतात, गळ्यातले आदामचे सफरचंद सुतार लोकांकडे लेव्हल मोजायचे यंत्र असते त्यातल्या बुडबुड्यासारखे खालीवर व्हायला लागते, मानेचा कोन उलटा फिरत तीनशेसाठ अंशांचा प्रवास करून येतो. आणि वस्त्रन्वित वस्तू जरा देखण्यातली निघाली की नाथाच्या बुटाला चाके लावल्यासारखा तो अधांतरी तरंगू लागतो. ह्या तुर्यावस्थेतून सहजभावात यायला काही मिनिटे जावे लागतात. मग आपल्या त्या टायने आवळलेल्या गळ्यातून `गटळळगर्रगम' अशांसारख्या अक्षरांनी वर्णन करता येण्यासारख्या आवाज काढून तो भानावर येतो.
नाथाची आणि माझी मैत्री ही एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी तशी झाली. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी सारख्या नाहीत. माझे कपडे शिवणारा शिंपी तंबोऱ्याच्या गवसण्या, तबल्याच्या खोळी, उशांचे अभ्रे वगैरे शिवून उरलेल्या वेळात सद्रे, कोट वगैरे माणसे झाकायची कापडे शिवणारा; तर नाथाचा कोट कोटात शिवला जातो, पॅंट भायखळ्याला आणि शर्ट सॅंडहर्स्ट रोडवरच्या स्पेशलिस्टाकडे! त्याला मेट्रोला कुठले पिक्चर आहे, एलिझाबेथ टेलरची सध्या प्रकृती कशी आहे, रिटा हेवर्थ अधिक दाहक की जिना लोलिब्रिजीडा, ब्रिजित बार्दोची मापे, वगैरे गोष्टींचा लळा तर मी गावातल्या गावात व्यंकटेश टॉकिजमध्ये 'भक्त सुदामा' पाहणाऱ्यांपैकी! त्याच्या माझ्या वयांत खूप फरक आहे. तो आणि मी एका कचेरीत नोकरीला नाही तरीदेखील उभ्या गावाला आमच्या मैत्रीची माहिती आहे. गावकरी मंडळीना वास्तविक हे अजब वाटते. नाथा एरवी गावात फारसा मिसळणाऱ्यांतला नाही. तो देहाने पार्ल्यात असला तरी मनाने चौपाटीवर नाहीतर रेक्लेमेशनवर असतो. कारणपरत्वे हिंदू कॉलनीच्या गल्ल्यांत अथवा शिवाजी पार्कवर आढळतो. गिरगाव रस्त्याला खोताची वाडी जिथे 'टांग जराशी' मारते त्या नाक्यावर शनिवारी पाच ते साडेसहा ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी लावावी तसा उभा असतो.
त्याचा थोरला भाऊ गणपती आणि मी एका वर्गातले. पण नाथा आणि गणपती हे भाऊभाऊ आहेत हे केवळ वडिलांचे नाव आणि आडनाव तेच लावतात म्हणून खरे मानायचे. गणपती मॅट्रिक झाल्यावर महिन्याभरातच पोस्टात चिकटला आणि गेली कित्येक वर्षे लिफाफ्याला स्टांप चिकटून राहावा तसा पोस्टखात्याला चिकटून आहे.
आणि नाथाच्या मात्र शेकडो नोकऱ्या झाल्या. त्याने आधिक केल्या की 'प्रेम' हे सांगणे बिकट आहे. `नाथाच्या घरची उलटीच खूण' ही ओळ नाथा कामताच्या घराला सगळ्यांत जास्त लागू पडेल. वडील नाना कामत आणि आई आई कामत ही श्रावणबाळाच्या मातापितरांइतकी सालस. नाना कामत अनेक वर्षापूर्वी अकौटंट जनरलच्या हपिसातून रिटायर होऊन बसले. जवळच्या पुंजीतून आणि अलिबागजवळच्या खेड्यातली आपली वाडवडिलार्जित शेतीवाडी, घरदार विकून पार्ल्याला एक घर बांधले. त्यांच्या घराला कामतवाडी असे म्हणतात. ते एवढेसे घर आणि ती एवढीशी बाग ह्याला कामतवाडी म्हणणे म्हणजे उंदराला ऎरावत किंवा टांग्याच्या घोड्याला हयग्रीव म्हणण्यापैकी आहे. नाना कामत हा देवमाणूस; नाथाची आई म्हणजे तर केवळ माउली. गणपती पोस्टाच्या खांबासारखा निर्विकार. मांडीला तीनतीन वर्षे नवे धोतर न लावणारा. ह्या वयात चष्म्याच्या काडीला सूत गुंडाळणारा. पोरांच्या पाठीत हात वर करुन धपाटेदेखील न मारता येणारा. नंबर दोनचा सदाशिवदेखील तसाच. कुठल्यातरी आगीच्या विमा कंपनीत आहे, पण स्वभावाने जळाहूनही शीतळू! रस्त्यात हे भाऊ एकमेकांना दिसले तर मान उचलून वरदेखील पाहत नाहीत. त्यानंतरच्या भगीनी व्हर्नाक्युलर फाइनलापर्यंत शिकल्या, एके दिवशी बोहल्यावर चढल्या आणि सासरी गेल्या. शेवटला नाथा! हा मात्र अनेक वर्षे मुंजाच राहिला. अनेक पिंपळांवर बसला. पण ह्यालाच पिंपळांनी झपाटले आणि शेवटी एकदा---पण ती कथा पुढे येतेच आहे. "तुम्ही तरी आमच्या नाथाला काही सांगून पाहा--तुमचं त्याचं रहस्य आहे नाही म्हटलं तरी." नाना कामत डोळ्यांत पाणी आणून मला सांगत. आमचे घर टाकून चार घरे पलीकडे नाना कामतांची कामतवाडी.
"मी काय नाथाला सांगणार? तो जे जे काही सांगतो ते तुम्हाला सांगितलं तर पुढल्या महिन्याची पेन्शन आणायला जाणार नाही तुम्ही." हे सगळे मी स्वरात म्हणतो. उघड मात्र "बघू. अहो, लग्न हादेखील योग आहे" वगैरे वाक्ये असतात.
नाथा मात्र मला सारखे काही ना काहीतरी सांगत असतो हे खरे. माझ्या व्यक्तीमत्वात ही काय गोम आहे मला कळत नाही. माझ्यापाशी अनेक लोक आपली अंतःकरणे उघडी करतात. आमच्या गल्लीतले काका राऊत अगदी आतल्या गाठीचे म्हणून प्रसिद्ध आहेत. पण तेदेखील माझ्यापुढे ती गाठ सोडून बसतात. त्यांचा जावई (गुलाबचा नवरा) रामराव म्हात्रे याने खोताच्या वाडीत कुणाला तरी ठेवले आहे ही गोष्ट काका रावताने मला काही कारण नसताना सांगितली होती. वास्तविक काही गरज नव्हती. पण माझ्यापाशी प्रत्येक गोष्ट ही सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवल्याइतकी सुरक्षित राहते अशी पार्ल्यात (पुर्व बाजू) माझी ख्याती आहे. कदाचित ह्या माझ्या व्यक्तिमत्वाचा गुण म्हणूनच नाथा आपल्या सगळ्या दर्दभऱ्या कहाण्या मला सांगत असावा. त्याच्या वडील भाऊ गणपती मला अरेतुरे करतो म्हणून माझ्यापेक्षा सहासात वर्षांनी लहान असलेला नाथादेखील मला अरेतुरेच करतो.
गोष्ट सूक्ष्म आहे, पण मला जरा बोचते. रस्त्यात चालताना माझ्या खांद्यावर कोणी हात ठेवून चाललेले मला आवडत नाही. म्हणजे माझा खांदा हा शिवाजी किंवा थोरले बाजीराव यांनीच हात ठेवण्याच्या लायकीचा आहे अशासारखा अजिबात गैरसमज नाही माझा. पण एकूणच मला शारीरीक लगट करून दाखवलेली मैत्री आवडत नाही. आणि नाथा तर सारखा माझ्या कोटाच्या बटणाशी, पाठीशी, खांद्याशी चाळा करून बोलतो आणि वर पुन्हा ते `बाबा रे' चे व्रुपद!
नाथा कामत हा स्वतःविषयीच्या हजारो गैरसमजांचा दोन पाय फुटलेला एक होल्डॉल आहे. बायकांनी आपल्याकडे पाहिले रे पाहिले की त्या आश्रमहरिर्णी सारख्या विद्ध होतात असे त्याला इमानाने वाटते. `विद्ध'.`आश्रमहारिणी' वगैरे सगळे शब्द नाथाचे! त्याची शब्दसंपत्ती मात्र बृहस्पतीला त्याच्या आसनावरून खेचून काढील अशी आहे. आम्हीही आयुष्यात `स्त्री' हा पदार्थ पाहिला; पण नाथाने जसा पाहिला ते ज्ञात्याचे पाहणे. "नार्मा शिअररच्या डोळ्यांना हेडी लमारचं नाक लावलं आणि बेटू डेवीसची हनवटी चिकटवली की केशर कोलवाळकर होते", "क्लाडेट कोलबर्टची जिवणी. लिझ टेलरची पापण्या. इनग्रिड बर्गमनचा ओव्हरऑल गेट अप मिळून आणखी कोणाशीशी होते." असे त्याचे सिद्धांत आहेत. त्याचेही एक खास मित्रांचे वर्तुळ आहे. त्याला तो आपली गॅंग म्हणतो. त्या गॅंगमध्ये नाथाला कोणी `किलर' म्हणतात, कोणी `बायालॉजिस्ट' म्हणतात. नाथा अशा वेळी खूष असतो.
"बाबा रे---" नाथा मला सांगत असतो, "दोष माझा नाही. त्या दिवशीचीच गोष्ट घे! वेलकम स्टोअर्समध्ये मी ब्लेड्स आणायला गेलो होतो. शरयू पिना आणायला आली होती."
"कोण शरयू?" माझ्या या अज्ञानजन्य (की जनंक?) प्रश्र्नानंतर नाथाचे डोळे एकदम ऊर्ध्व लागल्यासारखे वर गेले. माझ्या सदतीस वर्षे पेश्नन भोगलेल्या एका काकांचे डोळे एकदाच असे झालेले मी पाहिले आहेत. त्यानंतर तासाभरातच मंडळींनी टापश्या बांधल्या. नाथाचे ते तसले डोळे पाह्यची मला सवय आहे. कुठली तरी सरला, विमला धरून तो कथेचा पुर्वरंग सुरू करतो आणि माझ्या "कोण सरला?". "कोण विमल?" ह्या न चुकता होणाऱ्या अजाण सवालांनंतर त्याला हटकून ऊर्ध्व लागतो. काही वेळाने डॊळे खाली उतरवून नाथा इहलोकात आला. आणि मेलेल्या उंदराकडे आपण ज्या दृष्टीने पाहतो तसे माझ्याकडे पाहत म्हणाला,
"पार्ल्यात इतकी वर्षे राहून तुला शरयू ठाऊक नाही? हे म्हणजे हॉलिवुडमध्ये राहून ग्रेटा गार्बो कोण हे विचारण्यासारखं आहे."
"नाथा, पार्ल्याला हॉलिवुड म्हणणं म्हणजे...जाऊ दे." खरे म्हणजे मला चटकन उपमा सुचली नाही.
"पण खरंच तुला शरयू ठाऊक नाही--- पार्ल्यात इतकी वर्षे राहून..."
"नाथा, शरयू म्हणजे काय पार्लेश्र्वराचं देऊळ आहे, की नामशेजारी खाणावळ की पार्ल्याच्या प्रत्येक सुपुत्राला ठाऊक! शिवाय तू म्हणतोस ती कुठली शरयू! पार्ल्यात सत्तर एक शरयू असतील."
"होय मित्रा....." हे एक त्याचे संबोधन मला आवडत नाही. पुंडरीकाने त्याचा तो चंद्रापिड का कोण होता त्याच्याशी बोलावे अशा थाटात तो मला--- माझ्या एतदविषयक अज्ञानाची कीव करताना--- `मित्रा' असे म्हणतो. "शरयू खूप आहेत, असतील, होतील---पण आताचा वर्ण्यविषय असलेली शरयू एकमेवाद्वितीयम!" नाथा बोलायला लागला की ऎकत नाही. "आणि ती तुला ठाऊक नाही?"
"नाही!" मी उत्तरलो. तू मुसलमान होतोस का?---ह्या औरंगजेबाच्या प्रश्र्नाला संभाजीने ह्याच धिटाईने उत्तर दिले असेल.
"तुझा दोष नाही, बाबा रे! तुझं जग निराळं आणी माझं निराळं!"
हे वाक्य मी त्यानंतर आणि त्यापुर्वी शरयू, कुमुद, शालीनी, बेबी, कुंदा अशा अनेक संदर्भात स्पष्टीकरणासह ऎकले होते.
"शरयू तुला ठाऊक नाही? सोनारी रोडवरच्या तो लांडगा ठाऊक आहे तुला?"
"लांडगा?" आमच्या पार्ल्यातला डुकरे, गाढवे, पाळीव आणि कुलुंगी कुत्री आणि कुणा अनामिक मारवाड्याच्या भर बाजारात ठाण मांडून ट्राफिक अडकवणाऱ्या आणि काही म्हाताऱ्या डोळ्यांना शेपटीची सोय करणाऱ्या गाई हा प्राणिसंग्रह मला परिचीत आहे. पण हौसेने लांडगा बाळगणारा गाढव पार्ल्यात राहत असेल अशी कल्पना नव्हती.
"कोण लांडगा?" मी पुन्हा विचारले.
"तो---भाईसाहेब प्रधान हे माणसाचं नाव धारण करून सबरजिस्ट्रार नावाचा हुद्दा मिरवणारा जंतू!"
अविवाहीत तरूणींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून, शंकराकडून रुंडमाळा उसन्या आणून गळ्यात घालून नाचते.
"त्या प्रधानांच्या निवडुंगात ही जाई फुलली आहे!" `भांगेत तुळस' ह्या मराठी वाक्र्पचारला एक तेजस्वी भावंड बहाल करीत नाथा कामत म्हणाला. मागे एकदा सरोज केरकर नावाच्या हृद्यदुखीच्या घराण्याच्या संदर्भात "बोंबलांच्या काड्यांच्या जुगड्यात केवडा आला आहे." म्हणाला होता. तिच्या बापाचा उल्लेख हिपॉपॉटेमस याखेरीज केला नाही. "बरं मी काय सांगत होतो---"
"लांडगा!" मी.
"हं. तर लांडग्याची मुलगी शरयू प्रधान!" टायचे गाठ सैल भांगातून करंगळी फिरवीत नाथाने कथा पुढे चालवली. "मी वेलकम स्टोअर्समध्ये ब्लेड्स घेतल्या. शरयूंन घेतल्या डझनभर. वेलकम स्टोअर्सचा शितू सरमळकर ठाऊक आहेच तुला!"
"मालक ना?"
"हो." पुढल्या बशीतले एक भजे चटणीत चिरडून शितू सरमळकराला चिरडल्याच्या थाटात नाथा म्हणाला. "बैल साला! ब्लेड्स हा पुरूषोपयोगी पदार्थ सोडलास तर बाकी सर्व स्त्रियोपयोगी वस्तूंचा व्यापार करणारा हा एक पाजी इसम आहे हे पार्ल्यात तरी कोणाला सांगायला नको! त्याच्या दुकानात गुलाबाच्या ताटव्यासारखं बायकांचं गिऱ्हाईक फुललेलं असतं; पण हा कोरडा ठणठणीत आहे. नाकावर शेंदुर लावतो आणि कमरेखालचा देह साबणचुऱ्याची पिशवी भरल्यासारखा अर्ध्या विजारीत कोंबून बेंबीपर्यंत उघडी पैरण घालतो."
शितू सरमळकराचे हे वर्णन खरे आहे; पण त्याचा संदर्भ कळेना. नाथा तोंडाने थैमान घालीत होता.
"त्या शित्याच्या तोंडात देवानं बुटाची जीभ घातली आहे. चेहरा वीर बभ्रुवाहनासारखा!"
"तो मरू रे! शरयूचं काय झालं सांग."
"सांगतो." चटणीत भिजलेले भजे निरखून पाहत नाथा म्हणाला, "शरयूनं आपल्या छोट्याशा पर्समधून दहाची नोट दिली. आता दहा रुपये सुटे नाहीत हे वाक्य तू शितू सरमळकराच्या जागी असतात आणि तुझ्यापुढं शरयू प्रधानसारखी जाईची कळी पिना घेत उभी असती तर कसं म्हटलं असतंस?"
नाथा कामताशी बोलताना हा एक ताप असतो. अमक्या वेळी तू काय बोलला असतास? तमक्या वेळी तू कसे उत्तर दिले असतेस? मी कसे दिले असेल? ती काय बोलली असेल? ह्याविषयीचे माझे अंदाज तो माझ्या तोंडून वदवून घेतो.
"मी आपलं सरळ म्हटलं असतं : दहा रुपये सुटे नाहीत. पैसे काय पळून जाताहेत तुमचे? आणखी काय देऊ?"
"शाबास! म्हणूनच तू शितू सरमळकर नाहीस आणि तो गेंडा स्त्रियोपयोगी स्टोअर्स चालवतो. त्या राक्षसानं ती दहाची नोट शरयूच्या अंगावर फेकली आणि सर्दी झालेल्या रेड्यासारखा त्याचा तो आवाज--- तसल्या आवाजात
तिला म्हणाला: तीन दमडीच्या वस्तू घेता आणि धाच्या नोटी काय नाचवता? शितू सरमळकर हे वाक्य शरयू प्रधानला म्हणाला--आता बोल!"
मी काय बोलणार? मी आपला सर्दी झालेल्या रेड्याचा आवाज कसा असेल ह्याचे एक ध्वनिचित्र मनाशी ऎकण्याचा प्रयत्न करीत होतो.
"बोल! गप्प का? अशा वेळी तू काय केलं असतंस?" नाथा.
"त्या सरमळकराच्या काउंटरवर मूठ आपटून त्याच्या काउंटरची काच फोडली असती---"
हे वाक्य मी आपले नाथाला बरे वाटावे म्हणून म्हटले. एरवी शितूकाका सरमळकराविषयीचे माझे मत काही इतके वाईट नाही. त्याच्या दुकानात फुलणारा गुलाबांचा ताटवा मीदेखील पाहिला आहे. त्याला त्याचे निम्मे दुकान विस्कटायला लावून शेवटी पाच नया पैशांचीदेखील वस्तू न विकत घेता जाणारी ती गुलाबे त्याचे डोके कसे फिरवीत नाहीत ह्याचेच मला नवल आहे. तीन आण्यांच्या पिनांना दहाची नोट देण्यातली गैरसोय मला पटत होती. पण समोर नाथा फकिराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. माझ्या मुठीने सरमळकराच्या काउंटर फोडण्याच्या कल्पनेने त्याला खूपच समाधान झाले.
"बाबा रे! देअर यु आर! मी माझं अंतःकरण उघडं करून तुला ह्या साऱ्या गोष्टी सांगतो ह्याचं हेच कारण! तुझं माझं जग निराळं असलं तरी तुझी माझी वेव्हलेंग्थ जमते."
"वेव्हलेंग्थ?"
"म्हणजे माझ्या ह्रुदयात लागणारं स्टेशन तुझ्याही ह्रदयात लागू शकतं."
नाथा आता उपमांच्या शोधार्थ रेडिओ-विभागात शिरला होता. लगेच उसळून म्हणाला, "तू काच फोडली असतीस. मी त्याचं तोंड फोडलं!"
"म्हणजे मारामारी? त्या गेंड्याच्या कातडीला मी हात लावीन? मी शरयूच्या देखत बोललो त्याला..शित्या, तोंड संभाळून बोल. कोणाला बोलतो आहेस तू?"
माझी एकशे एक टक्के खात्री आहे की, शितू सरमळकराला नाथा असे काहीही बोलला नाही. एक तर शितू हा रोजच्या जेवणात ऑइलऎवजी 'क्रूड ऑइल' खाणाऱ्यांपैकी! त्याने नाथाच्या टाळक्यात पाच किलोचे वजन मारले असते. पण नाथा हे वाक्य हॉटेलात मात्र एवढ्या जोरात म्हणाला की, पलीकडच्या टेबलावरची माणसे चमकून माझ्याकडे पाहू लागली. त्यांचा उगीचच मीच 'शित्या' आहे असा गैरसमज होऊ नये म्हणून मी चटकन म्हणालो,
"असं म्हणालास तू त्या शित्याला?"
मग ती माणसे पुन्हा निमूटपणे पुढले पदार्थ गिळू लागली.
"मग भितो की काय? लिलीच्या वेळची गोष्ट तुला मी सांगीतली होतीच..."
नाथा कामतच्या गोष्टी ह्या अरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक कथांंसारख्या एकातुन एक अशा निघतात.
"लिली?" पुन्हा माझा अजागळ प्रश्र्न!
"बाबा रे ! जूनिअरला आमच्या वर्गात लिली पेंडसे नव्हती का? ब्ल्यू आइज! तिला वर्गात हसताना पाहून प्रोफेसर वाकणे नावाच्या संस्कृत शिकवणाऱ्या खोकडानं वर्गाबाहेर जायला सांगितलं होतं. त्या वेळी तिच्याबरोबर मी देखील सहानभुतिदर्शकवॉक-आउट केला होता. त्या खोकडाला वाटत होतं की, मुलं संस्कृत शिकायला येतात. लिली पेंडसेमुळं त्याच्या क्लासला स्टार व्हॅलू होती! वर्गात लिली नाही तर काय आहे! तुला मी ही हकीकत सेसिल रेस्टॉरंटमध्ये सांगितली होती."
"बरं आठवतं बुवा तुला---"
"तुला कल्पना नाही. त्या क्षणी माझ्या जीवनातला एक ड्रामा घडला होता. फॅमिलीरुमधून श्यामा चित्रे आणि मधू शेट्ये बाहेर पडले होते! तुला मी श्यामा चित्रे दाखवली होती--- ह्या गोष्टी तू विसरतोस कशा? श्यामा चित्रेनं शेट्याशी डायव्होर्स घेतला हे तुला ठाऊकच असेल."
"म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं?" काही तरी बोलायचे म्हणून मी बोललो.
"त्याशिवाय डायव्होर्स कसा होईल?" वास्तविक श्यामाची आणि मधूची मी ओळख करून दिली. श्यामा फर्स्ट इअरलाच रुतत होती. पण मी हात दिला. इंग्लिशच्या आणि सिव्हिक्सच्या माझ्या नोट्स वाचून पास झाली. माझं अक्षर पाहून आता तुला सांगायला हरकत नाही, पण कीप इट टु युवरसेल्फ---`असल्या अक्षराचा मुका घ्यावा असं वाटतं' असं म्हणाली होती."
मी उगीचच चमकून हे कोणी आजूबाजूला ऎकत नाही ना म्हणून पाहिले. माणसे भजी,बटाटेवडे वगैरे चेपण्यात दंग होती. नाथा मात्र पुन्हा एकदा ऊर्ध्व लावून बसला होता.
"....फर्स्ट एअरचा रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी चौपाटीवरच्या मावळत्या सुर्याला साक्ष ठेवून `मी तुला आजन्म विसरणार नाही, नाथा' असं टिळकांच्या पुतळ्याखाली वाळूत बसून मला वचन दिलं होतं. वादा किया था तुमने सिर्फ वादे के लिये...असं अर्बुज सुलतानपुरी म्हणलाय ते खोटं नाही."
एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे. `प्रेम' ह्या विषयात नाथाची मराठी-संस्कृत-फारशी-उर्दू ह्या सर्वांगाने तयारी आहे. अर्बुज सुलतानपुरी, सुराख चमनपुरी, उन्स उस्मानाबादी वगैरे अपसव्य लिपीत लिहीणारे कवी त्याच्या जिभेवर हाजिर असतात. किंबहुना, ह्या यवनांनीच त्याच्या प्रेमभंगाच्या सगळ्या तसबिरींना महिरपीसारख्या उर्दू ओळीच्या चौकटी पुरवील्या आहेत.
"तर मी काय सांगत होतो तुला?" नाथा भानावर आल्यासारखा म्हणाला.
"शितू सरमळकर!" मी त्या मुहब्बतीच्या मक्केच्या हाजीचे गलबत पुन्हा एकदा जुन्या बंदराकडे वळवीत म्हणालो. पण नाथा आता शरयूपार होऊन लिली पेंडसेला वळसा घालून श्यामा वळसा घालून श्यामा चित्रेच्या चिंतनात होता.
"शितू मरू दे! श्यामा!" टेबलावर बोटाने त्याने काहीतरी लिहिल्यासारखे केले. बहुधा श्यामा हे नाव लिहीले असेल. "काय सांगू तुला--बाबा रे! चौपाटीवर सुर्य मावळताना लाखो लोकांनी पाहीला असेल; पण मी पाहिला तसा कोणी पाहिला नसेल. श्यामा चित्रे पांढरं स्वच्छ वाइलचं पातळ नेसली, पांढरा ब्लाउझ,
गळ्यात पांढरी मान्य, पांढऱ्या केसांत---आपलं केसांत .... पांढऱ्या जाईचा सर, मिश्र्चिफचा मंद वास---"
"कसला?"
"मिश्र्चिफ!"
"मिश्र्चिफ?"
"एक सेंट असतं."
"असं होय! काय पण नाव---"
"तिचं आवडतं सेंट होतं ते. आपल्या गुलाबी निमुळत्या लांब बोटांनी वाळूत नाथा कामत अशी इंग्लिशमध्ये अक्षरं काढीत टिळकांच्या पुतळ्याच्या बरोबर पायथ्याशी मला सांगत होती--`मी तुला जन्मात विसरणार नाही, नाथा..."
माझ्या मनात उगीचच विचार आला, चौपाटीवरच्या त्या वाळूत उभ्या उभ्या बळवंतरावजी टिळकांना काय काय म्हणून पाहावे लागले असेल!
"...आणि काय सांगू तुला? इंटरच्या वर्गात आम्ही गेलो. जिमखाना कमिटीच्या इलेक्शन जुलैमध्ये झाल्या आणि ही श्यामा चित्रे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मला विसरली. मधू शॆट्येच्या बॅडमिंटनवर भाळली. पण तिला ठाऊक नव्हतं की बॅडमिंटन कोर्ट म्हणजे लाइफ नव्हे. संसार एज ए डिफरंट थिंग! कॉलेजच्या पोर्चमध्ये माझ्या अंगावरुन जात होती, पण तिच्या एका दृष्टीक्षेपाला मी महान झालो होतो. वरच्या मजल्यावरच्या मधू शेट्ये तिला दिसत होता, पण समोरच्या पायरीवर उभा असलेला नाथा कामत दिसत नव्हता. वास्तविक कॉलेजच्या फिशपॉंड्मध्ये `नाथ हा माझा' हे गाणं म्हणा अशी तिला चिठी मिळाली होती. इंटरच्या गॅदरिंगला `मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला' ही चिठ्ठी मिळाल्यावर ती बेवफा मधू शेट्येकडे पाहून हसत होती असं मला शांता गोळेनं सांगितलं. मी गॅदरिंगवर बहिष्कार घातला होता. फक्त व्हरायटी एंटरटेन्मेंटच्या प्रोग्रामला गेलो होतो. शांता गोळेला मी प्रॉमिस दिलं होतं---"
"कसलं?"
"तिच्या भावगीतगायनाला मी पेटीचा सूर धरला होता."
"तू पेटीही वाजवतोस वाटतं, नाथा?" मी शांता गोळेला टॅंजंट मारून नाथाला दुसऱ्या दिशेला लावावा म्हणून म्हटले.
"नुसता सूर धरू शकतो." नाथाने प्रामाणिक कबुली दिली. "काळी पाच पट्टी होती तिची. `तू बोलल्याविना मी' गायली होती. शशी पाटणकर व्हायलिन दामू पर्वते तबल्याला आणि मी पेटीचा सुर! शांताचा आवाज म्हणजे--- बाबा रे! कल्पना नाही तुला. असला आवाज शतकाशतकात एखादाच येतो. टाचेपर्यंत लांब शेपटा होता तिचा---"
टाचेपर्यंत लांब शेपटा आणि शतकाशतकातला आवाज यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. पण एकाच फिल्मवर दोनदोनदा फोटो काढल्यावर होते तसले ते बोलणे ऎकण्यात मी सरवलो होतो.
"शांता गोळे म्हणजे.... तू नर्गिसचं फूल पाहिलं आहेस?"
"नर्गिस नावाचं फूल असतं हे मी प्रथम आज तुझ्याकडून ऎकतो आहे."
"तू उर्दू पोएट्री वाच! आहाहा!" कसल्या तरी आठवणीने मोरासारख्या आपलाच खांदा शहारवीत नाथा म्हणाला. "शांता गोळे म्हणजे चमनमध्ये बहार आल्यावर गुले नर्गिसवर शबेरात संपल्यावर पडलेलं शबनम होतं."
`हमारे बगीचे मे पैदा हुवा फुलदणाणा किंवा ओटो दिलबहार' यापलिकडे माझे उर्दू कधी गेले नव्हते. नाथाच्या वाक्यातले एक अक्षर मला कळाले नव्हते, तरीदेखील शांतापुराण नको म्हणून उगीचच मी म्हटले,
"आहाहा! काय सिमिली आहे!" पण माझ्या ह्या आदराने नाथा पेटला.
"बाबा रे! तू पाहिलं नाहीस तिला!" शी वॉक्ड इन ब्यूटी लाइक ए स्टारलिस्ट नाइट---" नाथा इंग्रजीत शिरला. "सेसिलमध्ये रात्री बारापर्यंत बसून मी सॉनेट लिहीलं तिच्यावर. त्या वेळी हॉटेलं अकराला बंद होत नसत. सद्या अभ्यंकर बसला होता माझ्यापुढं. त्यानं ती कविता टाइप करायला म्हणून नेली. त्याचा बाप सॉलिसिटर आहे. त्याच्या घरी टाइपरायटर होता. कविता टाइप केली आणि स्वतःची म्हणून पाकिटात घालून शांताच्या हातात दिली."
"हा शुद्ध हलकटपणा आहे!" मी तरी आणखी काय बोलणार!
"चलता है! चमन में बहार आयी तब बुलबुल रोया..." नाथा पुन्हा कुठल्या तरी उर्दू कवीच्या गोंड्याला लटकला.
"चालायचंच. चहा थंड होतोय बघ." मी त्याला पुन्हा एकदा पृथ्वीतलावर खेचला. पण नाथा अजून हिंदकळत होता. त्याला मेन लाइनीवर आणायचे म्हणून मी विचारले, "मग त्या शरयू प्रधानचं काय झालं?"
"हो!" झोपेतून जागा झाल्यासारखा नाथा म्हणाला. "शितू सरमळकराच्या अंगावर चार आणे भिरकावले. कीप द चेंज म्हणून सांगितलं. शरयूची नोट तिच्या हातात दिली. तिच्या स्पर्श झाला आणि बिटवीन यू ऍंड मी, तुला सांगतो, अक्षरशः महिरलो!"
"काय झालो?"
"माहिरलो."
मराठी भाषेत असले काही क्रियापद आहे याचा पत्ता नव्हता मला.
"माहिरलो? म्हणजे?"
"तुला महिरणं ठाऊक नाही?" एखाद्या भिकाऱ्याच्या फाटक्या गंजीफ्र्काकाडे पाहावे तसे माझ्याकडे पाहत नाथाने प्रश्र्न केला. "माहिरणं म्हणजे.... तुला कधी मुंग्या आल्या आहेत?"
"हो, खूप वेळा! वातामुळं होतं म्हणतात तसं!" मी इहलोक सोडायला तयार नव्हतो आणि नाथा सारखा आपला चंद्रलोकात!
"तुला वातामुळं होत असेल. तरूणीचा पहिला स्पर्श ज्याला झाला नाही, त्याला महिरणं काय ते कळणार नाही."
उगीच वाद नको म्हणून मी तो अपमान त्या लठ्ठ कपातल्या चहाबरोबर गिळला. तरुणीचा पहिला स्पर्श म्हणजे काय ते न कळायला मी काही जरठविवाह केला नव्हता. सुमारे चौदा वर्षापूर्वी डोळ्यांत पुढल्या होमाचा धूर जात असताना अजीर्ण झालेल्या बेडकासारख्या आवाजाच्या त्या भटजीने माझ्या शेजारच्या पाटावर बसलेल्या त्या तरुणीला "हं, हाताला हात लाव" म्हटले होते आणि त्या नवोढा की काय म्हणतात त्या नमुन्याच्या तरुणीने तुपाचा द्रोण होमात उलटा करताना माझ्या हाताला हात लावला होता. त्या वेळी माझ्या शरीराला आलेली झिणझिणी मी इतक्या वर्षात विसरलो नव्हतो. पण त्यालाच महिरणे म्हणतात हे मला काय ठाऊक!
"शरयूच्या त्या स्पर्शानं, बाबा रे! मी फुलुन आलो. आणि तिथून आमचा परिचय वाढला. तिच्याबरोबर शॆजारी बसून बेदिंग ब्यूटी पिक्चर पहिलं मेट्रोला! ती लांडग्याबरोबर आली होती. योग पाहा. तिच्या शेजारची खुबी माझी! लांडग्याच्या स्वप्नादेखील नसेल की आपल्या पलीकडे आपला भावी जावई बसला आहे. काळोखात मी हळूच तिच्या हातावर चॉकलेट ठेवलं. हात जरा खरखरीत लागला."
"म्हणजे तेवढ्यात तुझ्या शेजारी तो गेंडा बसला की काय येऊन?"
"लांडगा!" नाथाने माझी चूक सुधारली.
"मग?"
"अजून मी वेदिंग ब्यूटीचा पुढला भाग पाहिलाच नाही. उगीच सीन नको म्हणून कॅडबरीचं उरलेलं पाकीट टाकून निसटलो. प्रेमात फार सावध असावं लागतं. बाबा रे, तुला कळणार नाही. त्यानंतर बाजारात एकदा दिसली होती. तिच्याबरोबर लांडगा होताच. पिशवी हातात धरून शरयू उभी होती. पाठपोरी होती. पण तिच्या पाठीवरच्या दोन शेपट्यांच्या साइजवरून मी बरोबर ओळखलं-- की ही माझी फ्रेम!"
हे मात्र खरे आहे. काही माणसे गुळगुळीत नाण्यावरूनदेखील शक, सन, शतक, विक्रमराजा की शालिवाहन वगैरे गोष्टी ओळखतात, तसा नाथा शॆपट्याचा डौल, पिवळा गुलाब खोचायचा ऍंगल, सॅंडलच्या टाचा एवढ्या पुराव्यावरून ह्या गोष्टींच्या मालकिणीचे नाव ओळखतो. उद्या विलेपारले ते गिरगाव वॉर्डापर्यंतच्या तमाम तरूणी बुरखा घालून हिंडल्या तरी नुसत्या त्यांच्या टाचांवरून किंवा चालीवरून त्यांची नावे आणि घरनंबर सांगेल. सुमारे पंधरा ते पंचवीस वर्षाच्या समस्त तरूणीची त्याच्यापाशी संपुर्ण शिरगणती तयार असते. आयुष्यात विलेपारले ते चर्चगेट हा प्रवास त्याने एका लोकलमधून अखंड बसून केला नाही. गाड्यांना गर्दी नसे त्या काळातदेखील त्याचा पास फुटबोर्डावर उभा राहण्याचा होता. सांताक्रूझ आले रे आले की तो एकदम विंचू चावल्यासारखा "शारदा अमलाडी" म्हणत उतरे! खारला "देवकी कोठारे:, वांद्र्याला गुप्ते"! माहीम माटुंगा ही स्टेशने मात्र भाकड असतात हे लोकलच्या प्रवाशांना एकदम मान्य व्हावे. मग तिथून पुढे दादर आणि मग एकदम ग्रॅंटरोड! लोअरपरळ स्टेशनावर सुंदर तरुणी दिसणे हे तांबे आरोग्य भुवनात मटणपॅटिस मिळवण्याइतके दुरापास्त! `लोकलज्जेस्तव अप्रकाशित ठेवण्याचा खटाटोपदेखील करावा लागला असता. पटाईत कोळ्यांना कुठले नक्षत्र केव्हा उगवते हे जसे कळते तसे नाथा कामताला कोणत्या स्टेशनावर कोण उगवते हे पाठ होते. एकदा त्याच्या अमलाडी कालखंडात तो सांताक्रूझला उतरला नाही.
"का रे? आज तुझी अमलाडीबाई नाही वाटतं गाडीला?"
"यापुढं कधीच दिसणार नाही." नाथा हताशपणाने म्हणाला. "लग्न होऊन बंगलोरला गेली. तिचा नवरा गिरणीत वीव्हिंगमास्टर आहे. अशोक बेट्राबेट!" नाथाने शारदा अमलाडी हे खाते बंद करून टाकले होते.
नाथा कामत आता चाळिशीच्या आसपास आला तरी अजूनही खाती उघडतो. चार दिवस हिशेब मांडतो. मग एक दिवस खातेदार गळ्यात काळी पोत बांधून अदृश्य होतात. नाथा पान उघडतो. पण उस्ताह ओसरला नाही. आजदेखील कॉलेज उघडायच्या वेळी, जुन्या बायका अष्टसिद्धिविनायकाचे व्रत करून पालीचा, पुळ्याचा असे सगळे गणपती करून येतात तस्सा जून एकवीस ते तीसच्या आठवड्यात नाथा विल्सन ते रुइया चकरा मारुन `शिजन' कसा काय आहे ते पाहून येतो. अजूनही तो रोज गुळगुळीत दाढी करतो. हातरुमालावर सेंट टाकायला विसरत नाही. पॅंटची आणि शर्टाची इस्त्री जराही चुरगळलेली नसते. टायची गाठ नुसती पाहून घ्यावी. केस तुरळक होत चालले आहेत, कपाळावरून माघार घेत चालले, पण वळण तेच! तसाच चोपून काढलेला भांग. यार्डलेच्या ब्रिलियंटाइनची तीच तुकतुकी! तस्सा काटकोळा! हातावर फ्रेंच लिननचा कोट तसा टाकलेला. बुटाचे पॉलिश पावसातदेखील तसेच. चमकदार! कुठल्याही तेलाच्या, टूथपेस्टच्या, तयार शर्टाच्या, साबणाच्या किंवा गेला बाजार बूट पॉलिशच्या कंपनीने नाथाला अजून जाहिरातीसाठी का वापरला नाही कळत नाही. ओठावर मिशी कोरली तश्शी अजून आहे! त्याचे बौद्धिक आणि शारीरिक वय वाटेतच थांबलेय!
हे सगळे जरी खरे असले तरी आमच्या चौकस गावात एकाही माणसाने त्याला कुठल्याही चि०सौ० कां० बरोबर प्रत्यक्ष हिंडताना किंवा एखाद्या पोरीची टिंगल करताना पाहिले नाही. एखादी कविता वाचत जावे तसे तो तरूणींना आपदमस्तक वाचत जातो आणि मनाशी अन्वयार्थ लावतो. त्याच्या दृष्टीत पाप नाही. सारे गाव त्याला रोमिओ कामत म्हणते. पण त्याच्या वामांगी हाडामांसाची ज्युलिएट मात्र कधीच त्याला दिसली नाही. मला वाटते, त्याला त्याच्या त्या महिरण्यासाठी प्रत्यक्षात कधी कोणाही तरुणीचा हात धरावा लागत नाही. त्याचे पाळण्यातले नाव बद्रिनाथ. त्याच्या जन्मापूर्वी आई कामतांना बद्रिनाथाच्या यात्रेला जाण्याचे डोहाळे लागले होते असे ती हिला एकदा सांगत होती. ती माऊली अजूनही त्याला बद्रीच म्हणते. लौकिकातला नाथा तसा अनाथच राहिला होता.
पण त्याची तारुण्यपिटीका आजही मोडू, पण वाकणार नाही," शरयू प्रधानच्या लग्नाची पत्रिका घेऊन मला सांगत होता. कामतांच्या घराण्याशी आडनावाखेरीज काहीही साम्य नसलेल्या नाथाची मला आता दया येऊ लागली होती. नाथाच्या नामावळीतल्या एकूणएक कुलकन्यका आता `पुत्रवती बभूव' झाल्या होत्या. नाथाची आपल्या मिष्टरांशी ओळख करून देत होत्या. एक श्यामा चित्रेचा मधू शेट्याशी झालेला डायव्होर्स वगळला तर बाकीच्या साऱ्या जणी दिल्या घरी सुखी होत्या. आणि श्यामा चित्रेदेखील शेट्याशी काडीमोड घेऊन मेजर चोप्रा नावाच्या पंजाबी पहिलवानाशी लग्न करुन अंबाल्याला गेली होती. हा तपशीलदेखील नाथानेच मला दिला होता. `इलस्ट्रेटेड वीकली'त तिचा त्या धाटींगणाबरोबर आलेला फोटो दाखवून नाथा "शेवटी रानडुक्कर आवडला तिला!" असे मला म्हणाला होता. पण हे सगळे होऊनदेखील नाथा मात्र न कंटाळता तशीच गुळगुळीत दाढी करून स्नो चोपडीत होता, मिशी कोरीत होता, बुटांना आणि केसाला पॉलिश करीत होता आणि हातावर कोट आडवा टाकून कामतवाडीतून पार्ल्याच्या स्टेशनाचा रस्ता काटीत होता.
पूर्वी त्याला मी-चुकवीत असे, पण आता त्याची दया यायला लागल्यापासून त्याला मी होऊन हटकतो. पुष्कळदा एकच गाडी गाठायला आम्ही सकाळी निघतो. रस्त्यातून एखादे शिडशिडीत पातळ गेले की न चुकता नाथाची मान उलटी वळते.
"सुषमा नेने." नाथा तपशील पुरवतो. "डॉक्टर नेन्याची मुलगी. रुपारेलला आहे. डोळे छान आहेत---थोडेसे श्यामा चित्रेसारखे."
नाथाने राणा संगासारखे खूप घाव झेलले. पण श्यामा चित्रेचा घाव मात्र जरा खोल गेला आहे. कदाचित चौपाटावरची ती टिळकांच्या पुतळ्याजवळ वाळूत `नाथा कामत' ही इंग्रजी अक्षरे कोरण्याची गोष्ट खरीदेखील असेल. आणि नसली तरी खरी असू दे असे मला वाटायला लागले होते. नाथाच्या प्रेमजीवनातला मार्ग `वन वे' करण्यात देवाने त्याची फारच क्रूर चेष्टा केली आहे असे माझे ठाम मत आहे. तसा नाथा दिसायला वाईट नाही. अत्यंत टापटीप आहे. एरवी कामतवाडी म्हणजे गलथान; पण पोटमाळ्यातली नाथाची खोली नाथाने इतकी सुंदर मांडली होती की त्याच्या ह्या शेकडो पऱ्यांपैकी एखादी जरी तिथपर्यंत पोहचली असती तर नाथासाठी नव्हे तर त्याच्या त्या टापटिपीसाठी त्याच्याशी लग्न करायला तयार झाली असती. छोट्याशा मेजावर फुलदाणी होती. भिंतीवर फक्त ग्रेटा गार्बोंचा एक फोटो होता. कॉटवर स्वच्छ चादर होती. मागल्या भिंतीवर बॅडमिंटनचे रॅकेट होती. तिला कव्हर होते. कामतांच्या घरात अशी फळीवर सोवळ्यातल्या लोणच्यापापडांच्या बरण्यांशेजारी डिंपल व्हिस्कीची भरलेली बाटली आढळावी तसे होते. कामतवाडीत एकदम विसंवादी दिसत होता.
आता मात्र वादळ निवळीत आले आहे तसे माझ्या ध्यानात आले. गेली तीनचार वर्षे नाथा एकाच नोकरीवर टिकला आहे. तो उत्तम स्टेनोटायपिस्ट आहे हे मलाच काय पण नाना कामतांनादेखील ठाऊक नसावे. शांता गोळेला त्याने लिहीलेली इंग्रजी कविता सद्या अभ्यंकराने टाइप करुन दिलेल्या तिरमिरीत त्याने टाइपिंग शिकून घेतले असावे. नव्या नोकरीत त्याला पगारही बरा असावा. हल्ली त्याने फर्स्टक्लासचा पास काढला आहे. संध्याकाळच्या जेवणाला आताशा पंक्तीला असतो. पुतण्यांना कॅडबरीचे चाकलेट वगैरे आणून देतो. नाथानेच त्यांना हे शिकवले आहे. भावांचे संसार फोफावत चालले आहेत. नाथा खाली मान घालून जेवतो आणि वरच्या खोलीत जाऊन स्वस्थ पडतो. केसांचे आणि बुटांचे पॉलिश आता केवळ आदतसे मजबूर चालत असावे.
एका रविवारी सकाळी आठाच्या सुमाराला फाटक उघडून नाथा माझ्या घरी आला. काहीतरी खाजगी बोलायचे आहे म्हणून त्याने मला बाहेर काढले.
"काय लग्नबिग्न जुळलंय की काय नाथाभाऊजी?" ही म्हणाली. मी हिला नाथमहात्म्य सांगितले होते.
"तुच शोधून काढ की एखादं चांगलं स्थळ!" मी त्याच्या देखतच तिला म्हणालो.
"अहो, स्थळं काय? छप्पन्न आहेत. पण त्यांच्या पसंतीला यायला हवं ना? त्यांना हवी असेल अपटुडेट बायको. आमच्यासारख्या काकूब्रॅंड कुठल्या पसंत पडायला----"
आमची ही तशी स्पोर्ट आहे.
नाथाबरोबर मी बाहेर पडलो.
"जुहूला जाऊ या." नाथा म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे ते गांभिर्य पाहून मीही काही न बोलता निघालो. रेल्वेचा पूल ओलांडून जुहूच्या वाटेला लागलो. रविवारी पहाटें उठून जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ओझोन की दोघांकडे पाहत होती.
"आजपर्यंत मी तुला माझी खूप सीक्रेटस सांगितली आहेत. श्यामा चित्रे तुला आठवत असेल."
"हो तर. चौपाटीवर तुझ्या नावाची अक्षरं---"
"शी इज डेड!" नाथा भरल्या आवाजात म्हणाला.
"म्हणजे?"
"आत्महत्या केली तिनं. आजच्या `टाइम्स' मध्ये आलंय! मेजर चोप्राची बायको बंदुकीची गोळी झाडून घेऊन..." त्याला पुढे बोलवेना. "मधू शेट्याशी मॅरेज केलं तेव्हाच मला वाटलं होतं. त्यातून हा तर आर्मीतला माणूस. त्यानं शुटदेखील केलं असेल तिला." नाथाने हातरुमाल काढून डोळे पुसले. सकाळी ह्या अशा प्रसंगी बाहेर पडतानादेखील हातरुमालावर सेंट टाकायला तो विसरला नव्हता. नाथाच्या माझ्या इतक्या वर्षाच्या परिचयात त्याच्या डोळ्यांत पाणी पाहिले नव्हते. तशा मी त्याच्या दृष्टीने अंतःकरणाला पीळ पाडणाऱ्या कितीतरी प्रेमकहाण्या ऎकल्या होत्या. पण इथे नाथा कामत माझ्यापुढे बसून चक्क रडत होता.
"चालायचंच! जीवनात..." असल्या प्रसंगी प्रसंगाला उचीत अशी वाक्ये बोलायला शिकवणारा एखादा पोष्टल कोर्स असला तरी मी तो घ्यायला तयार आहे. जुहूच्या वाळवंटात नाथा बोटांनी `श्यामा चित्रे' अशी इंग्रजीत अक्षरे काढीत होता. त्याचे इंग्रजी अक्षर इतके वळणदार असेल अशी कल्पना नव्हती मला! उगीच नाही श्यामा चित्रे म्हणाली अक्षरांचा मुका घ्यावासा वाटतो म्हणून! टिळकांच्या पुतळ्याला एखादे मिनीट जरी वाचा फुटली असती तरी मी "श्यामा चित्रे आणि नाथा कामताची भेट झाली होती का हो?" एवढाच प्रश्र्न विचारला असता.
सहा महिन्यांच्या आत मी नाथा कामताला बोहल्यावर चढवला. कुण्या वागळे नामक सज्जनाची बी०ए०, बी०टी० होऊन बरेच दिवस गोडाउनमध्ये पडून राहिलेली ठेंगणीठुसकी गासडी अंतर्पाटापलीकडे उभी होती. तिने नाथाच्या गळ्यात माळ घातली. नाना कामत आणि आई कामत ह्यांच्या वृद्ध डोळ्यांत आसवे तरारली.
मांडवात एका कोच्यावर नाथा आणि त्याची ती निम्म्याहून अधिक कोच अडवलेली भार्या बसली होती. विहीणीसारखी दिसणारे वधू पाहून मला उगीचच पापी माणसासारखे वाटत होते. मी त्याची नाव निष्कारण भवसागरात लोटायला निघालो आहे असा विचार मनाला खट्टू करीत होता. किंबहुना, त्यामुळेच की काय कोण जाणे त्याच्या अहेरावर मी चांगला पन्नास रुपये खर्च केला होता. अहेराचे बॉक्स त्याच्या हातात द्यायला मी पुढे गेलो. नवऱ्यामुलाचे लक्ष मांडवाच्या प्रवेशद्वारापाशी होते.
"कॉग्रॅच्युलेशन नाथा! मी त्याला भानावर आणले.
"थॅंक्यू." तो दचकुन म्हणाला आणि अभावितपणे पुटपुटला. "रेखा गोडबोले." मी मागे वळून पाहिले. गोडबोले वकिलांची मुलगी नाथाच्या लग्नाच्या मांडवात शिरत होती. कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत हे विसरून नाथा मला सांगत होता, "विल्सनला आहे. इंटरला."
"कोण आहे विल्सनला?" नाथाचे ते अर्धांग बोलले.
हल्ली नववधू कोचावर वराशेजारी बसून स्वतःच्या लग्नातदेखील बोलतात. आमच्या कार्यात आमच्या कलत्राने देवक बसवल्या क्षणापासून सूप वाजेपर्यंत गुडघात घातलेली मान पाहून तिला कुबडबिबड आहे की काय अशी मला शंका आली होती.
"ती गोडबोले वकिलांची मुलगी! ती लेमन कलरची साडी नेसली आहे.."
काही तासांपूर्वी चि०सौ०कां० मधून नुसत्या सौ० मध्ये आलेल्या बायकोला तो बिनदिक्कत माहिती पुरवीत होता.
"मी सुद्धा विल्सनलाच होते." वधू म्हणाली.
चारपाच दिवसांनंतर नाथा हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या फाटाकापाशी थांबला. सुटीच्या दिवशी सकाळी पायपुसणे झटकायची माझ्याकडे कामगिरी असते.
"न्यूज!" नाथा म्हणाला.
"कसली?"
"अरे, श्यामा चित्रे आणि माझी वाइफ एकाच वेळी कॉलेजमध्ये होत्या विल्सनला!"
माझ्या हातातले पायपुसणॆ खाली पडले. म्हणजे ह्या माणसाने गाफिलपणाने आपल्या प्रणयप्रकरणांची खातेवही त्या नववधू पुढे उघडली होती की काय?
"म्हणजे श्यामा चित्रे हा विषय तू आपल्या नव्या कोऱ्या बायकोशी बोललास?"
"मी नाही, तिच म्हणाली."
"ऍं?"
"मी इंटरला होतो ना, तेव्हा ती फर्स्ट इअरला होती. लेडीज कॉमनरुमध्ये इंटरच्या मुली श्यामा चित्रेला माझ्यावरून चिडवीत होत्या म्हणे. तिला सगळं आठवतंय---"
"मग ही मुलगी--- म्हणजे ही तुझी वाइफ--- त्या वेळी तुझ्या नजरेत कुठं भरली नाही ती---"
"बाबा रे, त्या वेळी श्यामा चित्रेपुढं मला सारी दुनिया झूट वाटत होती. जाऊ दे.... बुलबुलके गमका यह दास्तॅ-- बुलबुलने सुनाया और सुना भी बुलबुलने... जुम्मा मशीदी म्हणूनच गेला आहे." हातातल्या पिशवीला झोले देत नाथा म्हणाला.
"पण तू तुझं श्यामावर प्रेम होतं वगैरे काही बोलला नाहीस ना नाथा?" अनेक वर्षाचा सांसारिक अनुभव हातात पायपुसणे घेऊन होता.
"छे, छे! उलट मी तिला हसरत खंजिरीचा शेर ऎकवला. बुलबुलने गुल देखा---"
"हे बघ, मराठीत सांग." मी कासावीस होऊन म्हटले.
"म्हणजे चमनमध्ये बुलबुल गात होता. अनेक फुलं त्याच्याकडे आशेनं पाहत होती. आरजू करीत होती. इंतिजार करीत होती---"
"कसली झार?"
"इंतिजार--म्हणजे वाट पाहत होती. पण बुलबुल आपल्या गाण्यात मस्त होता. फुलं फुलली, कुस्करली, पण बुलबुलानं त्यांच्या एकही दाग दिलाला लावून घेतला नाही."
"काही समजलं नाही तू काय म्हणालास ते. पण तिला संशय नाही ना आला?"
"संशय? उलट खूष झाली. बाबा रे, बायकांच्या दिलाला फुंकर कशी घालावी हे तुला नाही कळणार." नाथा मला सांगत होता. हे म्हणजे एखाद्या माकडाने प्रभू रामचंद्राला सेतूत टाकता टाकता बायको कशी सांभाळावी ह्यावर प्रवचन देऊन टोचण्यापैकी होते. तेवढ्यात सायकवरून एक पातळ भुर्रकन गेले. मानेचा तीनशेसाठ अंशाचा कोन गर्रकन फिरवून नाथा म्हणाला,
"ललिता दिघे! काय कॉंफ्लेक्शन आहे! अच्छा!. जातो!"
नाथा निघाला. मी पायपुसणे अधांतरी धरून थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होतो. लगेच दहा पावले टाकून तो परतला आणि पिशवी माझ्या डोळ्यांपुढे नाचवीत पुसता झाला,
"साबुदाणे कुठं मिळतात रे?"
"साबूदाणे?"
"हो. वाइफला उद्या उपास आहे एकादशीचा..."
"किराणाभुसार-- मालाचं दुकानं अशी पाटी असलेल्या कुठल्याही दुकानात मिळतात. आणि हे बघ, शितू सरमळकराच्या वेलकम स्टोअर्समध्ये मिळत नाहीत. नाहीतर तिथं तुला दिसायचा एखादा ताटवा---"
नाथाचे लक्ष माझ्या बोलण्याकडे नव्हते. मघाशी सायकलवरून निघालेले ते ललिता दिघे की कुणाचे पातळ आता पदराच्या जोडीला शेपटा उडवीत उलट दिशेला वळले होते आणि नाथाची मान पुन्हा तीनसेसाठ अंशांच्या कोनात फिरली होती. आणि त्याच्या गळ्यातून पुन्हा तो आवाज निघत होता---`गट्ळळगर्र्गम'!