एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईंपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत. "कार्टे चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे, ते त्यांच्या हाती सुखरूप आहे." अशी ठाम समजूत असे. "एके काळी असे" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डावरदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन्सिपॉल व्हावे लागले होते, पण पंधरा दिवसांतच मास्तर त्या खुर्चीला वैतागून पुन्हा आपले 'चितळे मास्तर' झाले. त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान असलेले काळे मास्तर हे प्रिन्सिपॉल झाले आणि अजूनही आहेत.
डाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य-नैऋत्य दाखवणारी काळी टोपीबाहेर टकलाच्या आसपास टिकून राहीलेले केस आले आहेत, नाक आणि मिश्यांनी ठेवण राम गणेश गडकऱ्यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला.
त्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले, आणी आता माझ्या पुतण्यांना शिकवताहेत. आमच्या गावातल्या शंकराच्या देवळातला धर्मलिंग गुरव आणि चितळे मास्तर यांना एकच वर्णन लागू-- नैनं छिन्दन्ति शस्रणि नैनं दहति पावकः! त्यांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे पाहिले आणि आता कदाचित तिसरेही पाहतील.
अजूनही गावी गेलो तर मी शंकराच्या देवळात जातो आणि तिथला धर्मलिंग गुरव "पुर्ष्या, शिंच्या राहणार आहेस चार दिवस की परत पळायची घाई?" असेच माझे स्वागत करतो. मला "पुर्ष्या" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर! धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. "पुर्ष्या शिंच्या" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, "पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात? फुगलायस काय!" धर्मलिंगाच्या या सलगीने गावातली नवी पिढी जरा बिचकली होती. आणि चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले होते, "पुर्ष्या, नाव राखलंस हो शाळेचं! वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे? वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना? अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस...?"
"मॅजेस्टी!" मी शाळेतल्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो.
"मॅजेस्टी~~! बरोबर!" चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती. ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांकडुन वदवीत. मला त्यांचा ईंग्रजीचा वर्ग आठवला.
"...टेक हर अप टेंडर्ली, लिफ्ट हर विथ केअर --- फॅशनड सो स्लेंडर्ली यंग ऍंड सो....?"
"फेअर!" सगळी मुले कोरसात ओरडायची.
इंग्रजी पहिलीत आल्यापासून मॅट्रिकपर्यंत सात वर्षे चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकवले. त्यांच्या मुख्य विषय इंग्रजी. पण ड्रॉइंग आणि ड्रिल सोडुन ते कुठलाही विषय शिकवीत. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक ह्या दोन गोष्टींशी त्यांचे कधीच जमले नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन त्या काळात आमच्या हायस्कूलला परवडण्यासारखी नव्हती. आठदहा शिक्षक सारी शाळा सांभाळायचे. आता शाळा पावसात नदी फुगते तशी फुगले आहे. भली मोठी इमारत, एकेका वर्गाच्या आठ आठ तुकड्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, दोन दोन हजार मुले वगैरे प्रकार माझ्या लहानपणी नव्हते. हल्ली मुलांना मास्तरांची नावे ठाऊक नसतात. माझ्या मास्तरांना शाळेतल्या सगळ्या मुलांची संपुर्ण नावे पाठ! पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे! एरवी मॅट्रिकपर्यंत पोंरानी आणि चितळे मास्तरांसारख्या मास्तरांनी देखील शाळेचा रस्ता अनवाणीच तुडवला. शाळेतल्या अधिक हुषार आणि अधिक 'ढ' मुलांना मास्तर घरी बोलावून फुकट शिकवायचे. "कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवीत नाही, त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल."
असल्या चिठ्या पालकांना येत नसत. पोर नापास होणे हा मास्तरांच्या 'माथ्या आळ लागे' अशी शिक्षकांची भावना होती. 'छ्डी' ही शाळेत फळा आणि खडू यांच्याइतकीच आवश्यक वस्तू होती.
चितळे मास्तरांनी मात्र आपल्या तीस-बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत छ्डी कधीच वापरली नसावी. त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की, तो मार पुष्कळ होई. फार रागावले की आंगठ्याने पोरांचे खांदे दाबत.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार पाहण्यासारखा असे. फळ्यावरच्या खडूची धूळ उडून उडून पिठाच्या गिरणीत नोकरीला असल्यासारखे दिसत. तरीही शिक्षणकार्य संपलेले नसे. संध्याकाळी त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'मागासलेल्या जमातीचे' वर्ग चालायचे.
चितळे मास्तरांचा वर्गात वापरण्याचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा म्हणून आम्ही नेल्सनसाहेबाचे अगर तर्खडकरांचे पुस्तक उघडून तयारीत राहावे तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारख्या खांद्यावर घेऊन शिरत. मग वर्गात खसखस पिके. मास्तर "अभ्यंकर, आपटॆ, बागवे, चित्रे" करीत हजेरी घेऊ लागायचे. तेवढ्यात शाळेच्या घंटेइतकाच जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावर ठेवी. चितळे मास्तर त्याला तो सगळी पृथ्वी हातावर उचलतो म्हणून 'हर्क्यूलस' म्हणत. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारीत, "हं बृहस्पती, गेल्या तासाला कुठं आलो होतो?"
"सर. इंग्लिशचा तास आहे."
"ऍ? मग भूगोलाचा तास केव्हा आहे?"
"तिसरा."
"मग तिसऱ्या तासाला तर्खडकराचं श्राद्ध करू या. भूगोलाची पुस्तकं काढा!"
ही पुस्तके तासाला काढण्यात काही अर्थ नसे. कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीच काही शिकवले नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, "कसला तास आहे?" ह्या प्रश्र्नाला "चितळे मास्तरांचा!" हेच उत्तर योग्य होते. सर्वानुमते एखाद्या विषय ठरायचा आणी मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयूष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना अजिबात कधी जमल्या नाहीत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचा नकाशा. पाचदहा मिनीटे फळ्यावर खडू इकडून तिकडून ओढल्यानंतर अगदी ओढगस्तीला लागलेला हिंदुस्थानचा नकाशा तयार व्हायचा!
"हिदुस्तान देश जरासा दक्षिण अमेरिकेसारखा आलाय का रे बुवा?" आपणच मिष्किलपणे विचारायचे. खांद्यावरून आणलेली नकाशाची गुंडाळी क्वचितच सोडीत असत. "हां, पांडू, जरा निट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा--"
मग आमच्या वर्गात ड्रॉइंगमध्ये पटाईत असलेला पांडू घरत चितळे मास्तरांनी काढलेली मातृभूमी पुसून झकास नकाशा काढायचा.
"देव बाकी कुणाच्या बोटांत काय ठेवतो पाहा हं. पांडुअण्णा, सांगा आता. मान्सून वारे कुठून येतात?"
एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.
"हं, गोदाक्का, सांगा आता वारा कुठल्या दिशेला वाहतोय?"
वर्गातल्या मुलींना मिस जोशी, मिस साठे म्हणणारे मास्तर तोपर्यंत शाळेत आले नव्हते. टाय बांधून, मिस जोशीबाशी म्हणणारे देशमुख मास्तर प्रथम शाळेत आले तेव्हा हे साहेबाचे पिल्लू शाळेत कुणी आणून सोडले असे आम्हाला वाटले होते. पायांत पांढरे टेनिसचे शूज घालणारे पिसे काढलेल्या कोंबडीएवढ्या रुंद गळ्याचे देशमुख मास्तर आमच्या शाळेतल्या अपटुडेटपणाची कमाल मर्यादा होते. एरवी बाकीचे सगळे धोतरछाप मास्तर मुलांना बंड्या, बाळ्या, येश्या, पुर्ष्या ह्या नावाने किंवा मुलींना कुस्मे, छबे, शांते, कमळे अशाच नावाने हाका मारीत चितळे मास्तर मात्र 'ढ' मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात 'ढ' होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथीपाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. तिच्या लग्नात चितळे मास्तरांनी नव-या मुलाला "माझी विद्यार्थिनीआहे हो! संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का?" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. "काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा?" चितळे मास्तर गळ्यात दाटलेला आवंढा दडवीत म्हणाले होते. गोदी पडावात चढली तशी त्यांनी हळूच डोळे टिपलेले मी आणि बाळू परांजप्याने पाहिले होते.
"मास्तर रडतायत बघ!" बाळू अजागळपणे म्हणाला होता.
"चिमण्यांसारखा नाचतात दहाबारा वर्षे ओसरीवर आणि भुर्र्किनी उडून जातात हो--" चितळे मास्तर गोदीच्या वडलांना सांगत होते. ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून चितळे मास्तरांनी वर्गात इतकी चेष्टा केली होती की, आजच्या जमान्यात पालकांची प्रिन्सिपॉलसाहेबांना चिठ्ठी आली असती. चिठ्ठी तर सोडाच, पण आमचे पालक तर शाळेत मास्तरांनी आपल्या कुलदिपकाला बदडले हे ऎकल्यावर घरी पुन्हा एकदा उत्तरपुजा बांधीत.
"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय?"
"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?" गोदी आपली शंकू वाण्याच्या
दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. "कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी!" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे
आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.
"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.
"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या? राम्या तु सांग."
मग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा की--"
"का रे राम्या?" मास्तर दटावायचे.
"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?"
"तिचा पदर कशाला दिसायला हवा?"
"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं?"
"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स?"
मग सगळ्या वर्गाकडुन "दिवसा वाहतात ते--" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग "गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचा संबंध.....?"
"ना~~~~ही!" पोरे ओरडायची.
"तरी आज आपण आलाय हे ठाऊक आहे त्यांना म्हणून कमी आहे. एरवी शाळेचं छप्पर डोक्यावर घेतात__" चितळे मास्तर शांतपणे त्यांना सांगत होते.
"पण जरा शिस्त लावायला हवी!" हसतखेळत संप्रदायाचा पुरस्कार करणाऱ्या इन्सपेक्टरांनी त्यांना गंभीरपणाने बजावले.
चितळे मास्तरांनी आपल्या साऱ्या आयूष्यात कुणालाही शिस्त नावाची गोष्ट लावायचा प्रयत्न केला नाही. स्वतःला लावली नाही. त्यांनी त्यांच्यापुढे आलेल्या सर्वोच्यावर फक्त प्रेम केले. प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. वर्गात एखाद्या मुलाने उत्तम निबंध लिहीला की दहापैकी आठ मार्क द्यायचे. मुलगा कुरकुरला की विचारायचे, "का रे बोवा?"
"सर, पण दोन मार्क का कापले?"
"तीन कापायचं जिवावर आलं माझ्या!"
इंग्लिश भाषेवर मात्र चितळे मास्तरांचे फार प्रेम होते. उच्चार अत्यंत देशी! शिकवण्याची पद्धत अगदी संस्कृत पाठशाळेसारखी.
पहिली-दुसरीच्या वर्गाबाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे 'ज्ञानेश्वरी'तल्या ओव्या म्हणाताहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती 'आय?' 'गो!' 'यू?' 'गो!', 'वुई?' 'गो!', 'ही' 'गो~ज!' ची चाल आठवते. इंग्रजी साभिनय शिकवायचे. "आय ऍम?" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे "ईटिंग" म्हणायची. मग तुरूतुरू चालत "आय ऍम....?" की पोरे "वॉकिंग" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, "आय ऍम...?" "स्लीपिंग" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, "गाढवांनो, माझी झोप मोडलीत!" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, "आय ऍम...?" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात "स्ली~पिंग" म्हणायची. "आय ऍम स्लीपिंग" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की "मुगूट पडला का आमचा?" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भान हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. "आय ऍम क्रॉलिंग" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा! त्यांच्या तासाला तास कधी वाजला ते कळत नसे. दुसऱ्या तासाचे मास्तर दारात येऊन ताटकळत उभे असायचे.
शाळेतल्या सर्व मास्तरांना चितळे मास्तरांची खोड ठाऊक होती. त्यामुळे एक वर्ग संपवून दुसऱ्या वर्गाची पुस्तके किंवा वह्या गोळा करायला चितळे मास्तर कॉमनरुममध्ये जाऊन पोहचेपर्यंत त्या वर्गाची लाइन क्लियर झाली नाही हे ते ओळखीत. चितळे मास्तर अत्यंत विसराळू होते. वर्गात वहाणा विसरून जाणे हा नित्याचा कार्यक्रम. मग विद्यार्थ्यापैकी कोणीतरी त्या पुढल्या वर्गात पोहचवायच्या. "अरे, भरतानं चौदा वर्षे सांभाळल्या! तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत?"
जोडीचे शिक्षक त्यांची खूप थट्टा करीत असावे. सहलीच्या वेळी हे लक्षात येई. चितळे मास्तरांना सहलीचा विलक्षण उत्साह. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले आम्ही त्यांच्याबरोबर पाहिले. पहिलीत गावाबाहेरच्या आमराईपासून सुरवात होई. चितळे मास्तर आमचे स्काउटमास्तरही होते. स्काउटमास्तरांच्या पोषाखात त्यांना जर वेडन पॉवेलने पाहिले असते तर सारी स्काउटची चळवळ आवरती घेतली असती. त्या वेळी स्कॉउटमास्तर हिरवा फेटा बांधायचे. चितळे मास्तरांच्या डोक्यावर तो फेटा दादासाहेब खापड्यांच्या फेट्यासारखा गाठोडे ठेवल्यासारखा दिसे. गावातल्या य्च्चयावत पोरांना त्यांनी पोहायला शिकवले. पोहायला शिकवायची मात्र त्यांची डायरेक्ट मेथड होती. मेहंदळे सावकाराच्या प्रचंड विहिरीत शनिवारी दुपारी ते पोरे पोहायला काढीत. आणि नवशिक्या पोराला चक्क काठावरून ढकलून देत. मागून धोतराचा काचा पकडून आपण उडी मारीत. कधी कधी खांद्यावर पोरगे बसवून उडी घेत. जो नियम मुलांना तोच मुलींना! माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे! साताआठ वेळा नाकातोंडात पाणी गेले की पोरे बॆडकासारखी पोहत. पोहून संपल्यावर डोकी ओली राहीली की ते स्वतः पंच्याने पुसत. आमच्या गावतले सगळे आईबाप, देवाला बोकड सोडतात तशी चितळे मास्तरांना पोरे सोडून निर्धास्त असत. शाळेतच काय पण रस्त्यात किंवा देवळातदेखील पोराचा कान धरायची त्यांना परमिशन होती.
मॅट्रिकच्या वर्गात पोहचल्यावर निवडक पोरांना वर नंबर काढण्यासाठी चितळे मास्तरांच्या घरी पहाटे पाचला जावे लागे. मास्तर आंघोळबिबोंळ करून खळ्यात मोठ्यामोठ्याने कसले तरी स्तोत्र म्हणत उभे! एका जुनाट बंगलीवजा घरात त्यांचे बिऱ्हाड होते. मास्तरीणबाईंना आम्ही मुलेच काय पण स्वतः चितळे मास्तरदेखील 'काकू' म्हणत.
"काकू~~ वांदरं आली गो. खर्वस देणार होतीस ना?" असे म्हणत अधून-मधून खाऊ घालीत. आणि मग शिकवणी सुरू व्हायची. ही शिकवणी फुकट असे. आणि शिकवण्याची पद्धतदेखील वर्गापेक्षा निराळी. त्या वेळी आमच्या गावात वीज नव्हती आली. मास्तरांच्या घरातल्या डिटमारचा दिवा आणि आम्ही घरातून नेलेले दोनचार कंदील ह्या प्रकाशात अभ्यास सुरू होई. चितळे मास्तर एक आडवा पंचा लावून उघडेबंब असे भिंतीजवळच्या पेटीवर बसत. ही भेलीमोठी पेटी हे त्यांचे आवडते आसन होते.
त्या पेटीत खच्चून पुस्तके भरली होती. मास्तरंचा गोपू माझ्या वर्गात होता. वेणू माझ्यापेक्षा मोठी आणि चिंतामणी धाकटा. ही तिन्ही मुले गुणी निघाली. गोपू मॅट्रीकला दहावा आला होता. हल्ली तो दिल्लीला बड्या हुद्यावर आहे. वेणूदेखील बी०ए० झाली. चिंतामणीने मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले. त्याला मास्तरांनी चिपळूणला सायकलचे दुकान काढुन दिले. त्याला मास्तर एडिसन म्हणत. हे कारटे लहानपणापासून काहीतरी मोडतोड करीत असे. गोपू आमच्याबरोबर शिकायला बसे. एरवी तो मास्तरंना आप्पा म्हणे. शिकायला बसला की आमच्याबरोबर 'सर' म्हणत असे. आम्ही चितळे मास्तरांनी नक्कल करायचे तसा तोदेखील करत असे. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा, पण मास्तरांनी पार्शलिटी केली असे चुकुनदेखील आम्हाला वाटले नाही. कारण वर्गात इतर मुलांप्रमाणे त्यालादेखील ते "गोपाळराव चितळे, उठा. द्या उत्तर ." असे म्हणायचे . कान धरून उभे करायचे. चारचौघांसारखाच तोही!
पहाटचे त्या अधुंक प्रकाशीत चितळे मास्तरांच्या ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात चाललेला तो स्पेशल क्लास अजूनही माझ्या स्वप्नात येतो. तिथे मी 'रघुवंश' शिकलो, टेनिसन, वर्डस्वर्थ ह्यांच्या कविता वाचल्या. वर्गात शिकवताना त्यांच्या आवाज चमत्कारीक वाटे. पण पहाटे घरी ते 'रघुवशं' म्हणायला लागले की गुंगी यायची. आमच्या आधी ह्या वर्गात शिकलेल्या तीनचार मुलांनी 'जगन्नाथ शंकरशेट' मिळवली होती. आमच्यात कुणी तसा निघाला नाही. जरा ओशाळेच होऊन आम्ही त्यांना पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो होतो.
"काकू, कुरुक्षेत्रातले विजयी वीर आले. ओल्या नारळाच्या करंज्या ना केल्या होत्यास? एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे! तुझ्या बापसाला बोललोय मी! उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन! बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात?"
"एलफिन्स्टन!"
"स्पेलिंग सांग."
मग काकू करंज्या पुढे ठेवता ठेवता म्हणाल्या होत्या, "आहो, मिस्त्रुडं फुटली त्यांना आता! स्पेलिंग कसली घालता? मुंबईस जायचास की पुण्यास?"
"बघू, बाबा धाडतील तिथं जायचं___"
चितळे मास्तरांच्या आणि असंख्य मुलांच्या वाटा इथून अशाच तऱ्हेने वेगळ्या झाल्या आहेत. मग अनेक वर्षात गाठी पडत नाहीत. पण नित्याच्या व्यवहारातदेखील त्यांची आठवण राहीली आहे. "ओळीत फक्त आठ शब्द लिहायचे" हा त्यांचा दंडक हातवळणी पडला आहे. "नववा शब्द आला ओळीत तर काय लिहीलं आहेस ते न वाचता पेपरावर भोपळ्याचं चित्र काढीन." ही धमकी ते खरी करून दाखवीत.
एके दिवशी सकाळी मुंबईला माझ्या दारावरची घंटी वाजली. हातात पिशवी घेऊन दारात चितळे मास्तर उभे! तोच कोट, तीच ईशान्य-नैॠत्य टोपी, डाव्या हातात पिशवी आणि उजवा हात तसाच तर्जनी वर करून धरलेला.
"मास्तर, तुम्ही!" मी आश्र्चर्याने विचारले.
"धन्य हो तुझी मुंबई!" आत येत येत मास्तर म्हणाले.
"का, काय झालं?" हिने त्यांच्या हातातली पिशवी घेत विचारले.
"होयचंय काय? हां, त्या पिशवीत आंबे आहेत. आदळशील धांदरटासारखी."
माझी पत्नीदेखील त्यांचीच विद्यार्थिनी आहे. त्यामुळे आम्हा दोघांनाही ते वाटेल ते बोलू शकतात.
"का? मुंबईनं काय केलं तुमचं?"
"अरे, पूर्वी राहत होतास ती जागा ठाऊक मला. ह्या भागात कधी आलेलोच नाही मी. वरळीला मागं एकदा जांबोरी झाली होती स्काउटची तेव्हा आलो होतो. जंगल होतं सगळं. तुझ्या इमारतीचा कुठं पत्ताच लागेना! बंर, तू लोकमान्य टिळकांचा बाप___"
"मी?"
"हो! म्हणजे जगप्रसिद्ध तू-- मला वाटलं, सगळ्यांना ठाऊक असेल तुझा पत्ता. खालच्या पानवाल्याससुद्धा ठाऊक नाही तू वर राहतोस ते! मी म्हटलं, 'अरे नाटकात असतात ते-- विलायतेला जाऊन आले.' तशी चावट माणूस म्हणतो कसा, 'साहेब, हल्ली भंगीदेखील जाऊन येतात.' खंर आहे म्हणा ते. आम्हाला आपलं कौतुक. इतरांस काय होय! निदान तुझी नाटकं तरी फुकटात दाखवून काढ सगळ्यांना म्हणजे विचारणाराला पत्ता तरी सांगतील जरा आदरानं."
"केव्हा आलात?"
"आज बरोबर दहा दिवस झाले."
"छे! वेणीच्या नवऱ्याची बदली झाली नाशकाला. मी आपला जनू पानश्याकडे टाकलाय डेरा!"
"जनू पानशे म्हणजे___"
"दुधवाल्या पानशाचा रे! तुझ्याच ना वर्गात होता?...नाही. तो अडतीसच्या बॅचमधला. ढ रांडेचा. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवणारा!"
चितळे मास्तर बदलायला तयार नव्हते. हा बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवण्याचा विनोद त्यांच्या वर्गातल्या ती पिढ्या ऎकत आल्या आहेत.
खुर्चीवर स्थानापन्न होऊन पाच मिनिटेही झाली नव्हती. तेवढ्यात त्यांची नजर टीपॉयवरच्या सिगारेटच्या पाकिटावर गेली.
"सिगरेटी फुंकतोस वाटतं?"
शाळा सोडल्याला आता मला पंचवीसएक वर्षे झाली. पण अजून कधी मी चितळे मास्तरांच्या पुढे सिगरेट ओढली नव्हती.
"आमचा गोपूही ओढतो. माझ्यासमोर नाही ओढीत, पण ताडलंय मी. आण बघू रे तुझी सिग्रेट. मी देखील ओढून पाहावी म्हणतो. गावी धैर्य नाही होत." साठीच्या घरातले चितळे मास्तर सांगत होते. "तू जरा आत जा गो." हिला म्हणाले.
"राहू दे मास्तर-- उगीच ठसका लागेल."
"नको म्हणतोस? बाकी असल्या चैनीला सवडच नाही झाली हो कधी!"
"बंर, मुंबईला किमर्थ आगमन?"
"भिक्षां देही! दुसरं काय? शाळेत ओपन एअर थेटर बांधतोय!"
"काय बांधताय?" मी दचकून म्हणालो.
"दचकलाससा एवढा! नाटकवाला तू-- तुला रे दचकायला काय झालं? सरकारकडून निम्मी ग्रांट मिळायची आहे. निम्मे पैसे आम्ही गोळा करणार. गेल्या वर्षी नाट्यस्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला जिल्ह्यात!"
"आपल्या शाळॆचा?"
"हो हो, आपल्या शाळेचा ! 'बेबंदशाही' बसवलं होतं. झिलग्या पावशेकराच्या मुलानं संभाजीचा पार्ट असा फक्कड केला म्हणतोस-- थेटर नुसतं टाळ्यांनी दणाणून सोडलंनीत."
हे सर्व मला नवीनच होते.
"आणि ही नाटकंबिटकं तुम्ही करू देता? आमच्या गॅदरिंगला नाटक करायचं म्हटल्यावर तुम्ही वर्गाबाहेर उभा केला होतात मला."
"पुर्ष्या, फुकट हो तू. अरे, टाइम्स हॅव चेंजड! हल्ली आपला सकाळचा क्लास बंद. शाळाच मुळी साताला सुरू होते. एक शिफ्ट सकाळी आणि दुसरी दुपारी. गिरण झाली आहे. बावन मास्तर आहेत शाळेत. चंद्रसूर्य___"
"चंद्रसूर्य?"
"एकाच आकाशात; पण एक उगवला की दुसरा मावळतो."
"असं असं-- बरं, जेवूनच जा."
"नाही नाही. नुरू काजीकडे जेवायचं आमंत्रण आहे. आपल्या इस्माईल काजीचा मुलगा. चाळीसच्या बॅचमधला. हुषार पोरगा. सचिवालयात आहे. एज्युकेशन मिनीस्ट्रीत. त्याच्यामुळंच तर ओपन एअर थेटरची ग्रांट मिळाली. ती सगळी सव्यापसव्यं तोच करतो. काय इंग्लिश लिहीतो! परवा मजा सांगत होता. दुसरा कुणी तरी हापिसर बदलून आला--त्याची फाइल याच्याकडे आली होती. फाइलवरच्या नोटिंगमध्ये प्रत्येक ओळीत आठ शब्द! सहज सुचलं-- फोन केला. ओळख नाही हो ह्याचीन त्याची--फोनवर विचारलं, जोगळेकर का? तो म्हणाला, हो! मी म्हणाला काजी बोलतोय.तो चटकन 'यस सर' म्हणाला. हाताखाली असेल, एरवी 'सर' कशाला म्हणतोय? काजी म्हणाला, चितळे मास्तरांचे का हो विद्यार्थी? तो जोगळेकर पलीकडे आठ इंच उडाला खुर्चीवर! कसं ओळखलंत हो म्हणाला. तशी काजी म्हणाला, फाइलवरच्या नोटींगमध्ये एका ओळीत नववा शब्द आला तो खोडून पुन्हा खालच्या ओळीत तस्सा लिहीलात...आपल्या हरी जोगळेकराचा मुलगा. अठ्ठेचाळीसची बॅच! इंग्लिश, मॅथ्स, संस्कृत आणि फिजिक्समध्ये डिस्टिंक्शन बी०ए० ला दुसरा आला होता, तोही आहे सचिवालयात फायनान्समध्ये."
"मग आता काजीकडे जाणार जेवायला?"
"बजावून सांगितलय--मटणबिटण घालशील खायला, तर तुझ्या शिक्षणमत्र्यांला जाऊन सांगीन तिसरीत भूगोलाच्या पेपराची कॉपी केली होती यानं म्हणून! गोष्ट खरी आहे हो. हुषार पोरांनादेखील मोह होतो."
"बरं, मग आता काय चहा घेणार की कॉफी?"
"तुझी सहधर्मचारिणी देईल ते घेईन. काय देत्येस? गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधी---काकू फार आठवण काढत्ये गो तुझी!"
"बरी आहे प्रकृती?"
"मोतीबिंदू झालाय. बाकी मास्तराच्या घरात बायकोच्या गळ्यात काही मोत्ये पडली नाहीत, डोळ्यांत पडली. गोपू म्हणालाय आपरेशन करायचं म्हणून आपला साने झाला आहे आय स्पेशलिस्ट! गेल्या खेपेस भेटलो होता त्याला! मोठा गोड मुलगा. हस्ताक्षर काय सुंदर त्याचं...कविता करी--- आता डोळ्याची आप्रेशन करतो."
"मग आता कुठं कुठं भिक्षांदेही झाली? आणि मास्तर, हे नाटकाचं थिएटर शाळेत करायचंय काय?"
"शाबास नाटकवाला असून इतका सनातनी? अरे, आमचं 'बेबंदशाही' पाहिलं असतंस तर माझी पाठ थोपटली असतीस."
"तुमची?"
"म्हणजे डायरेक्टर ना मी?"
मी एकेक नवलच ऎकत होतो, "तुम्ही डायरेक्टर?"
"मग तुला काय वाटलं तूच? अशी घोकंपट्टी करून घेतली पोरांकडून--नुसतं आपापलंच नव्हे, सगळ्यांना सगळं नाटक पाठ! पहाटे पाचाला जमवीत असे! कार्ट्याची मजा बघ. साताच्या शाळेला डोळे चोळीत आठापर्यंत उगवतात. नाटकाच्या तालमींना मात्र संभाजीपासून औरंगझेबापर्यंत सगळे पाचाला हजर!"
"सगळ्यांकडून कशाला सबंध नाटक पाठ करून घेतलंत?"
"शहाणा आहेस! आयत्या वेळी झाला एखादा आडवा तापानं किंवा सर्दी-खोकल्यानं तर नाटक नसतं का झोपलं? पण मुहूर्त पाहून नारळ फोडला होता. माझा नाही विश्र्वास ह्या भाकड गोष्टींवर; पण पोरं म्हणाली, मुहूर्त पाहून नारळ फोडा.बाकी मला ह्या पोरांचं काही कळेनासंच झालंय हो! वर्गात हल्ली एकजण टोपी घालून येत असेल तर शपथ! खिशात लेखणी नसते, पण फणी आहे. एकेकाच्या भांगाच्या तऱ्हा पाहा. पण शिंचे मुहूर्त पाहतात, हातांत कुठल्या कुठल्या बाबांच्या आंगठ्या घालतात, गळ्यांत लाकिंट घालतात. पोहण्याबिहिण्याचे वर्ग लिक्विडेशनमध्ये निघाले--धिस इज रियली पझलिंग! ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हण किंवा स्वातंत्र्यानंतर म्हण, बराच काहीतरी गोंधळ झालाय. गावात तुमच्याही वेळी सिनेमा होता, पण तुम्ही काय शाळा चुकवून नाही जायचे. आता निम्मी पोरं त्या थेटरात! तुला आश्र्चर्य वाटेल, नवा सिनेमा लागला की मीदिखील जातो."
"सिनेमाला?"
"सिनेमाला नव्हे, इंटर्वलला."
साठीशी पोहोचलेले चितळे मास्तर जरासे 'हे' होत चालले आहेत की काय असे मला वाटले. मी 'आ' वासून त्यांच्याकडे पाहू लागलो.
"झापड मिटा." फार दिवसांनी चितळे मास्तरांचे हे आवडते वाक्य ऎकले. वर्गात पोरांना तोंड उघडून बसायची सवय असते. बावळटासारखे तोंड वासून पोर बसले की मास्तर नेहमी "झापड मिटा" म्हणायचे.
"पण मास्तर. 'इंटर्वल' बघायला जातो म्हणजे काय कळलं नाही."
"नाहीच कळायचं! अरे, आधी जाऊन काळोखात उभा राहतो. आपल्या शिर्क्याचं थेटर. तिकीट बसत नाही मला. विद्यार्थी तो माझा अगदी सुरूवातीच्या बॅचमधला. त्याच्याकडून इंटर्वलचा फ्री पास मागून घेतलाय. तर सांगत होतो काय, काळोखात उभा राहतो आणि चटकन उजेड पडला की पाहतो प्रेक्षकांत शाळेतली कोकरं किती घुसली आहेत ते! एकदाच दिसला तर चिंता नाही. पण त्याच सिनेमास दुसरुंदा रे काय पाहायला आलास?"
"उद्योग झाला म्हणायचा हा!" ही म्हणाली.
"तुम्हाला कळायचं नाही! फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जमाना गेला आता. आता म्हणजे मीनाकुमारी, बीना रॉय--- उद्या इतिहासाच्या तासाला ह्यांचीच चरित्रं शिकवायचो. चालायचचं. टाइम्स हॅव चेंच्ड. ते जाऊ दे. माझा मुख्य मुद्दा भिक्षांदेहीचा---त्याचं काय करतोस बोल."
"तुमचा मुक्काम किती दिवस?"
"पुढल्या आठवड्यात शाळा सुरू होते. परवा तरी निघायला हवं."
"मग आज रात्री जेवायला या."
"हल्ली रात्रीचं जेवण बंद!"
"मी उपासाचं करीन!"
"अग, व्रत म्हणून बंद नव्हे. आयूष्यात व्रत एकच केलं---- पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसुन जगात पाठवून देणं. पण रात्री राहायला येईन बापडा इथं."
"अवश्य या. पण घर सापडेल का रात्रीचं?"
"ते मात्र बरीक कठीणच हो! वास्तविक विल्सनचा स्टूडंट हो मी. अरे, पण माझ्या वेळेची चौपाटी म्हणजे चर्नीरोड स्टेशनाच्या पायऱ्या धुऊन जायची. सखूबाईच्या खाणावळीत भोजन आणि मोहन बिल्डिंगमध्ये वास! आता दरवर्षी बघतो तर मुबंई बदलत चालली आहे. परवा पाच मिनीटं कॉलेजकडे जाऊन आलो आत हिंडून! आपले दोन विद्यार्थी आहेत विल्सनला... आमच्या वेळी एलफिन्स्टनपेक्षा विल्सन स्वस्त पडे. मॅकेंझी होता प्रिन्सिपॉल! डिव्होडेट माणसं! त्यांची ती डिव्होशन बघूनच तर ह्या शिक्षकांच्या धद्यांत शिरलो मी. तशी एक महीना कलेक्टर कचेरीत नोकरी केलीय--खिशात 'केसरी' सापडला म्हणून काढून टाकलं होतं मला म्हणून तर ह्या राष्ट्रकार्यात शिरलो! मुंबई सोडताना मॅकेंझींना भेटायला गेलो होतो. म्हणाला, आता काय करणार? मी म्हटलं, मास्तरकी! मला पाठीवरून हात फिरवून ब्लेसिंग्ज दिली होती त्यांनी. त्या वेळी चौपाटीवर आमचं कॉलेज झक्क उठून दिसे. आता म्हणजे टोलेजंग इमारतींत द्डून गेलंय. समोरच्या समुद्राच्या लाटा तेवढ्या पुर्वीसारख्या राहिल्या आहेत. बाकी एव्हरीथिंग हॅज....?"
"चेंजड!" मी आणी ही एकदम म्हणालो. दोघांनाही ती सवय होती.
"बरं मग मी न्यायला येतो तुम्हाला. कुठं असाल संध्याकाळी?"
"संध्याकाळी मी जाणार आहे, आपल्या--अरे, तुझ्याच बॅचमधला तो--- मुकुंद पाटणकराकडे."
"म्हणजे हिंदू कॉलनीत?"
"यस! ही ईज डुइंग व्हेरी वेल! मोटर घेतली आहे. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा खूप हिंडवलनीत. तशा मुंबईत माझ्या पाचसहा मोटारी आहेत..." चितळे मास्तरांचे ते मिष्कील हसणे कायम होते.
संध्याकाळी मी मुकुंदाच्या घरी गेलो. "मास्तर आले आहेत ना रे?"
"हो, आत आहेत. बेबीला गोष्ट सांगताहेत."
मला एकदम आठवले. मुकुंदाची पाचसहा वर्षाची मुलगी गेले वर्षभर पोलियो होऊन बिछान्यावर पडली होती. मी आत डोकावून पाहिले. मास्तर तिला गोष्ट सांगण्याच्या रंगात आले होते. कुठल्या तरी राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्राचे विमान आकाशातून गेले तेव्हा दोन्ही हात पसरून चितळे मास्तर त्या खोलीभर धावले. मी आणि मुकुंदाने एकमेकांकडे पाहिले. मुकंदाच्या डोळ्यांत पाणी तरारले होते.
"इथं आल्या दिवसापासून रोज संध्याकाळी बेबीला एक गोष्ट सांगून जातात."
मास्तरांची गोष्ट संपत आली होती.
"आणी अशा रीतीनं तो राजपुत्र आणि राजकन्या अत्यंत सुखानं नांदू...?"
"लागली!" बेबी, मुकुंदा आणि मी एकदम म्हणालो.
मी आणि मास्तर टॅक्सीत बसलो.
"जरा थांबा."
"काय रे?" मास्तर म्हणाले.
"काही नाही. जुनी सेवा---पायांत चप्पल नाही तुमच्या."
"राहील्या वाटतं वर. राहू दे. उद्या यायचंच आहे."
"थांबा, मी आणतो..."
"छे छे! खुळा की काय?"
मी वर गेलो. मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टॅडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले--- कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या!