'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...Gandharva by Pu La Deshpande


मराठी रंगभूमीला पडलेले भरजरी स्वप्न म्हणजे ' बालगंधर्व ', मराठी नाट्यसंस्कृतीचा सुरेल इतिहास म्हणजे ' बालगंधर्व ' ... याच गंधर्वयुगाच्या स्मृती जागवत ' बालगंधर्व ' हा जरतारी सिनेमा आज प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने १९८६ मध्ये बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या गंधर्वगौरवाचा हा पुनर्प्रत्यय...


ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्याच्या लेखी काहीही असले तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्य हिशेबी हे बालगंधर्वनाम संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा ह्या महाराष्ट्राच्या नाट्य कला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.

रहस्य कायमच

जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम दर्जाचे कार्य करणा-यांना श्रेष्ठत्व मिळते, लोकप्रियता मिळते, पण विभूतिमत्व लाभतच असे नाही. ही कुणी कुणाला उचलून द्यायची पदवी नाही. विभूतिमत्त्वाच्या देवाणघेवाणीची तिथे सांगता नसते. बालगंधर्वांना असे विभूतिमत्व लाभले आणि ते देखिल ज्या काळात ते वावरत असलेल्या नाट्यक्षेत्राकडे अवहेलनेने पाहिले जायचे, अशा काळात असंख्य रसिकांच्या मनात त्यांनी घर केले. ह्यामागील रहस्य शोधून काढायचा अनेक कलावंतांनी आणि कलासमीक्षकांनी प्रयत्न केला त्यांच्या अभिनयगुणांचं, गायनातल्या वैशिष्ट्यांचं, त्यांच्यातल्या उणिवांचे विश्लेषण करणारे लेख लिहिले. भाषणं केली. आपली चिकित्सक बुद्धी पणाला लावली. एवढे करूनह या कलावंताला लाभलेल्या विभूतिमत्त्वाचे रहस्य हाती पूर्ण लागल्याचे समाधान कुणाला मिळाले असेल असे वाटत नाही. वास्तविक बालगंधर्वाहून अधिक सुंदर दिसणारे आणि अधिक प्रभावी रितीने गाणारे कलावंत त्यावेळी होते आणि आजही आहेत. अण्णा किर्लोस्करांच्या शाकुंतल, सौभद्रपासून आजतागायत चालत आलेल्या मराठी नाटकांविषयीच्या मराठी रसिकांच्या मनातल्या जिव्हाळ्याची ज्यांना कल्पना नाही अशी माणसं तर म्हणतील की स्त्रीवेश घेऊन नाटकात नाचणा-या एका नटाचं ही मंडळी हे काय एवढे स्तोम माजवताहेत. त्यांना बालगंधर्वांना लाभलेल्या रसिकांच्या प्रेमाची प्रतच कळणं अवघड आहे. म्हणूनच कविवर्य माडगुळकर जेव्हा ' असा बालगंधर्व आता न होणे ' अशी ओळ लिहून गेले तेव्हा हजारो मराठी रसिकांना कवी आपल्या मनातले बोलला असे वाटले.

सूर बरसणारा वरूण

अत्यंत अवघड गोष्टी अगदी सोप्या आहेत असे करून दाखवणे ही असमान्य प्रतिभावंतांनाच साधणारी किमया आहे. गहन तत्त्वज्ञान देखिल ग्यानबा-तुकाराम सोपं करून सांगतात आणि वरपांगी सोपी वाटणारी ओवी किंवा अभंगातील ओळ अनुभवायचा प्रयत्न करायला लागलो की ती ओळ किती खोल पाण्यातून आली आहे याची जाणीव होते. इथे आपले हात जोडले जातात तेही असली अद्भूत किमया घडवणा-या प्रतिभा नावाच्या शक्तिपुढे. कुणी मग त्याला देवाचे देणे म्हणतात, कुणी पूर्वजन्माची पुण्याई म्हणतात, त्या तर्कापलिकडल्या अनुभवाला काहीतरी म्हटल्याशिवाय आपल्याला राहवत नाही आणि मग आपण काहीतरी म्हणत असतो. पण असले आनंददायक अनुभवच आयुष्यभर आपले खरे सांगाती असतात. आयुष्यातील सारी कृतकृत्यता असल्या अनुभवांच्या क्षणांची एखाद्यापाशी किती साठवण आहे यावर जोखायची असते. ज्यांना श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणावे असे कलावंत वरूणसारखी असल्या आनंदांच्या सरींची बरसात करून असंख्य मनांचे मळे फुलवित असतात. बालगंधर्व हा असाच एक वरूण, सूर बरसत राहणारा. नुसत्या गाण्यातूनच नव्हे तर गद्यातूनसुद्धा. त्यांच्या नुसत्या स्मरणाने भीमपलास, बागेश्री, यमन, बिहाग, खमाज या रागांची एकदम कारंजी मनात उडायला लागतात. तसेच तुषार स्वयंवरातील ' दादा ते आले ना ' किंवा ' खडा मारायाचा झाला तर ' किंवा एकच प्यालातील ' हे चरण जिथं असतील तोच माझा स्वर्ग ' किंवा दौपदीतल्या ' जा ! दुःशासनाला म्हणावं दौपदी स्वतंत्र आहे. दौपदी कुणाची दासी नाही बरं. दासी नाही ' यासारख्या गद्य वाक्यांच्या स्मरणानेही उसळतात. त्यांची ' अन्नदाते मायबापहो ' ही आर्जवी हाक आठवली की त्या स्मरणाने अंगावर काटा उभा राहतो. मन भरून येते. आयुष्यातल्या एका पुष्पपरागसुगंधित स्मृतिपथावरून आपण सहलीला निघाल्यासारखे वाटतं. हा स्मृतिपथ किती दूरवर घेऊन जाईल ते सांगता येत नाही.


नाटक नव्हे, शुभकार्य

गंधर्वांचे नाटक पाहणे हे नुसते तिकीट काढणे आणि थेटरात जाऊन नाटक पाहाणे एवढंच नसे. कुटुंबात एखाद शुभकार्य निघावं तसं गंधर्वाचं नाटक पाहायला जाण्याचं कार्य निघायचं. थेटरात तास तास आधी जाऊन पोहोचायचं. मग गणपतराव बोडस, मास्तर कृष्णराव, रानडे ही मंडळी रंगपटाकडे जाताना बघायला मिळत. विठोबाच्या देवळाच्या प्रांगणात निवृत्ती, ज्ञानदेव ही संत मंडळी साक्षात दिसावी तसं वाटे. आमची तिकिटे पिटातली किंवा त्यांच्या आसपासची माडीवरची असायची. मग माडीवरून खाली पुढल्या कोचाकडे येणारी धनिक मंडळी दुरून पाहायची. एकदा ह्याच ऑपेरा हाऊसमध्ये अल्लादिया खाँसाहेब आले होते. वडलांनी मला त्याला वाकून नमस्कार करायला लावला होता. वडलांचे बालपण कोल्हापूरात गेल्यामुळे अल्लादिया, बुर्जीखाँ, मंजीखाँ ही नावे माझ्या कानावरून फार लहानपणीच गेली होती. त्या एकच प्यालानंतर पुढे बालगंधर्वांची पुढे कितीतरी नाटके पाहिली. रिपन थेटरात पाहिलेल्य त्यांच्या कान्होपात्रेत शेवटी विठ्ठलचरणी विलीन होऊन काष्टवत झालेली कान्होपत्रा पाहताना अभिनयातला तो मला एक चमत्कार वाटला होता. त्या नाटकाच्या प्रयोगाची एक मजेदार आठवण आहे. एरवी स्टेजसमोर गादीवर बसून आपल्या तबल्याने लोकांना जागच्याजागी नाचायला लावणारे थिरकवा खाँसाहेब गंमत म्हणून नाटकातल्या भजनात वारकरी वेश चढवून पखवाजी पांडोबा बोंद्र्यांच्या शेजारी टाळ वाजवित नाचत होते.

माझ्या आयुष्यात एकाचढ एक गायक वादक ऐकायचा योग मला लाभला. त्या गायकांची तुल्यबळ म्हणावे असे आजही तरुण गायक-गायिकांचे गाणे, वाजवणे ऐकायला मिळते. पण बालगंधर्वांच्या स्वराची किमया काय आहे ते मात्र कळत नाही. तासतास तयारीने पिसलेल्या भीमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भीमपलासात ' देवा धरले चरण ' एवढी नुसती तीन शब्दांची ओळ भिजवून काढली की सगळा भीमपलास एका क्षणात आपल्या शरिराबाहेर रंध्रारंध्रातून आत झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं हा काही केवळ रम्य ते बालपण छाप अभिप्राय आहे असे नाही. मध्ये एक काळ असा आला होता की चित्रपटसंगीताच्या लाटेत बालगंधर्वांची स्वरांकित द्वारका बुडून जाणार की काय अशी भिती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली ते कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुनर्जन्म घेतल्यासारखी प्रकटली. बालगंधर्वांना ज्यांनी कधी प्रत्यक्ष पाहिले नाही, की प्रत्यक्ष ऐकलेही नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनीमुद्रिका ऐकून त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानताना दिसायला लागली. मला कधीकधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे मॉड संस्कार असेलेली तरुण मुलंमुली जर चांगल्या संगतीची नजर लाभलेली असेल तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्यस्थळांना साठ-सत्तर वर्षांपूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदाने दाद देताना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तीची लीला जाणून घेणं असतं. असा स्थल काल निरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एक तर निगर्सप्राप्त असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेने फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातली निरपेक्षता आणि सहजता ह्या दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणे हा निसर्गाचा सहजधर्म. तसाच सहजधर्म म्हणून गळ्यातून सूर वाहतो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गाने निरपेक्ष भावनेने आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणा-या निर्झराच्या देण्यासारखे एक देणे असते. ते कोण आणि कुठे आणि कसे घडवितो हे कोडे सुटले असते तर बालगंधर्वाच्या गाण्यातल्या आनंदकोशाचे रहस्य उमगले असते.

स्वरदानाचे वरदान

शंभर वर्षांपूर्वी सूर लयीचा स्वयंम् अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारे हे देणे महाराष्ट्रात जन्माला आले. सूर आणि लय यांचे पार्वती परमेश्वरासारखे संपृक्त स्वरूपातले दर्शन त्याने घडवले आणि ते ही कुठून ? तर स्वतःला शिष्ट समजणा-या समाजातल्या लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरून, आंगणातल्या मातीत रांगणा-या बालकृष्णाने आपल्या चिमण्या मुखाचा ‘ आ ’ करून यशोदेला विश्वरूपदर्शन घडवले... तसे ह्या बालगंधर्वानेही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या ‘ आ ’ कारामागचे भारतीय अभिजात संगीतातले विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिले. विचारहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीत कलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे, तर मराठी माजघरा-माजघरात गंधर्वाचं गाणं गेलं. त्याचा आदर झाला. लाड झाले. स्त्री-पुरूषांनी मोकळ्या गळ्याने त्या गाण्यांची सलगी जोडली. महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान. मनाच्या झोळीत ते कृतज्ञतेने स्वीकारावं आणि स्वतःला धन्य मानावं.

म्हणून म्हणतो की, ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्याच्या लेखी काहीही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे ‘ गंधर्वनाम संवत्सर ’ च आहे.

( ‘ कालनिर्णय ’ च्या सहकार्याने)

महाराष्ट्र टाईम्स
६/५/२०११
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8171275.cms