गवय्या होते होते -- पु.ल. देशपांडे Gavayya Hote Hote by P L Deshpande

तसा मी काही फारसा महत्वाकांक्षी माणूस नाही. नेपोलियन हा जगातला सर्वात महत्वाकांक्षी पुरूष मानला जातो. त्याच्याशीच तुलना करायची म्हणजे नेपोलियनचं एक तीनशे पानांचं चरित्र माझ्या कपाटात आहे, ते वाचून काढायची माझी एक महत्वाकांक्षा आहे. वास्तविक मी होऊन नेपोलियनच्या वाटेल्या कधीच जाणार नव्हतो. एकदा मित्रांच्या बैठकीत मी माझी एक माफक महत्वाकांक्षा बोलून दाखवली होती. तेव्हा माझ्या एका विद्वान मित्रानं चिडून माझ्यावर हे नेपोलियनचं तीनशे पानी चरित्र मानलं होतं. तेव्हापासून तो नेपोलियन माझ्या कपाटात बंदिस्त होता. वास्तविक माझ्या मित्राला चिडण्यांच कारण नव्हतं. त्याची महत्वाकांक्षा आमच्या गावातल्या मुन्सिपाल्टीचा अध्यक्ष व्हायची होती आणि माझी महत्वाकांक्षा ज्या नोकरीत दुपारी तीन तास झोप घेता येईल अशी नोकरी मिळवणं एवढीच होती. असली क्षुद्र महत्वाकांक्षा ठेवल्याबद्दल त्यानं माझ्यावर अख्खा नेपोलियन मारला होता.

अप्लसंतोष हा सुखी जीवनाचा पाया आहे, असं माझं माझ्यापुरतं मत आहे. आणि अनुभवानं माझं हे मत पक्कं झालं आहे. लहानपणी वडील माणसं "बाळ, तु मोठा झाल्यावर कोण होणार रे?" असा प्रश्र्न मला विचारून मग आपणच पस्तावत असत. माझी पहिली महत्वाकांक्षा हॉटेलात भजी तळणारा होणं ही होती. आमच्या घरासमोरच एक 'धि न्यू बलभीम सुग्रास हॉटेल' होतं. संध्याकाळी पाच वाजले की हॉटेलच्या दारात एक दणदणीत उघडाबंब गृहस्थ भजी तळायला बसायचा. त्या सुगंधानं वातावरण भरून जायचं. त्याची ती झारा फिरवण्याची ऎट! तेल उकळलं की नाही पाहायला तो त्या तापल्या कढईत पाण्याने चार थेंब टाकून चर्रर्र असा आवाज करायचा. मग सराईत हातांनी पिठाचे गोळे वळायचा. कांदा तर असा सुंदर चिरायचा की देखते रहना. मग झपाझप भजी तळायला लागायचा. तळता तळता कपाळावरचा घाम मोठ्या ऎटीत पुसायचा. एवढं सर्व चालू असताना त्याच्या तोंडात विडीदेखील असायची. आणि त्याचे लांब केस झाऱ्याचा हालचालीबरोबर पुढंमागं झटकले जायचे ते मनोहर दृश्य आजदेखील माझ्या डोळ्यांपुढं उभं आहे. त्यामुळं लहानपणी कोणीही विचारलं की,

"बाळ, मोठा झाल्यावर कोण होणार?" की माझं ठरलेलं उत्तर होतं, "भजीवाला!!" पाहुण्यांना जरा धक्काच बसायचा, "काय?" मग माझे वडील वगैरे काही तरी सांगून मला तिथून हुसकावत. तात्पर्य, पहिला आदर्श भजीवाला, तिथून मग कल्हईवाला, मग पाणी नारिएलवाला-अशा माझ्या महत्वाकांक्षा बदलत होत्या.

असल्या ह्या माझ्यासारख्या अत्यंत माफक महत्वाकांक्षी माणसाच्या मनात मी `गवय्या' व्हावं हे नक्की कधी आलं हे सांगण कठीण आहे. आलं, हे मला नक्की आठवतं. पण महत्वाकांक्षेचा उगम सापडत नाही. बाकी आयुष्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचा उगम सापडणं अवघड आहे. आपल्याला सर्दी नेमकी कुठल्या वेळेपासून झाली हे कुठं सांगता येतं? मला पहिली शिंक काल तीन वाजून दोन मिनिटांनी आली आणि तिथून सर्दी सुरू झाली, असं सांगणारा महाभाग मला तरी भेटला नाही. माझ्यासमोर पडलेल्या नेपोलियनला तरी फ्रान्सचा बादशहा होण्याचं पहिलं स्वप्न कधी पडलं हे सांगता आलं असतं, असं मला नाही वाटत.

पण माझा गवई संकल्प आणि तो भजीवाला याचा काही तरी संबंध असावा. हल्लीचे दिवस हे अंतर्मनाच्या भानगडीतून नाती जुळवण्याचे आहेत. वास्तविक गायन आणि भजी यांचा अजिबात संबंध नाही असं नाही. अनेकांच्या आवाजाचं `भजं' झालेलं आपण ऎकलं असेल किंवा मैफलीत भिकार गवयाला भज्यांचा अहेर केल्याचं ठाऊक असेल आपल्याला! परदेशात अशा वेळी म्हणे नासक्या अंड्यांच्या किंमती वाढतात. भारत अहिंसक असल्यामुळं अंड्यांची हिंसा न मारता अहिंसक शाकाहारी भज्यांचा वापर करतो, हे आपल्या अहिंसक प्रवृत्तीला साजेसंच आहे. दारापुढला तो भजीवाल्याचा आणि माझ्या गवई होण्याचा संबधं आहे म्हणतो तो तसा नव्हे. दारापुढला तो भजीवाला हा माझा आदर्श होता. मोठेपणी मी त्याच्याइतके लांब केस वाढवणार होतो. ओठाच्या एका कोपऱ्यात विडी ठेवणार होतो. आणि भजी तळता तळता त्याच्यासारख्या ताना मारणार होतो. हो, ताना मारणार होतो. कारण तो भजीवाला भज्यांचं पीठ उकळणाऱ्या तेलात मुठीतून फिरवून फिरवून टाकता टाकता जोराजोरात ताना मारायचा. झाऱ्यानं भजी उचलून टोपलीत टाकता `पिया बिन नही आवत चैन...' म्हणायचा. मला वाटतं, गवई होण्याची कल्पना माझ्या डोक्यात प्रथम रुजली ती त्या प्रसंगातुन! पुढं अनेक पाव्हण्यांच्या प्रश्र्नांना `मी भजीवाला होणार' हे माझं उत्तर ऎकून माझ्या तीर्थरुपांनाही काळजी वाटायला लागली असावी आणि त्यांनी घर बदललं!आता आम्ही निराळ्या गल्लीत राहायला गेलो; पण आपण भज्यांच्या आगीतून निघून संगीताच्या फुफाट्यात पडलो याची माझ्या तीर्थरुपांना कल्पनाही नव्हती. आमच्या नव्या घरासमोरच गाण्याचा क्लास होता. बाहेर बोर्ड होता: `तुंबरू संगीत यूनिवर्सिटी! इथं शास्त्रोक्त गायन, सुगम संगीत, सतार, दिलरुबा, व्हायोलिन, हार्मोनियम, सारंगी, फ्लूट, सरोद, विचित्रबीन, गोटुवाद्दम, क्लॅरेओनेट, मृदुंगम आणि घटम शास्त्रीय पद्ध्तीनं शिकवण्यात येईल. संध्याकाळी सहा ते सात शॉर्टहॅंड व टायपिंगही शिकवण्यात येईल.' मला लहानपणी तो बोर्ड पाठ झला होता. एका दहा बाय आठच्या जागेत ही तुंबरू संगीत युनिव्हर्सिटी होती. आणी युनिव्हर्सिटीचे एकमेव प्रोफेसर माष्टर भगवानकुमार सकाळच्या वेळी ती खोली झाडताना मला माझ्या गॅलरीतून दिसायचे. दिसायला तेही माझ्या आदर्श भजीवाल्यासारखेच होते. त्यांचेही केस लांब होते आणि दातांत विडी धरून बोलायची त्यांनाही सवय होती. मग आठ वाजता क्लास सुरू व्हायचा, मी इकडे गणितं सोडवत बसत असे, आणि तिकडून `तुम जागो मोहन प्या~~~रे' सुरू व्हायचं! त्या संगीताशी मी इतका तन्मय होत असे की अनेक वेळा मी गणिताची उत्तरं गमपधनीसा वगैरे लिहून शाळेतल्या माझ्या मास्तर नावाच्या साता जन्मीच्या वैराच्या मार खाल्ला होता. पण ध्येयासाठी हाल सोसावे लागतात हे माझ्या धड्यातलं वाक्य मी पाठ केलेलं होतं. गॅलरीत गणितं सोडवता सोडवता मला `तुम जागो मोहन प्यारे...' `धिट लंगरवा कैसे घर...' . `येरी आली पिया बिन...' वगैरे चिजा पाठ झाल्या होत्या आणि वडील कचेरीला गेले की एकलव्याच्या निष्ठेनं कंठगत केलेल्या त्या चिजा गाऊन मी घर डोक्यावर घेत असे. कुणालाही कल्पना नव्हती की त्या घरात उद्दाचा तानसेन मोठा होतो आहे.

पण एकदा तो दुर्दिन उजाडला. असेच कोणी तरी पाव्हणे आले होते, आणि कुठल्याही पाव्हण्याप्रमाणं त्यांनी प्रश्र्न केला, "बाळ, मोठा झाल्यावर कोण होणार तू?" वडिलांचा खर्रकन उतरलेला चेहरा मला अजूनही आठवतो. माझ्या "भजीवाला होणार" या उत्तराची ते वाट पाहत होते. पण माझी महत्वाकांक्षी बदलल्याची त्यांना दाद नव्हती. मी चटकन सांगितलं, " प्रोफेसर माष्टर भगवानकुमार." पाहुण्यांना काही कळलं नाही. "अच्छा प्रोफेसर होणार!" ते म्हणाले. "कसला प्रोफेसर?" मी चटकन तो बोर्ड म्हणून दाखवला: "येथे शास्त्रोक्त गायन, सुगम संगीत, फिल्मी संगीत, सतार, दिलरुबा, व्हायलिन, हार्मोनियम, सांरगी, फ्लूट, सरोद, विचित्रबीन, गोटुवाद्दम, क्लॅरिअओनेट, मृदुंगम आणि घटम शास्त्रीय पद्धतीनं शिकवण्यात येईल. संध्याकाळी सहा ते सात शॉर्टहॅंड व टाइपरायटिंगही शिकवण्यात येईल."स त्यानंतर वडिलांनी पुन्हा ते घर बदललं. नवीन घर घेताना समोर हॉटेल, गायनशाळा वगैरे काही नाही याची खात्री करून घेतली आणि एका गुरांच्या दवाखान्यापुढं आम्ही राहायला गेलो. गवई होण्याची संधी हुकली, परंतु मनातून ती इच्छा गेली नव्हती.


मी मोठा झाल्यावर गाण्याच्या बैठकींना जाऊ लागलो. मागं दोन तंबोरे, पुढे खॉंसाहेब, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्यांचे साथीदार, ती वाहवा, ते `क्या कहने' हे मैफिलीतल्या रसिकांचे उदगार! मी रात्री घरी परत अस्वस्थ होऊन येत असे. येता येता गवई झाल्याची स्वप्नंदेखील पाहत असे. दारात म्युझिक सर्कल्सच्या सेक्रेटरींची रांग लागली आहे, भगिनी-समाजाच्या कार्यकर्त्या महिला " ते काही नाही. तुमचं गाणं झालंच पाहिजे हं आमच्या क्लबात!" म्हणून लडिवाळपणं माझ्याशी बोलताहेत आणि मी "नाही हो परवा पहा मला जालंधरला प्रोग्राम आहे. मग कलकत्त्याला कॉन्फरन्स आहे. तिथून आफ्रिकेत आमचं कल्चरल डेलिगेशन जाणार, त्यात मी आहे..." अशी मखमली उत्तरं देतो आहे... मग त्या बायका "हे हो काय!" असं म्हणताहेत.... असली स्वप्नं पाहत रात्रीच्या रात्री जागून काढत असे. तशी माझी संगीताची इतर तयारी झाली होती. मी चांगला भक्कम तंबाकू खात होतो. डझनभर `कुडते' शिवून घेतले होते. वाढत्या वयाबरोबर टक्कल पडत गेल्यामुळं लांब केसांचं जमलं नाही म्हणून लांब मिशा वाढवल्या होत्या. बागेश्री, भैरव, भीमपलास ही नावं मी वांगी, बटाटे, कांदे म्हटल्याच्या सहजतेनं घेत असे. मला रागबीग ओळखता येत नव्हते. अशा वेळी कोणी रागाचं नाव विचारलं, की तोंडात तंबाकू असल्याचा बहाणा करून मी हाताच्या खूणेनं रागाचं नाव सांगण्याचा प्रयत्न करत असे. त्याखेरीज आग्रा घराणं, रामपूर घराणं, पतियाळा घराणं, गांधर्व महाविद्दालय, भातखंडे वगैरे नावं पेरत असे. शिवाय फत्तेअलिखांचा मुलगा गुलाम अली, त्याचा भाचा बर्कतुल्ला, त्याचा पुतण्या अब्बासमिया, अब्बासमियांचा नातू फलाणखां, त्याचा भाऊ ठिकाणेखां असल्या वंशावळीही पाठ होत्या. बाकी होतं फक्त `आ' करून गायला सुरवात करणं. पण अशी जय्यत तयारी करून एक दिवस मी एका वस्तादजींच्या घरी गेलो. "वा~या~" वस्तादजींनी माझं स्वागत केलं. मी गाणं शिकण्याची माझी इच्छा व्यक्त केली. "छान छान! आपण यापूर्वी गाणं शिकला आहांत का कुठं?"

"हो! लहानपणी शिकलो आहे." मी एक ठेवून दिली.

"किती वर्ष?"

"चांगला चार-पाच वर्ष शिकलो आहे!"

"म्हणता का काही?"

"हो! काय म्हणू?" जणू काय पाच-पन्नास राग माझ्या गळ्यात उड्या मारताहेत, अशा थाटात मी विचारलं.

"काहीही म्हणा. अरे बेटा उस्मान, तंबोरा काढ."
मग आतून एक पन्नास एक वर्षांचा बेटा उस्मान आला. त्यानं तंबोरे काढलं.

"काय स्वर?"

इथं पंचाईत आली. पण मी काळी चार, काळी पाच वगैरे शब्द ऎकले होते. मी मनात म्हटलं, उगीच चार-पाच नको. ते पुढं लावता येतील. एक-दोनोपासुन सुरूवात होऊ द्दा.

"माझा स्वर काळी दोन!"

"बहोत अच्छा!" उस्माननं तंबोऱ्याच्या खुंट्या पिळल्या. आणि मी प्रोफेसर माष्टर भगवानकुमारांचं नाव घेऊन सुरुवात केली : "लट उलझी सुलझा..."

पुढं काय झालं मला निटसं आठवत नाही. डोक्यात एक हातोडी बसली असावी; कारण माझ्या कपाळावर ती खूण अजून आहे. आणि दुसरी गोष्ट आठवते म्हणजे माझ्या चपलांचा जोड त्या उस्तादजींच्या घरी आहे. त्याखेरीज एकच आठवतं म्हणजे माझा स्वर ऎकल्याबरोबर म्हातारे उस्तादजी ओरडले होते, "बेवकूफ! गाणं म्हणजे काय भजी तळणं वाटलं काय तुला?"

माझ्या गाण्यात भजीवाला, माष्टर प्रो० भगवानकुमार आणि गुरांच्या दवाखान्यातले पेशंट ह्या तिघांचाही समन्वय झाला असावा.

पुन्हा त्या दिशेला गेलो नाही. आता मला तबले, तंबोरे दिसले की घेरी येते. माझ्या त्या `लट उलझी सुलझा' मध्ये अशी काय शक्ती होती, की ज्यामुळं त्या ऎंशी वर्षाच्या उस्तादाचं ऎंशी वर्ष पोटात साठलेलं पित्त खवळून बाहेर आलं, देव जाणे! पण चांगलं हातातोंडाशी आलेलं गाणं गेलं एवढंच! भारतीय संगीताचं संगीताचं दुर्दैव! नाही तर काय, एक तानसेन जन्माला येण्यापूर्वीच मेला!