प्रिय मित्र बाबा आणि आजच्या या मेळाव्याला आलेले मित्रहो !
'प्रिय मित्र बाबा' म्हटल्याबरोवर आपल्यापैकी काही लोकांना कदाचित धक्का बसला असेल। काही लोकांना थोडा उध्दटपणाही वाटला असेल. पण काय कोण जाणे मला अलिकडे आदरणीय वगैरे शब्दांची भीती वाटायला लागली आहे. ज्याला ज्याला म्हणून आदरणीय म्हटलं त्यांनी त्यांनी निराशेशिवाय पदरात काही टाकलं नसल्यामुळे बाबांनाही आदरणीय आणि पूज्य करुन टाकण्याची माझी तरी तयारी नाही. याचा अर्थ, माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी त्यांना आदरणीय म्हटलं ते अंतःकरणापासून म्ह्टलं नाही असं मात्र मी म्हणत नाही.
मित्रहो, आपल्या मेळाव्याचं नावच आहे 'मित्रमेळावा'--- त्यामुळे उपचार, कार्यक्रमाची शिस्त वगैरे गोष्टी, किंवा आलेल्या पाहुण्याचं यथोचित स्वागत या गोष्टी मित्रत्वाच्या भावनेने जेवढ्या साधता येतील तेवढ्याच पाहायच्या आहेत.
बाबांच्या कार्याची दाद कोणी द्यावी? बाबांच्या कार्याची दाद द्यायलासुध्दा रवींद्रनाथांच्या इतका प्रतिभावंत आणि त्याबरोबरच कार्यवंत पाहिजे. रवींद्रनाथांनी नुसतचं शांतिनिकेतन फ़ुलवलेलं नाही. श्रीनिकेतन उभारलं. म्हणजे जिथे जमिनीची आराधना झाली आणि जमीनीची मशागत होऊन हिरवं धान्य ज्या वेळेला वर आलं तेव्हाच चित्र पुरं झालं.
आपण अलिकडे बोलताना म्हणतो पीSSस, पीस. शांती ! देअर इज नो पीस विदाऊट प्रोस्पेरिटी - आणि प्रोस्पेरिटीसाठी श्री लागते. म्हणून ते श्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन एकत्र आलं. आणि हे रवींद्रनाथांनी कशासाठी केलं? जेव्हा ही अशी जमिनीतून येणारी निर्मिती, माणसाच्या हातांनी घडविलेली निर्मिती आणि प्रतिभेतून घडलेली निर्मिती या एकत्र येतात त्याच वेळेला आनंद संभवतो म्हणून इतर वेळेला मजा! तेव्हा मजा आणि आनंद या दोन गोष्टींमधील फ़रक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण मजा खूपच करतो, पण त्या मजेला अर्थ नसतो. त्या मजेला आनंद जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथे निर्मितीचा निराळा साक्षात्कार घडावा लागतो. सौंदर्य हा शब्द आपण वाटेल तसा वापरत असतो. जाहिरातीत तर सगळंच सुंदर असतं. पण देखणं काय असतं? काय खरं तर सुंदर असतं? कवी बोरकरांनी म्हटलं आहे-- 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे'. ज्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागलेले आहेत ते देखणे आहेत आणि इथे अशा हातांनी निर्मिती केलेली आहे की जेथे निर्मितीला आवश्यक असणारी वाटच नियतीने त्यांच्याकडून हिरावून घेतलेली आहे. ज्या वेळेला बोटं नसलेला माणूस त्या नसलेल्या बोटांनी बोटं असलेल्या लोकांना आपल्या निर्मितीने खुणावत असतो किंवा हिणवतही असतो त्या वेळी तिथे देखणेपण असं साक्षात प्रकट होतं आणि रुग्णालयाचं आनंदवन होतं.
सामाजिक कार्य आमच्याकडे लोकांनी केली नाहीत असं मी तरी कशाला म्हणू? अतिशय सुंदर अशा प्रकारची कार्य केली. निरनिराळ्या प्रकारची कार्ये केली. त्या सगळ्यांच्याबद्दल आदर ठेवून मी असं म्हणेन की, विधायक कार्याला सौंदर्याची सतत जोड राहिल्याशिवाय त्यातून खरा आनंद निर्माण होत नसतो. हे कार्य बाबांनी केलं. त्या तोडीचं कार्य या भारताच्या भूमीत कुणीही केलेलं नाव्हतं. असलं जर केलेलं तर मी जरुर सांगेन की, चुकल माझं ! आणि ते चुकलं म्हणण्याचीसुध्दा मला धन्यता वाटेल. पण अशा प्रकारचं जे हे कार्य आहे ते कुणी केलं? एका महाकवीने केलं. कारण बाबांनी सांगितलं आहे, "अवर वर्क-" आणि एक लक्षात घ्या, इथे बाबा अवर वर्क म्हणतात, माय वर्क म्हणत नाहीत. "-अवर वर्क इज अ पोएम इन ऍक्शन." इथं जे कार्य प्रकटलेलं आहे ते कृतीतून प्रकटलेलं अनोखं काव्य आहे-इतर वेळी जे शब्दातुन प्रकट होत असतं ते कृतीतून प्रकटलेलं आहे. बाबा नेहमी म्हणत असतात की, 'प्रभूचे हजार हात'. मी वैयक्तिक मंदिरातला देव मानत नाही. माझं त्याचं काही भांडण नाही. त्यामूळे तो माझ्यावर रागवेल अशी मला भीती नाही. त्याला फ़ारसं रागवता येतं यावरही माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या प्रभूबद्दल मला काही माहिती नाही. परंतु माझ्या दृष्टीने मी प्रभू त्यालाच म्हणेन की ज्याला 'प्रभू' मधला 'भू' जवळचा वाटतो. प्रकर्षाने जो 'भू' जवळ जातो तो प्रभू असंच मला वाटतं. हीच प्रभूची व्याख्या असायला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रभूचे हजार हात तुम्हाला-समोर पाहा-दिसतील. प्रत्येक झाडाची फ़ांदी हा असा स्वर्गाकडे निघालेला हात आहे-प्रकाशाकडे धावत सुटलेला हात आहे. त्याच्यापासून आपल्याला मंत्र घ्यायचे आहेत. तपोवनामध्ये ऋषीमुनी जाऊन बसत असत. झाडांच्यापाशी पुन्हा धावत असत. झाडांपाशी धावणाराचं कामच हे होतं की एका क्षणामध्ये जमिनीच्या आत आत जाण्याचं वेड आणि दुसर्या क्षणामध्ये आकाशाकडे जाण्याची ओढ. म्हणजे तो एखाद्या शेतकऱ्यासारखा जमीनीचा शोध घेत निघालेला आणि दुसऱ्या बाजुने एखाद्या प्रतिभावान कवीसारखा आकाशाकडे झेप घेत असलेला, असं ज्या वेळेला व्यक्तिमत्व दोन्ही बाजूला फ़ुललेलं असतं त्याच वेळेला त्या व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. अलिकडे व्यक्तिमत्त्व हा शब्द आपण कोणाच्याही बाबतीत वापरतो. शब्दांचा म्हणजे आपण नुसता धुमाकूळ चालवला आहे. एक अगदी चिल्लर माणूस-काही तरी सात आठ मासिकांतून गोष्टी छापून आलेल्या-"आमच्या व्यक्तिमत्वाला इ.इ." म्हणताना ऐकुन मी म्हटलं, अरे, हे उंदराने स्वतःला ऐरावत म्हणण्यासार्खे आहे. पण व्यक्तिमत्व केव्हा येतं? की ज्याच्या आचरणातून, उच्चारातून, कृतीतून आपल्याला पदोपदी जाणवत असतं की, ज्याचे पाय आत आत जमीनीचा शोध घेत घेतही चाललेले आहेत आणि क्षणाक्षणाला हजार रीतीने फ़ुलणाऱ्या झाडासारखे प्रकाशाचा शोधही चालू ठेवीत आहेत! जमीनीतले रस ओढून घेत, वारा, वादळ, पाऊस अंगावर घेत घेत फ़ुलणारं ते व्यक्तिमत्त्व. मला तरी असं वाटतं की, भारतात ज्या व्यक्तिमत्त्वाचा पाच अक्षरात उल्लेख करता येईल ती म्हणजे बाबा आमटे ही अक्षरे!
मी आनंदवनात आल्यावर मला जर सगळ्यात वृक्ष कोणता आवडत असेल तर बाबा नावाचा वृक्ष. हा मला सगळ्यामध्ये जास्त आवडतो. त्या वृक्षाकडून मला फ़लप्राप्ती होते. सुगंध मिळतो. त्या वृक्षाकडून मला सावली मिळते. असा काही मी ऊन्हाने फ़ार तळपत असतो, म्हणून सावलीचा शोध घेतो, असं नाही. परंतु आम्हाला खरी सावली म्हणजे काय हेच कळलेलं नसतं. इथे आल्यानंतर कळतं-अरेच्या, सावली म्हणजे अशी की, जी वरच्यावर प्रकाशाच्या किरणांशी खेळ खेळत बसलेल्या आपल्या पानांच्या रुपाने आणि खाली आपल्याला वर जरा मधून मधून बघत जा म्हणून सुध्दा सांगत बसलेली आहे अशी. नाही तर काय हो, आम्ही पटकन 'सावली' निर्माण करु शकतो. त्याला स्वतःचा बंगला म्हणतो. ही सावली नव्हे. ते बंगल्याचं असतं-'सावली'! तेव्हा ती सावली नव्हे! ही सावली अशी की जी क्षणाक्षणाला वर जात असते आणि क्षणाक्षणाला ती सावली आपल्याला प्रकाशाचा झोत कुठल्यादिशेने चालला आहे ह्याची जाणीव करुन देत असते. चार भिंतीच्या घरामध्ये बसलेल्या सावलीमध्ये ही जाणीवच नष्ट झालेली असते. ती फ़िरती सावली जिथे भेटते तिथे ती खरी सावली! ती इथे लाभते. मी अनेक वर्षे इथे येतो आहे. बाबांचा माझा परिचय झाल्याला आता पंधरा वर्षे होऊन गेलेली आहेत. दरवेळेला वाटतं की आता झालं! संपलं! अहो, कुठलं संपलं! पलिकडल्या डोंगराची शिखरं बाबा दाखवायला लागतात. एक शिखर गेल्यावर वाटतं, आली बरं का कांचनगंगा... कुठली येते? ती आणखी पुढे आहे...त्याच्यावर आणखी एक शिखर असतं. बाबांच्या बरोबर प्रवास करतांना-म्हणजे विचारविनिमयाचा प्रवास करतांना, त्यांचे विचार ऐकतांना-लक्षात येतं की, यांना शेकडो हिमशिखरं आपली सादच देत राहीली आहेत. ती संपायलाच तयार नाहीत.
... अपूर्ण
(आनंदवन मित्रमेळावा, फेब्रुवारी १९७९: पु.लं.नी केलेल्या भाषणातील काही भाग)