नामंजूर ! - संदिप खरे..... Namanjur. Namanjoor...Sandip Khare

जपत किनारा शीड सोडणे – नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे – नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे – नामंजूर!मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे – नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे – नामंजूर!

रुसवे – फ़ुगवे… भांडणतंटे… लाख कळा
आपला – तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे – नामंजूर!

नीती, तत्वे… फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे – नामंजूर!