रवींद्रनाथ आणि मी - पु ल देशपांडे Ravindranath Tagore by Pu La Deshpande


आपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर सार्‍या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी तीन व्याख्याने पुणे विद्यापीठाच्या टागोर व्याख्यानमालेत दिली होती. त्यातील एका व्याख्यानाचा हा संपादित अंश.


रवींद्रनाथांचं साहित्य वाचणं, त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अर्थ समजून घेणं हा माझा छंद आहे. जानपदापासून ते विबुधजनांपर्यंत सर्व थरांवर रवींद्रनाथांनी एक अलौकिक विश्वास संपादन केला होता. त्यांचा एकदा संग जडला की, त्यांची संगत सतत हवीहवीशी वाटते. बंगाली माणसाला तर त्यांच्या बाबतीत ‘तू माझा सांगाती’ म्हणावं असंच वाटतं. एखाद्या वातावरणात सुगंध दरवळून राहावा तसे ते बंगाली जीवनात भरून राहिलेले आहेत. आजच्या सर्व नामवंत बंगाली साहित्यिक, संगीतप्रेमी, चित्रकार यांच्यावर त्यांचे खोल संस्कार आहेत. आपल्याला जे काही म्हणायचंय ते परिणामकारक शब्दांत सांगायचं झालं की त्यांच्या लेखणीतून नकळत रवींद्रनाथांचा सूर उमटतो. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतका एकरूप झालेला असतो की, तो रवींद्रनाथांचा आहे. याचं त्यांना भानही राहात नाही. इंग्रजी भाषेत जसा शेक्सपियर कधी उमटून जातो ते कळतही नाही तशीच बंगाली साहित्यात रवींद्रांची उपस्थिती आहे. आपण जसे बोलता बोलता संतवाणीचा नकळत आश्रय घेतो तसेच बंगाली लोक रवींद्रनाथांचे बोट धरतात. माझं आजचं भाषण म्हणजे रवींद्रांच्या बोटाला धरून त्यांच्या दुनियेत केलेल्या प्रवासाच्या कथेसारखं आहे. प्रवासात आपण बागाही पाहतो आणि बाजारही पाहतो. देऊळ पाहतो आणि एखादा प्रचंड कारखानाही पाहतो. त्या पाहण्यातून मनावर उमटलेल्या निरनिराळ्या चित्रांविषयी बोलत असतो. तसंच रवींद्रनाथांचं मला जे निरनिराळं दर्शन घडलं त्यासंबंधी मी बोलणार आहे. त्यामुळे विषयांतर हाच आजच्या माझ्या बोलण्याचा स्थायीभाव असण्याची अधिक शक्यता आहे. ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. खुद्द रवींद्रनाथांना म्हणे कोणीतरी प्रश्न विचारला होता- ‘‘तुमच्यातला एकत्र नांदणारा गुण आणि दोष कोणता?’ त्यांनी उत्तर दिलं होतं Inconsistency- असंबद्धता.’

रवींद्रनाथांनी इतक्या क्षेत्रात ही दौलत आपल्यासाठी ठेवली आहे की, काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. ती काही केवळ बंगाली लोकांसाठीच नाही. भाषांतरातूनही ती आपल्याला मिळू शकते. कुठल्यातरी एखाद्या भाषेतल्या शब्दांची शरीरं घेऊनच साहित्यातल्या सौंदर्याला आणि विचारांना यावं लागतं. भाषांतरात त्या भाषेचा प्रत्यक्ष स्पर्श जातो. भाषांतरातून मूळ कवितेचा आस्वाद घेणं हे हातमोजे घालून प्रेयसीच्या गालावरून हात फिरवण्यासारखं आहे, असं म्हटलं आहे तेही खोटं नाही. पण तरीही शब्दांच्या पलीकडलं रहस्य गवसतच नाही असं म्हणता येत नाही.

रवींद्रनाथांची ओढ कुठल्याक्षणी कोणाला आणि कशी लागेल हे सांगणं कठीण आह. ती केवळ साहित्यकलेच्या नित्य उपासकापुरतीच मर्यादित नाही. या माणसाने जिथे जिथे म्हणून स्पर्श केला तिथे तिथे आपला शिक्का उमटवला. चाळिशी उलटल्यानंतर चित्र काढायला सुरुवात केली तर दोन अडीच हजार कॅन्व्हासेस रंगवले. पॅरिसचे चित्रकला- समीक्षक थक्क झाले. सुमारे दोन ते अडीच हजार गाणीच लिहिली नाहीत तर त्यांना चाली दिल्या. त्यामुळे कुठल्या क्षेत्रातल्या माणसाला रवींद्रनाथांना हाक मारावी असं कुठल्या क्षणी वाटेल ते सांगता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर महात्मा गांधींचं देता येईल. गांधीजींची काही कवितेचा आस्वाद घेणारे रसिक म्हणून ख्याती नाही. उलट अनेकांना ते अरसिक वाटतात. ते तितकंसं बरोबर नाही. काही विशिष्ट ध्येयांनी प्रेरित झालेल्या महाभागांना जीवनातले अग्रक्रम ठरवावे लागतात. गांधीजींनी असे काही अग्रक्रम ठरवून इतर दोर कापून टाकले होते असं म्हणायला हावं. तरीदेखील जीवनातल्या एका उत्कट प्रसंगी गांधीजींना रवींद्रनाथांच्या कवितेची आठवण होते हे पाहिल्यावर रवींद्रनाथांच्याच नव्हे तर काव्यकलेच्या सामर्थ्यांची एका निराळ्या रीतीने प्रचिती येते. ज्ञानेश्वरांनी ‘जे चला कल्पतरूंचे आरव’ असं म्हटलं आहे- चालत्या कल्पवृक्षांचे बाग म्हटलं आहे. रवींद्रनाथांनी आपल्या प्रतिभेने उभ्या केलेल्या या कल्पवृक्षांच्या बागेतलं वैभव आता सर्वाचं आहे. फक्त त्या बगीच्यात हिंडायची ओढ मनाला लागायला हवी. थोर साहित्यकृतींकडे, कण्वाच्या आश्रमात जाताना दुष्यन्त म्हणाला होता तसं विनीत वेषाने नसलं तरी विनम्र होऊनच जायला हवं. रवींद्रांच्या सृष्टीत शिरल्यावर, त्यांनी जीवनात ज्या ज्या पार्थिव आणि अपार्थिवाला स्पर्श केला तो एका महाकवीचा स्पर्श होता हे ध्यानात आल्याशिवाय राहात नाही. मी हे केवळ भाविकतेनं बोलतो आहे असं कृपा करून समजू नका. अलौकिक प्रतिभेच्या स्पर्शानी एखाद्या दगडाची जेव्हा घारापुरीच्या लेण्यात प्रचंड त्रिमूर्ती झालेली दिसते किंवा कोणार्कच्या सूर्य मंदिरात, अशाच दगडातून टीचभर उंचीची नर्तकी साऱ्या शंृगाररसाचा अर्कबिंदू होऊन आपल्याला आव्हान देते त्या वेळी आपण प्रथम विनम्रच होतो. शब्दसृष्टीच्या ईश्वरांना वंदन करावं असं समर्थानासुद्धा वाटतं ते उगाच नाही. पण ज्याच्या सृष्टीत हे ‘ऐश्वर्य’ लाभतं असा कविश्वर मात्र शतकाशतकातून एखादाच येतो. एरवी ‘कविता गवताऐसी उदंड वाढली’ असं त्या समर्थाना म्हणावंसं वाटायला लावणारे कवी असतातच.

रवींद्रनाथांची शब्दसृष्टी आपल्याला वेळोवेळी या ऐश्वर्याची साक्ष पटवीत असते. त्यांच्या अभिव्यक्तीचं त्यांचं सर्वात आवडतं माध्यम म्हणजे कविता. ते प्रथम कवी होते, नंतर इतर सर्व. अर्थात त्या इतर सर्वातही त्यांच श्रेष्ठत्व त्यांनी सिद्ध केलेलंच आहे. शरदबाबूंसारख्या कादंबरीकाराने ‘गोरा’ कादंबरीबद्दल म्हटलंय की ‘‘ती मी साठ पासष्ठ वेळा वाचली आहे. मी लोकांसाठी लिहिणारा कादंबरीकार असलो तरी रवींद्रनाथ हे माझ्यासाठी लिहिणारे कादंबरीकार आहेत.’’ हे जरी खरं असलं तरी त्यांचा जीव जडलाय तो कवितेशीच. आपल्या आणि कवितेच्या नात्यासंबंधी रवींद्रांनी आपल्या पुतणीला एक सुंदर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे- ‘कविता माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या वयाचा होतो तेव्हाच माझा तिच्याशी वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मोलकरणींच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी, हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करीत असे. त्या वेळची माझ्या मनाची धुसर पण अपूर्व अशी अवस्था समजावून सांगणं अवघड आहे. एक मात्र मी नक्की सांगू शकेन- की त्या काळी कवितेबरोबरच माझं शुभमंगल झालं होतं. पण या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊन दे पण मोठंसं भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार, पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते पण कधी कधी तिच्या त्या घट्ट मिठीतून हृद्पिंडातलं रक्त बाहेर काढते. एकदा तिनी एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्थ बसेन म्हणायची सोय नाही. तरीसुद्धा माझं खरं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ‘साधने’त लिहितो. जमीनदारीही सांभाळतो. पण ज्या क्षणी कविता लिहायला लागतो त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. हे माझं स्थान मी चांगले ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं, आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधी खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे एकच आश्रयस्थान. रवींद्रनाथांच्या कवितेच्या बाबतीत आणखी एक घटक आहे, तो म्हणजे संगीतातला सूर. काही अपवाद सोडले तर कविता गद्यात वाचणं त्यांना रुचतच नव्हतं. आपल्याकडे ‘गीत’ हा शब्द काहीशा तुच्छतेनेचे कवितेच्या संदर्भात वापरायची फॅशन आहे. रवींद्रांनी आपल्या कवितांचा उल्लेख ‘गीत’ असाच केलेला आहे. ज्या त्यांच्या संग्रहाला नोबेल पारितोषिक मिळाले ती ‘गीतांजली’ आहे. मला पुष्कळदा वाटतं की सुरांशी नातं तुटलेली कविता ही इंग्रजांमुळे आपल्या देशात आली. एरवी आम्ही आमचे वैचारिक तत्त्वज्ञानपर श्लोक आणि ओव्यासुद्धा सुरात बुडवून स्वीकारले. इंग्रजी कविता ही अशी नैसर्गिक रीतीने सुरातून आमच्या मनात झिरपली नाही. याचा अर्थ अंग्रजी कवितेला ताल छंद नाही, असा नव्हे. आम्ही ती कविता प्रथम मनातल्या भाषांतर विभागात टाकून शब्दार्थाना महत्त्व देत समजून घेतली. वैचारिक साहित्याचा स्वीकार आणि कवितेचा स्वीकार हा एकाच पद्धतीने होत नसतो. कविता गायला किंवा ओव्या गायला आमच्या देशातल्या लोकांना काही गायन क्लासात जाऊन शिकावं लागत नव्हतं. सुरांचं हे सामथ्र्य रवींद्रनाथांइतकं आधुनिक काळातल्या इतर फारशा कवींनी ओळखलेलं दिसत नाही. पण संतांसारखं त्यांनी सुरांना केवळ भक्तिरसातच स्थान आहे, असं मानलं नाही. रवींद्रनाथांना संगीत हे सर्वव्यापी वाटत होतं. जीवनातले सुख- दु:खाचे, हर्षशोकाचे सारे अनुभव प्रकट करताना शब्दांनी सुरांची साथ सोडणं हे त्यांच्या प्रकृतीला मानवण्यासारखंच नव्हतं. क्रियापदाहूनही अधिक वेळा आलेले आहेत. त्यांच्या तोंडून त्यांच्या गीताचं गायन ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांनी तर त्या अनुभवाचं वर्णन करताना आपली सारी शब्दशक्ती पणाला लावलेली आहे. तद्रूपतेच्या क्षणी प्रथम त्यांच्या मनात सूर जागायचा. त्यांची ‘रांगिये दिये जाव’ अशी एक कविता आहे. जाव, जाव, जाव गो एबार, जाबार आगे रांगिये दिये जाव- जा जा पण जाण्यापूर्वी मला एकदा संपूर्ण रंगवून जा – मला जागवून जा. असा अर्थ आहे. रसिकत्वी परतत्वस्पर्श म्हणजे काय ते कळायला रवींद्रनाथांचं जीवन, त्यांची कार्यक्षेत्रं, त्यांची ध्यानक्षेत्रं, त्यांची कलानिर्मितीची क्षेत्रं यातून आपल्या सर्वाच्याच असलेल्या ‘मी’ला आपण यात्रा घडवली पाहिजे. त्या यात्रेचं पुण्य एकाच वरदानाने आपल्या पदरात पडण्याची शक्यता आहे. ते म्हणजे चित्ताला भयशून्यता लाभणे आणि चित्त भयशून्य झाल्याखेरीज ‘आनंद’ या शब्दाचा अनुभवातून येणारा अर्थ आपल्याला कळणार नाही. उपनिषत्कालीन ऋषींची ‘अमृताच्या पुत्रांनो’ ही हाक आणि ‘पितानोऽहसि’ ही प्रार्थना रवींद्रांच्या फार आवडीची. पारतंत्र्याच्या काळात सारा धीर गमावून बसलेल्या देशबांधनांना त्यांनी ‘अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात’ हेच नाना प्रकारांनी पटवण्याचं कार्य केलं आणि हे सारं त्यांच्या जोडीने गात गात केलं. पंचविशीतल्या रवींद्रनाथांनी ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही कविता लिहिली होती. नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणाचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो. मग कडय़ावरून उडय़ा टाकीत, अभेद्य खडक फोडीत सारं जीवन एका नव्या चैतन्याने कसं फुलवून टाकतो हे या कवितेत सांगितलं आहे. असंख्य सत्कर्मामध्ये झोकून दिलेलं रवींद्रनाथांचं जीवन आणि निर्मिती पाहिली की, त्यांच्या कवितेतला निर्झरच रवींद्रनाथांचं रूप धारण करून आपल्यात आला होता असं वाटतं. शांतिनिकेतन जर रवींद्रनाथांची tangible poem असेल तर निर्झरेर स्वप्नभंग म्हणजे intangible Rabindranath असंच म्हणायला हवं. ही कविता मूळ बंगालीतूनच अनुभवली पाहिजे. मी त्या कवितेचं मराठी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आपल्याला अंधुक कल्पना यावी म्हणून-

आज पहाटे रविकर आला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला
प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला आणि जाहला अंधाऱ्या ह्य़ा
गव्हरात मज स्पर्श आज त्या
पहाट पक्ष्याच्या गीताचा
इतुक्या दिवसामागुनि माझा प्राण कसा मज
नकळे ऐसा जागुनि उठला.
जागुनि उठला प्राण
अरे अन् उसळुन आले नीर
प्राण वासना रोधु न शकली
मत्प्राणांचा धीर।
थरथर थरथर कंपित भूधर
शिलाखंड कोसळून पडले
फुलून फुलून मग फेस उसळला
गर्जत जल संतापुनि उठले
इथे तिथे मग वेडय़ापरि जल
मत्त भिंगऱ्या मारीत सुटले
शोधू लागले- तरी न दिसले
बंदिगृहाचे दार कोठले
सांग विधात्या पाषाणांच्या
कशास येथे राशी पडल्या
चहू दिशांना कशास त्यांच्या
उंच उंच ह्य़ा भिंती घडल्या?
हृदय आता
सर्व बंधने । तोड तोड ही
प्राणांची साधना करोनी
मने जोड ही ।।
लाटेवरती उचलुनि लाटा
आघातावर कर आघाता
मत्त होउनी प्राण जागला
कुठला तम अन् फत्तर कुठला
उसळुनि उठता सर्व वासना
जगती कोणाचे ही भय ना ।।
करुणाधारा आता ढाळिन
पाषाणांच्या कारा फोडिन
बुडवुनि सारे जग हे टाकिन
चहू दिशांना भटकत भटकत
पिशापरी मी गाइन गाणी
केस पिंजुनी- फुले उधळुनी
इंद्रधनूने रंगवलेले
पंख पसरुनी
रविकिरणातून हासू फुलवित
टाकिन पंचप्राण उधळुनी
या शिखरातून त्या शिखरातून
देईन झोकून
ह्य़ा खडकातून त्या खडकातून
घेइन लोळण,
हसेन खळखळ गाइन कलकल
धरुनि ताल मग टाळी देऊन
माझ्यापाशी कथा कितीतरी
गाणी कितीतरी
प्राणांची अन् शक्ती कितीतरी
सुखे किती अन् अनंत ऊर्मी
मम जीवाची कोण उभारी
काय आज मज झाले न कळे,
कानी माझ्या महार्णवाचे
गाणे आले
चहू दिशांना कसले हे कारागृह दिसते
फोड फोड रे कारा ती तव वज्राघाते
पहाट पक्षी कसले गाणे गाऊ लागला
कुठला रविकर आज असा मज स्पर्शुन गेला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला

‘आमार जीबोन आमार बानी’ या रवींद्रनाथांच्या उक्तीची सत्यता पटवणारी ही कविता आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया यातला साचभाव आणि वर्तन या दोन्हींची अनुभूती लाभून आपल्यातला सतत मलिन आणि दुबळा होणारा ‘मी’ सबळ आणि निर्मळ होतो. आपल्यातल्या त्या ‘मी’ ची मरगळ घालवायला रवींद्रनाथांकडे काहीही मागायला जावे. अशी मागणाऱ्यांची भूमिका घेऊन मी त्यांच्यापाशी जेव्हा जातो तेव्हा माझ्या झोळीत जे पडले त्याबद्दल मी आपल्याशी बोललो. रवींद्रनाथ आणि मी असं ज्या वेळी मी म्हणतो त्या वेळी एक उदार दाता आणि सदा अतृप्त याचक हेचं आमचं नातं असतं.

(‘रवींद्रनाथ : तीन व्याख्याने’ या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकातून साभार.)
सौजन्य – लोकसत्ता
९ मे २०१०