संगीत शिक्षणाबाबत सूचना Sangit Shikshanababat Suchana

‘मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त म. वा. देसाई यांना पुलंनी पाठवलेले हे टंकलिखित पत्र. त्या पत्रावर तारीख आहे- ६ एप्रिल १९७४. पंडित रतिलाल भावसार यांच्याशी माझा घरोबा असल्यामुळे त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिले. ते प्रसिद्ध होण्यासाठी मी प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तो योग आला नाही. मग हे पत्र मी जब्बार पटेलांकडे दिले. त्यांनी सुचवल्यावरून मी हे पत्र आता ‘लोकसत्ता’ला देत आहे.’
- नारायण लाळे, डोंबिवली.

..तर असे हे बऱ्याच वर्षांनंतर प्रसिद्धीचे भाग्य लाभत असलेले पत्र. टंकलिखित १० फुलस्केप कागदांवरच्या या पत्राचा संपादित भाग आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.


सप्रेम नमस्कार,

मुंबई महापालिकेने प्राथमिक शाळांच्या संगीत शिक्षणाच्या बाबतीत पुनर्विचार करून नवीन पद्धत स्वीकारण्याचे ठरवले आहे व त्या अनुरोधाने काही पावले टाकलेली आहेत, हे समजल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. संगीत शिक्षणाबाबत बदलत्या काळानुसार नवीन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. संगीताचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावरती त्याच्या वयाच्या प्राथमिक अवस्थेत योग्य रीतीने झाल्याशिवाय संगीताचे योग्य शिक्षण व्यवस्थित होत नाही. दुर्दैवाने आज अनुभव असा येतो की, संगीत शिक्षणाचा पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमधून गायन-वादन करणारे कलावंत तयार झालेले आढळत नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांची संगीतातील समजही फारशी वाढलेली दिसत नाही. इंग्रजी किंवा मराठी घेऊन बी.ए. झालेले विद्यार्थी पुढील आयुष्यात डोळसपणे साहित्याचा आस्वाद घेताना जसे क्वचितच आढळून येतात, तसेच संगीत शिक्षणातील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी गाण्याच्या क्षेत्रांतून दूर गेलेले आढळतात.

महानगरपालिकेने हे कार्य अंगिकारल्यावर संगीत क्षेत्रामध्ये वैयक्तिकरीतीने उत्तम कलावंत करणे यापेक्षाही सर्वसामान्य स्तरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड कशी तयार करता यावी याचा विचार करता येणे आवश्यक आहे. आज संगीत, चित्रकला, नृत्य, साहित्य याचा विचार शिक्षणाच्या अंगाने करणे आवश्यक आहे. शिक्षणामध्ये सांस्कृतिक शिक्षण हे गौण अंग नसून ती एक व्यक्तिमत्त्व फुलवणारी आवश्यक बाब आहे, असे मानायला हवे. इतर शिक्षणाच्या बाबतीत जसे काही कारणामुळे ते परीक्षार्थी शिक्षण झाले, तसे संगीत शिक्षण होऊ नये, याची काळजी नव्या शिक्षणपद्धतीत घेतली पाहिजे.

या दृष्टीने मी काही सूचना आपल्या विचारांसाठी पुढे ठेवत आहे-  आतापर्यंत संगीत शिक्षणाच्या संस्थांमध्ये ज्या पद्धतीचा अवलंब करण्यात येतोय, त्यात मंजूर केलेल्या पाठय़पुस्तकांचाच आधार महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे संगीत हा इतिहास किंवा भूगोल याप्रमाणे एक पाठ करण्याचा विषय म्हणून गणला गेला आहे. पाठय़पुस्तकामध्ये दिलेले गाणे हे फक्त संगीत-वर्गात गावयाचे आहे, असे समजले जाते. त्या गाण्याचा आपल्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी उपयोग होऊ शकेल, याची कल्पना शिकणाऱ्याला व शिकवणाऱ्याला असलेली मला दिसत नाही. उदाहरणार्थ, भूप राग म्हणजे म आणि नि वज्र्य असलेले काहीतरी प्रकरण असाच त्याचा अर्थ लावण्यात येतो. परंतु गायन-वादनातून भूप रागाच्या व्यक्तिमत्त्वाशी किंवा आनंद देणाऱ्या सामर्थ्यांशी संबंध लावलेला दिसून येत नाही. यासाठी आपल्या शिक्षणातील पहिला उपाय म्हणून प्राथमिक शाळेच्या सहाव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांचा व संगीत शिक्षणातील पाठय़पुस्तकांचा मुळीच सबंध आणू न देणे फार महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. गाण्याच्या वर्गात आपण आनंदाने गाणे म्हणण्यासाठी जात आहोत, असे विद्यार्थ्यांच्या मनात ठसवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. यासाठी गायन शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘निर्भय’ असा शब्द मी मुद्दाम वापरीत आहे. परीक्षेच्या भितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणारी भीती मनातून काढून टाकल्याशिवाय आपला हेतू साध्य होणार नाही. आपण गाणे ‘शिकायला’ जात नसून गाणे म्हणायला जात आहोत, चांगली गाणी ऐकायला जात आहोत, ही भावना विद्यार्थ्यांच्यात निर्माण झाली पाहिजे.

लहान मुलांची आवड, त्यांच्या श्वासांचे सामथ्र्य, उच्चारांची सुलभता, शब्दांतील नाद अशांसारखे घटक लक्षात घेऊन त्या त्या वयाच्या मुलांना योग्य अशा प्रकारची गाणी रचून ती गाणी म्हणायला लावणे, हेच पहिल्या चार वर्षांमध्ये करावयाचे कार्य आहे. सुदैवाने मुंबईमध्ये निरनिराळ्या भाषा बोलणारी माणसे रहात असल्यामुळे लहान मुलांना योग्य अशा प्रकारची अनेक गाणी येऊ शकतील.

पहिल्या चार वर्षांमध्ये आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना वर्षांला कमीत कमी १०  गाणी, याप्रमाणे ४०-५० गाणी चार वर्षांत सांघिकरीत्या आणि त्यातील ज्या मुलांना संगीतातील नैसर्गिक देणगी लाभली आहे त्यांना वैयक्तिकरीत्या आपल्या आनंदासाठी गाता येतील, हा हेतू आपण ठेवला पाहिजे. मुले एकत्र आली असता सहजच म्हणून जर एखाद्या मुलाने एखाद्या गाण्याचा चरण म्हणायला सुरुवात केली, तर बाकीच्या मुलांना सहजरीत्या त्या गाण्यामध्ये सहभागी होता आले पाहिजे. या क्रियेला मी फार महत्त्व देतो, ते केवळ संगीताच्या दृष्टीने नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनेही. म्हणूनच अशी गाणी निवडताना भाषा हा मुद्दा महत्त्वाचा न मानता आनंदाने गाण्याची शक्ती हा महत्त्वाचा मुद्दा मानला पाहिजे. काही गाणी अशी निवडावीत की सर्व भाषांतील मुलांना गावीशी वाटतील. पहिल्या तीन इयत्तांपर्यंत सांघिकरीत्या म्हणावयाची गाणी सोपी असावीत. फक्त चौथीत जी मुले पहिल्या तीन वर्षांच्या अनुभवाने अधिक चांगली गाणी म्हणू शकतील, त्या मुलांची नोंद घेऊन त्यांची गाण्याची आवड वाढविण्याचा प्रयत्न करावा. या मुलांची नावे महापालिकेने स्थापन केलेल्या अकादमीकडे पाठवावीत. म्हणजे काही विशिष्ट कार्यक्रमांसाठी या मुलांचा उपयोग होईल.

एकदा अशा प्रकारे ३०-३० गाणी मुलांना गाता येऊ लागल्यानंतर चांगल्या संगीताची अभिरुची निर्माण करण्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मला वाटते- आज चित्रपट व रेडिओद्वारे नाना तऱ्हेच्या संगीताचे संस्कार मुलांच्या मनावर होत असतात. त्यातून काही गाणी निवडून त्यांच्या ध्वनिमुद्रिका मुलांना ऐकविण्यास हरकत नाही. त्याचबरोबर वाद्यांच्या सुरांचा त्यांना परिचय देण्याच्या दृष्टीने चांगल्या वादकांच्या ध्वनिमुद्रिका वर्गात ऐकवीत असताना ती वाद्ये वर्गात ऐकून त्या वाद्यांची रचना कशी असते तेही विद्यार्थ्यांना दाखवावे. ती वाद्ये वाजविणाऱ्या कलावंतांना संगीताच्या वर्गात बोलवावे. तो असमान्य कलाकार असलाच पाहिजे, असे नव्हे. मुंबईतील १००-१५० वादकांची नोंद अकादमीने करावी आणि त्या वादकांना निरनिराळ्या शाळांतून डेमॉन्स्ट्रेशनसाठी बोलवावे. मुंबई शहरात लाखो विद्यार्थी असे असतील की त्यांनी आयुष्यात सतार पाहिली नसेल किंवा गाण्याच्या बैठकीलाही कोणी गेले नसतील. यासाठी अर्धा-पाऊण तासासाठी चिमुकली बैठक हा या शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळांतून होणे आवश्यक आहे. बैठकीची शिस्त ही चुकूनही दरडावणीच्या स्वरामध्ये देता कामा नये. या बैठकीत विद्यार्थ्यांला, वादकाला प्रश्न विचारण्याची मुभा ठेवावी.

संगीत शिक्षणाचा मुख्य हेतू, संगीत हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक भाग करणे- हा आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांच्यामध्ये कलावंत होण्याचा सुप्त गुण दडलेला असेल तो फुलविणे, त्यास वाव देणे हाही आहे. संगीत शिक्षणाच्या बाबतीत निरनिराळ्या पद्धतींतून तयार झालेले शिक्षक आपल्याकडे असल्यामुळे हा नवीन विचार त्यांच्या मनावर ठसवणे आवश्यक आहे. आपल्याला शिक्षकांचे सहकार्य घेऊनच हे कार्य करावयाचे आहे. महापालिकेतील २२५ शिक्षकांतून संगीत शिक्षणातील अडचणींपेक्षा संगीत शिक्षणातील आधुनिक विचार मागवावेत. येथे करणात्मक (पॉझिटिव्ह) दृष्टिकोन आवश्यक आहे. संगीत शिक्षकांच्या बैठका नित्यनियमाने अकादमीत होतील, अशी व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी अकादमीने तीन महिन्यांतून कमीत कमी सहा वेळा अशा बैठका आयोजित केल्या पाहिजेत. दर तीन महिन्यांचा कार्यक्रम आधीच निश्चित करून तो शिक्षकांना दिला पाहिजे. शिक्षकांचे अकादमीशी अगदीच जवळचे साहचर्य असणे आवश्यक आहे. संगीत क्षेत्रामध्ये नवे विचार करणाऱ्या माणसांच्या भेटी या बैठकीत घडवून आणता येतील. संगीत शिक्षक ही एक सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणारी व्यक्ती आहे, हे त्या शिक्षकांच्या मनावर ठसविणे फार महत्त्वाचे आहे. आज दुर्दैवाने संगीत शिक्षक हे फार उपेक्षित राहिले आहेत, ही परिस्थिती बदलली पाहिजे.

वर्षांतून एकदा संगीत शिक्षकांनी तयार करून घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तयारीचे दर्शन मुंबईतील नागरिकांना होणे फार आवश्यक आहे. मान्यवर अशा पाहुण्यांच्या मुंबईला भेटी होत असतात. अशा प्रसंगी १०-१५ मिनिटांचा उत्तम कार्यक्रम महापालिकेच्या विद्यार्थ्यांतर्फे सादर करण्यात यावा. यासाठी शिक्षकांनी गुणी विद्यार्थ्यांचा एक वृंद तयार करणे आवश्यक आहे. या वृंदाचा दर्जा अतिशय चांगला असावा. याबाबतीत श्री. वसंत देसाई, श्री. सुधीर फडके यांसारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेता येईल.

सर्व प्राथमिक शाळांतील शाळेचे वर्ग सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे आधी सौम्य ध्वनिमुद्रित वाद्य संगीत लावण्याची व्यवस्था व्हावी. विद्यार्थी शाळेत शिरताना त्याच्या कानी हे संगीत पडले पाहिजे. ज्या ठिकाणी सौम्य व सुंदर अशा स्वरांनी स्वागत होते, त्या इमारतीबद्दलची भीती मुलांच्या मनातून नाहीशी होईल. संगीत शिक्षण हे आनंदनिर्मितीचा एक भाग आहे, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात तयार होईल.

संगीत शिक्षणात आपल्या मुलाने किती तयारी केली आहे, हे पाहण्यासाठी पालकांना शाळेतील संगीत कार्यक्रमांचे आमंत्रण न चुकता पाठवावे. शाळेत होणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगांच्या वेळी मुलांच्या वृंदाचे कार्यक्रम ठेवावेत. पालकांना निमंत्रण पाठविण्याचा उद्देश असा की, संगीत शिक्षणामुळे मुलांचे इतर विषयांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची भीती पालकांच्या मनातून दूर होईल. मुलांना गाण्याची गोडी निर्माण झाल्यामुळे इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे मन अधिक ताजेतवाने होईल. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कसोटी फक्त पास-नापास यावर न ठरवता, इतर विषयातील म्हणजे संगीत, चित्रकला, शारीरिक शिक्षण यामधीलही मुलांची प्रगती लक्षात घ्यावी. शाळा आणि पालक यांचा अधिक स्नेह जमवण्याच्या दृष्टीनेही संगीत हे महत्त्वाचे अंग आहे.

संगीत शिक्षकांचाही एक वृंद तयार करण्यात यावा. निरनिराळ्या समारंभाच्यावेळी पोलिसांचा बँड बोलाविण्यात येतो. त्याचप्रमाणे शिक्षकांचाही वृंद बोलाविण्यात यावा. या वृंदात भाग घेणाऱ्या शिक्षकांना अधिक वेतन देण्यास काही हरकत नाही. मात्र या वृंदाचा दर्जा अतिशय उच्च असावा.

माध्यमिक शाळातील संगीत शिक्षणाबाबत मला काही सूचना करावयाच्या आहेत. माध्यमिक शाळांत सध्या चालू असलेला संगीत अभ्यासक्रम अत्यंत नीरस असा आहे. एकदम नोटेशन पद्धतीने गाणे शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मनावर रागाचे संस्कार घडले आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एखादा राग गाऊन व वाजवून दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे. भाराभार राग, ताल याच्यावर भर न देता दोन वर्षांत फक्त ४-५ राग त्यांच्या सर्व वैशिष्टय़ांसह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात कसे शिरतील, याची दक्षता घेतली पाहिजे. रागातील सौंदर्य त्याला अनुभवता आले पाहिजेत. एकाच रागाचा निरनिराळ्या गायकांनी केलेला आविष्कार प्रत्यक्ष किंवा ध्वनिमुद्रिकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना दाखवून दिला पाहिजे.

महापालिकेने संगीताचा विचार असा सम्यक दृष्टीने करावा. कारण सर्व विद्यार्थी काही भावी आयुष्यात गायक किंवा वादक व्हावेत, ही अपेक्षा नाही. मुख्य हेतू असा आहे की, सुसंस्कृत व कलांचा समर्थरीत्या अनुभव घेणारे नागरिक निर्माण व्हावेत. अकादमीच्या संदर्भात भारतीयच नव्हे, तर इंग्रजी ध्वनिमुद्रिकांचाही संग्रह असावा. त्याद्वारे विद्यार्थ्यांची दृष्टी व्यापक होईल.

मला आणखी एक सूचना करावीशी वाटते की, ज्याप्रमाणे महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या लोकांचे आपण सहकार्य घेणार आहोत, त्याप्रमाणे संगीतप्रेमी नागरिकांचेही सहकार्य या कार्यात मिळवणे आवश्यक आहे. शहरातील निरनिराळ्या वस्त्यांतील निरनिराळ्या लोकांचे सहकार्य मिळविले पाहिजे. उदाहरणार्थ, गिरगावातील ट्रिनिटी क्लब किंवा गिरणगावातील भजनी मंडळे अशांसारख्या संस्थाचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने शिक्षक, पालक, विद्यार्थी या तिघांचा संगम शिक्षण संगीताच्या कार्यात घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे आहे.
संगीत शिक्षणाचा आपण पुनर्विचार करत आहात, याबद्दल मी आपले पुन्हा आभार मानत आहे. जेव्हा जेव्हा माझ्या सहकार्याची आपणास आवश्यकता वाटत असेल, त्या त्या वेळेला आपणाला ते देण्याचा मी नम्र प्रयत्न करीन, असे आश्वासन देतो.

आपला नम्र
पु. ल. देशपांडे

लोकसत्ता
रविवार, १३ जून २०१०