तुमच्या मुलांसाठी पु ल देशपांडे Tumachya Mulansathi by P L Deshpande

शाळेतली मुलं जेव्हा ' आम्ही कुठली पुस्तकं वाचावी ?' असं मला विचारतात , तेव्हा मी त्यांना सांगतो , ' तुम्हांला जी वाचावीशी वाटतील , ती वाचा. ' काही मुलं थोडासा अपराध्यासारखा चेहरा करुन सांगतात , ' आम्हांला रहस्यकथा आवडतात ' मग मी म्हणतो , ' मग रहस्यकथा वाचा. ' माझ्या शाळकरी वयात मी डिटेक्टिव्ह रामाराव , भालेराव यांच्या गुप्त-पोलिशी चातुर्याच्या कादंबऱ्यांचा फडशा पाडत असे.

माझ्या आयुष्यात ' पुस्तक ' ही गरज व्हायला ह्मा करमणूक करणाऱ्या पुस्तकांनी खूप मदत केली. हळूहळू त्याहूनही अधिक चांगलं वाचायची ओढ लागते. ज्या घरात आणि समाजात आपण वाढत असतो , त्याचे आपल्या मनावर संस्कार होत असतात. त्यांतून आवडीनिवडी ठरायला लागतात.

शाळेत शिकताना एखादा विषय आपल्याला विशेष आवडायला लागतो. एखादा खेळ अधिक आवडतो. आपल्या आवडीचा जो विषय असेल , त्यावरचं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं. त्या विषयावर वाचलेलं अधिक लक्षातही राहतं. क्रिकेट आवडत असलं , तर दहा वर्षांपूर्वीचा एखादा टेस्ट- मॅचचा स्कोअर तपशीलवार आठवत असतो.

कुठल्या खेळाडूचा त्रिफळा उडाला , कोणी कोणाच्या गोलंदाजीला कुठं झेल घेतला , कोण धावचीत झाला- कोण पायचीत झाला , सगळं काही आठवत असतं. पण न आवडणाऱ्या भूमितीतलं प्रमेय पन्नास वेळा वाचूनही आठवत नाही. शेवटी हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे पण केवळ वैयिक्तक आवडिनिवडीचा प्रश्न आहे , म्हणून सोडून देता येत नाही. वाचनाची आवड जोपासावी कशी , याचाही विचार करायला हवा.

पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइसक्रिम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली , तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या ह्मा पदार्थांचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यार्थांच्या मनात पुस्तका- संबंधी खरा प्रश्न उभा राहतो , तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पा‌ठ्यपुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही ; नाही वाचलं तर नापास होऊ , ह्मा भीतीनं वाचलं जातं.

त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे ; तो म्हणजे ते पुस्तक ' पाठ्यपुस्तक आहे ' अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पाठ्यपुस्तक ही त्या पुस्तकावर सोपवलेली एक निराळी कामगिरी आहे. चांगल्या ग्रंथकारांनी जे ग्रंथ लिहिले , ते मुलांना परिक्षेत मार्क मिळवून द्यायची सोय करावी म्हणून लिहिले नाहीत. समजा , तुमचं इतिहासाचं पुस्तक असलं , तर ते आपले वीरपुरुष कोण होते , परकीयांची आक्रमणं कां झाली ? ती आपण कशी परतवली कमी पडलो तर कां कमी पडलो ?- हे सारं सांगत आलेलं असतं.

ते वाचत असताना तुमच्या मनात प्रश्न उभे राहतील. त्याची उत्तरं शोधायला ते पुस्तक पुरेसं उपयोगी पडलं नाही तर तुम्ही दुसरं इतिहासाचं पुस्तक पहाल , गुरुजींना विचाराल. तुम्हांला इतिहासाचं ते पुस्तक परीक्षेसाठी लावलेलं पाठ्यपुस्तक न वाटता इतिहासाबद्दल तुमच्याशी बोलणाऱ्या मित्रासारखं वाटेल.

पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात , की आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का ? ही योजना करणंदेखील पुष्कळसं तुमच्या आवडिनिवडीवर राहील. पण साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात , तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा. नुसतीच करमणुकीची पुस्तकं वाचणं हे नुसत्याच शेवचिवड्यावर राहण्यासारखं आहे.

पुस्तकांनासुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात. म्हणूनच म्हटलंय , की काही पुस्तकं चघळायची असतात , काही खूप चावून चावून पचवावी लागतात , काही एकदम गिळता येतात. पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं. पण पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही , हे मात्र चूक आहे. प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं , हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे.

कधी कल्पनेच्या प्रदेशात , कधी विचारांच्या जगात , कधी विज्ञानाच्या राज्यात , कधी वनस्पतींच्या दुनियेत- कुठल्या पानावर मनाला किल्हाद देणारं , आधार देणारं किंवा अंतर्मुख व्हायला लावणारं काय मिळेल ते सांगता येणं कठीण आहे. एखादाच विचार मिळतो आणि आपलं जीवन उजळून जातो. गांधीजींच्या हातात रिस्कनचं अन्टु द लास्ट- अंत्योदय हे पुस्तक आलं आणि त्यांना त्यांच्या जिवितकार्याला विचारांची बैठक मिळाली. पुस्तकच कशाला , एखादी कवितेची ओळखसुद्धा आयुष्यभर सोबत करत राहील! पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही.

खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.