सखे सोबती गेले पुढती - पु ल देशपांडे Sakhe Sobati Gele Pudhati by Pu La Deshpande

चादरीखाली झाकलेला देह डोळ्यापुढे दिसत होता . शांत झोप लागल्यासारखा . ह्या झोपेतून आता जाग नाही हे कळत होते . असल्या झोपेकडे सगळ्यांचा प्रवास असतो , हा वेदान्तही माहिती होता . घणाघाती घाव पडावा अशी सुन्न झालेली माणसे पायाखालची जमीन खचल्यासारखी उभी होती . हलली तरी छायांसारखी हलत होती . बांध फोडून बाहेर
हुंदके कानांवर येत होते . सारे काही संपलेले आहे या जाणिवेने देहमन बधिरले होते . त्या घरात गेल्यावर कधी आतल्या कोचावर बेठक मारून हातातल्या आडकित्याने सुपारी कातरीत बसलेल्या थाटात , तर कधी आतल्या खोलीतून बाहेर प्रवेश करीत "" या "" अशा मोकळ्या मनाने स्वागत करणारा तो आवाज आता पुन्हा कानी पडणे नाही हे समजत होते . आतल्या खोलीतून बाहेरच्या दिवाणखान्यात तो मृत देह उचलून आणताना , असाही एक प्रसंग आपल्या आयुष्यात येणार आहे असे कधीही वाटले नव्हते . पाचसहा दिवसांपूर्वीच गोष्टी झाल्या होत्या . माडगूळकरांना आणि विद्याबाईंना आम्ही सांगत होतो , "" तुम्ही जिमखान्यावर राहायला या . सगळे जुने स्नेहीसोबती तिथेच आसपास राहतात . भेटीसाठी सोप्या होतील . आता ` पंचवटी ' तली ही जागाही अपुरी पडत असेल . पूर्वीपेक्षा वर्दळही खूपच वाढली आहे . मोटांरीचा धुरळा , पेट्रोलचे भपकारे . . . अधिक मोकळ्या हवेत या . . . "" आणि त्याआधी , आठदहा दिवसांपूर्वीच , गीताचे दान मागायला गेलो होतो . बाबा आमटयांच्या आनंदवना - तल्या वृक्षारोपण - समारंभासाठी . असा हा गीत मागायला जायचा परिपाठ गेल्या तीस - पस्तीस वर्षांचा . रिक्त हस्ताने आल्याचे स्मरत ही .चित्रपटव्यवसायात असताना तर नित्यकर्माचाच तो एक भाग होता . आताशा नेमित्तिक . पुण्याला ` बालगंधर्व ' थिएटर उभे राहत होते . गोपाल देऊसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणाऱ्या चार ओळी पाहिजे होत्या . ` पंचवटी ' गाठली .माडगूळकरांना म्हणालो , "" स्वामी , चार ओळी हव्या आहेत . . . बालगंधर्वाच्या पोर्ट्रेटपाशी . "" मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले , "" असा बालगंधर्व आता न होणे . "" तेवढ्यात कुणीतरी आले . गप्पागोष्टी सुरू झाल्या . मी समस्यापूर्तीची वाट पाहत होतो . तासाभरात निघायचे होते . त्या श्लोकाला चाल लावायची होती . उद््घाटन - समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या . त्यांत माडगूळकरांचेच ` असे आमचे पुणे ' होतेच . तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला . सुरेख , वळणदार अक्षरात लिहिलेला . बकुळ पंडितला मी चाल सांगितली . रंगमंदिराच्या उद््घाटनाच्या वेळी रसिकांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले . रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या ` नारायण श्रीपाद राजहंस ' आणि ` स्वयंवरातली रूक्मिणी ' अशी दोन दर्शने घडवणाऱ्या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजूला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरू झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद द्यावी की गीतातल्या शब्दशिल्पाला . प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या ` रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्् ' ह्या अनुभूतीचे पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरूमाल अश्रू पुसत होते .
पुणे विद्यार्थीगृहासाठी ` मुक्तांगण ' उभे करताना अशीच ` मुक्तांगणा ' च्या गाण्याची मागणी घेऊन आलो होतो . ` मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी ' असे मर्ढेकर म्हणून गेले आहेत . माडगूळकरांच्यापाशी गीते मागताना हे किती खरे होते . आम्हां मागणाऱ्यांचीच ताकद अपुरी पडली . शेकडो गीते त्यांनी दिली . आणखी शेकडो मिळाली असती . दोन वर्षांपूर्वी झालेल्या त्या भंयकर आजाराने त्यांच्या शरीरावर आघात केला होता ; - पण गीतप्रतिभेचा झरा मात्र अखंड वाहत होता . ` मुक्तांगणा ' च्या गाण्याच्या वेळचीच गोष्ट . मी माडगूळकरांना ` मुक्तांगणा ' चा हेतू सांगितला . वृक्षरोपणाने कार्यारंभाची मुहूर्तपेढ रोवली जाणार होती . त्या कार्याच्या वेळी मला गीत हवे होते ते माडगूळकरांच्याच प्रतिभेतून फुललेले . गप्पागोष्टी चालल्या असतानाच माडगूळकरांनी हातातल्या कागदावर दोन ओळी लिहिल्या :


`आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !
मुक्तांगणांत या रे , मुक्तांगणांत या रे ! ! '

त्यानंतर मग इकडच्यातिकडच्या गप्पागोष्टी झाल्या . घरी परतल्यानंतर तासाभरातच फोन वाजला . पलीकडून माडगूळकरांचा आवाज आला : "" घ्या , तुमचं गाणं तयार आहे . कागद - पेन्सिल घ्या .

`आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !
मुक्तांगणांत या रे ! !
वयवंशधर्मभाषा यांना न ठाव कांही
क्रीडांगणीं कलांच्या हा भेदभाव नाही
मनममोकळेपणे घ्या इथले पिऊन वारे
मुक्तांगणांत या रे . . . . . . . ' ""

गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी . डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते : रात्रीचे चित्रिकरण आटपून चालत चालत आम्ही दोघे येत होतो . पहाट होत होती . रस्त्यातले दिवे मालवले . त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उद््गारले ,

"" विझले रत्नदीप नगरांत !
आता जागे व्हा यदुनाथ . . . ""

लकडी पुलाजवळ जिथे टिळक रोड सुरू होतो तिथेच पंतांचा गोट होता . आता तिथे सिमेंटकॉक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत . त्या पंतांच्या गोटात एका दहा गुणिले दहा क्षेत्रफळाच्या खोलीत आमचा तळ असे . किती गीतांचा आणि पटकथांचा जन्म त्या खोलीत झाला आहे हे सांगायला आता ती खोलीही उरली नाही . किती चर्चा , किती नकला किती गाणीबजावणी , किती थट्टामस्करी . . . वाढत्या वयाबरोबर वारंवार आठवणारी गडकऱ्यांची एकच ओळ : ` कृष्णाकाठी कुंडल आतां पहिले उरलें नाही . ' साहित्यकलांच्या नव्या निर्मितीत बेहोश होण्याऱ्यांची तिथे मेफिल जमायची . मला वाटते , यापूर्वी मी कुठेसे म्हटले आहे तेच पुन्हा म्हणतो : ` स्वरवेल थरथरे फूल उमललें ओठीं . . . ' हे माडगूळकरांच्या गीतांच्या बाबतीत सर्वार्थांने खरे आहे . जणू काय लक्ष गीतांची उतरंड त्यांच्या मनात विधात्याने त्यांना जन्माला घालतानाच रचलेली होती . मागणाऱ्याने मागावे आणि एखाद्या फुलमाळ्याने भरल्या
टोपलीतून फूल काढून दिल्यासारखे माडगूळकरांनी अलगद टपोरे गीत काढून द्यावे .

` संसारीं मी केला तुळशीचा मळा ! करदा सावळा पांडुरंग ' आशा ओळींनी सुरूवात होणारा त्यांचा एक अभंग आहे . माणसाला अचंब्यात टाकणाऱ्या माडगूळकरांच्या प्रतिभेने वास्तविक आपल्या मळ्यात नाना प्रकारच्या फुलांची बाग फुलवली होती . ही केवळ चतुर कारागिरी नव्हतीं ; त्यांना नुसतेच एक गीतकार म्हणून कमी लेखणाऱ्यांना नाना प्रकारच्या भाववृतींशी समसर होणारे माडगूळकर ठाऊक नव्हते . गेल्या जवळजवळ तीन तपांच्या सहवासात मला अनेक प्रकारचे माडगूळकर पाहायला मिळालेले आहेत . प्रौढांच्या मेळाव्यात बसलेले माडगूळकर त्यात एखादे पोर आले की एका क्षणात किती देखणा पोरकटपणा करू शकत ! एखाद्या ग्रामीण पटकथेतले संवाद लिहिताना त्यांचा तो माणदेशी शेतकऱ्याचा अवतार
पाहण्यासारखा असे . ते शीघ्रकवी होते तितकेच शीघ्रकोपीही होते . आणि त्या कोपाचा अवसर उतरल्यावर विलक्षण मवाळही होऊन जात . ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओळीवर निरूपण करताना त्यांच्यातला रसाळ पुराणिक दिसायला लागे ; आणि ` एक पाय तुमच्या गावांत ! दुसरा तुरूंगांत किंवा स्वर्गात ! तमा नाहि त्याचि शाहिराला . . . ' असा पवाडा स्फुरायला लागला की अगिनदास - तुळशीदासांच्या वंशाचा दिवा पेटता असल्याची साक्ष पटे . केवळ साहित्यिकां -
साठी साहित्य आणि कवींसाठी कविता लिहिणारा हा कवी नव्हता . कवितेच्या याचकाची जातकुळी किंवा हेतू न पाहता , गीतदान हा जणू आपला कुलधर्म आहे आणि त्याला आपण जागलेच पाहिजे अशा भावनेने त्यांनी कविता लिहिल्या .


हा कवी आपल्या व्यक्तिमत्वात भाववृत्तींच्या इंद्रधनुष्याचे किती खेळ खेळवीत जगत होता . प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळीत असतानाही चटकन कविता , कथा , कादंबरी , पटकथा अशा नाना प्रकारच्या निर्मितीच्या कार्यात तन्मय होऊन जात होता . त्यांच्या गीतांना चाली लावण्याचा योग मला लाभला , ते गीत घडत असताना त्यांचे ध्यान पाहत बसणे हा ते गीत
वाचण्याइतकाच आनंदाचा भाग असे . माडगूळकर उत्तम अभिनेते होते . एखादे कडवे लिहिताना तो भाव सूक्ष्म रूपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसे . चित्रपटातला प्रसंग सांगितला की पटकन पहिली ओळ त्यांच्या मुखातून बाहेर पडायची , आणि पेळूतून सूत निघाल्यासारखे कवितेच्या ओळींचे सूत्र प्रकट व्हायला लागायचे . यमकप्रासांसाठी अडून राहिलेले मी त्यांना कधी पाहिले नाही . त्यांची गीते गाताना किंवा वाचताना जर मन कुठल्या एका गुणाने थक्क होत असेल तर त्यांतल्या सादगुणाने . कविह्दयातून रसिकह्दयापर्यंतची कवितेची वाटचाल कशी सहज पण म्हणून काही ती नुसतीच सुबोध नसे . अनेक प्रतिमांचा सुंदर मिलाफ तीत

असायचा ` दूर कुठे राउळांत दरवळतो पूरिया ' असे एक गाणे त्यांनी लिहिले होते . सुरांच्या शाहिरांचा त्यांना वरदहस्त लाभला होता . माडगूळकर महाराष्ट्रातल्या घराघरातच नव्हे , तर झोपडीझोपडीत गेले . ती वाट मराठी मुलखात कविप्रतिभेच्या ह्या त्रेगुण्यात्मक शेलीने घडवली होती यात शंका नाही . सर्व अंगानी आणि सर्व गुणांनी त्यांनी मराठी भाषा पचवली होती . त्यांच्या गद्य किंवा पद्य भाषेला अमराठी वळण ठाऊकच नव्हते . ज्या ग्रामीण वातावरणात ते वाढले तिथल्या पारावर पवाडा असतो , देवळात पंतवाङ्मयाचा विदग्ध स्वरूपातला शब्दश्रीमंतीचा खजिना मोकळा करीत कथेकरीबुवा येत असतात , आणि जत्रेच्या रात्री कड्या - ढोलकीच्या साथीत पायांतल्या घुंगरांशी स्पर्धा करीत श्रृंगारिक शब्दांचेही ता थे तक्् थे चाललेले असते . सुगीच्या दिवसांत पाखरांच्या थव्यांबरोबर लोकगीते गाणारे भटके कलावंतही भाषेचा एक न्यारा रांगडेपणा घेऊन येत असतात . सारे गाव ह्या संस्कारांत वाढत असते . माडगूळकरांच्या बालपणी हा असर अधिक होता . पण तो रस साठवणारे पात्र सर्वांच्याच अंतःकरणात नसते . जीवनातल्या अनेक अंगांचे नाना प्रकारांनी दर्शन घडवणाऱ्या संत - पंत - शाहीर - लोककलावंत असणाऱ्या गुरूजींनी ह्या देशात शतकानुशतके ही खुली विद्यापीठे चालवली आहेत . मात्र त्या
विद्यापीठांना माडगूळकरांसारखा एखादाच त्या परंपरेला अधिक समृध्द करणारा विद्यार्थी लाभतो . आपल्या गीतांना त्यांनी आपल्या आईच्या ओव्यांची दुहिता म्हटले आहे . ह्या ` आई ' शब्दात ग्यानोबा - तुकोबा ही माउलीपदाला पोचलेली मराठी संतमंडळी आहेत इतकेच नव्हे , तर ` तुलसी - मीरा - सूर - कबीर ' ही आहेत . म्हणूनच त्यांच्या कवितेतला प्रसाद सर्वांच्यपर्यंत पोचतो आणि तिचे नाते मानवतेच्या प्रेमाने ओथंबलेल्या प्राचीन आणि सुंदर परंपरांशी जुळताना आढळते . हे केवळ त्यांच्या अभंग किंवा भक्तिपर रचनेतच होते असे नाही . एका चित्रपटात त्यांनी एक धनगरी गीत लिहिले आहे :"" आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ति आता
पाऊस पाड गा
पाऊस पा ड ""ही कविता लिहून झाली त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो . सुधीर फडक्यांनी त्या गीताला सुंदर चाल दिली आहे . "" ध्येसपांडेगुर्जी , ऐका . . . "" म्हणून त्यांनी ते गाणे वाचायला सुरूवात केली . सुरांचा संबंध नव्हता . छंदातच वाचन चालले होते . आवेश मात्र धनगराचा . अशा वेळी त्यांच्यातल्या त्या अभिनयगुणाचे आश्यर्य वाटायचे . क्षणार्धात त्या कवितेतल्या धनगरांतले ते धनगर होऊन गेले . त्या गाण्यातल्या ` पाऊस पाड गा ' मधले ` गा ' हे संबोधन ऐकल्यावर ` गा ' , ` वा ' , ह्या साऱ्या संबोधनांतले मऱ्हाटीपण डोळ्यांपुढे नाचायला लागले . त्या एका नेमक्या ठिकाणी पडलेल्या ` गा ' मुळे ` एकनाथ - धाम ' नावाच्या प्रभात रस्त्यावरच्या घरातली ती चिमुकली खोली माणदोशातला उजाड माळ होऊ नगेली . योग्य ठिकाणी पडलेल्या नेमक्या शब्दाला मंत्रसामर्थ्य प्राप्त होत असते . मर्ढेकरांच्या ` फलाटदादा ' तल्या ` सांगा वे तुमि फलटदादा ' मधल्या ` वो ' ने जसे त्या रेल्वेच्या फलाटाला मुंडासे बांधून खांद्यावर कांबळे टाकून उभे केले , तेच ह्या ` गा ' ने केले होते . भाषेचे प्रभुत्व हे शब्दसंग्रहावरून किंवा शब्दांचे नुसतेच खुळखुळे वाजवण्याच्या करामतीतून जोखायचे नसते . मुळचाचि खरा असणारा झरा हा असा एखाद्या चिमुकल्या शब्दाने अवचित भेटत असतो .


गीतभावनेशी तादात्म्य पावण्याच्या त्यांच्यामधल्या गुणांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतांतून आढळतात . शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही . अशी शेकडो गीते त्यांनी रचली . चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या` आर्डरी ' ही विचित्र असायच्या ` आर्डरी ' हा त्यांचाच शब्द . कधीकधी चाल सुचलेली असायची .

"" स्वामी , असं वळण हवं . ""
"" फूल्देस्पांडे , तुम्ही बाजा वाजवीत राहावे . ""

मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा . मग मधुकर कुळकर्ण्याला ` पेटीस्वारी ' , राम गबालेला ` रॅम्् ग्लाबल , ' वामनराव कुळकर्ण्यांना ` रावराव ' . . कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे . चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई . मग त्या तालावर झुलायला सुरूवात . बेठकीवर उगीचच लोळपाटणे , पोटाशी गिरदी धरून त्याच्यावर चिमट्यात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढ्यात ठेवून सुपारी कातरायला सुरूवात . मग आडकित्याची चिपळी करून ताल . . . नाना तऱ्हा . एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे , की नुसताच पोरकटपणा चाललाय ! एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे . त्यांच्यातला नकलावर जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा . खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे फेकून शेशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे . ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते . प्रापंचिक जबाबदाऱ्या फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते , त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय , ते आता कोणी सांगावे ? गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात . माडगूळकरांना गडकऱ्यांविषयी अतोनात प्रेम . आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकऱ्यांच्या कलितांचेच नव्हे तर , नाटकांतील उताऱ्यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा . हरिभाऊ आपटे , नव्हे , तर नाथमाधव , गडकरी , बालकवी , केशवसुत , फडके , खांदेकर , अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांते मार्ग पुसेतु आम्ही ह्या साहित्यांच्या प्रांतात आलो . मी मुंबईत वाढलो आणि माडकूळकर माडगुळ्यात वाढले , तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते . गडकऱ्यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म , माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे . बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते . ` त्या तिथे ,
पलिकडे , तिकडे , माझिया प्रियेचे झोपंडे ' ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो , "" महाकवि , तुम्ही लकी ! ( माडगूळकर मात्र स्वतःला ` महाकाय कवी ' म्हणत . ) तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचं वाकडं झाड होतं . आम्ही वाढलो त्या वातावरणातल्या वळणावर जळाऊ लाकडांची वखार ! "" पण सुदेवाने मी मुंबईत वाढूनही तसा मुंबईकर नव्हतो . शाळकरी वयातल्या माझ्या खूप सुट्या कोल्हापुराजवळच्याच एका खेड्यात माझ्या आत्याच्या गावी मी घालवल्या . शिवाय माझ्या लहानपणीचे पार्लेही एक खेडेवजाच गाव होते . माझ्या घराच्या मागल्या बाजूला पावसाळ्यात भातशेती चालायची . ज्याला हल्ली ` प्लॉट््स ' म्हणतात ती सारी भाताची खाचरे किंवा दोडक्यांचे , पडवळांचे आणि काकड्यांचे मळे होते . फर्लांगभर अंतरावरच्या विहिरीवर मोट चालायची . आजच्यासारखे चारी बांजूना सिंमेट - कॉक्रीटचे जंगल उभे राहिले नव्हते . आमच्या शनिवार - रविवारच्या सुट्या आंब्याच्या मोसमात बागवानांच्या नजरा चुकवून केऱ्या पाडणे , गाभळलेल्या चिंचाच्या शोधात भटकणे , घरामागल्या आज भुईसपाट झालेल्या टेकडीवर काजू तोडायला जाणे , विहिरीत मनसोक्त पोहणे , असल्या मुंबईकर मुलांच्या नशिबात नसलेल्या गावंढ्या उद्योगांतच जायच्या . पण आपल्याला आमचे म्हणून सांगण्यासारखे खेडे नाही याची मात्र मनाला खूप खंत वाटे .पण मुंबईकर असूनही आमचे कुटुंब तसे घाटीच होते . त्यामुळे माडगूळकरांच्या ग्रामीण प्रकृतीने मला चटकन आपलेसे करून टाकले . कोल्हापूर भागातली ग्रामीण बोली फार बाळ - पणापासून माझ्या जिभेवर चढली आहे . एवढेच नव्हे , एकूणच बोलीभाषांतल्या गोडव्याचा मी आजही भक्त आहे . आजही माणसे वऱ्हाडी , सातारी वगेरे भाषांत बोलत असली तर गाणे ऐकल्यासारखे मी त्यांचे बोलणे ऐकतो . किंबहुना अडाणीपणा दाखवण्यासाठी त्या बोलीचा उपयोग केलेला मला रूचत नाही . कोकणी बोलणाऱ्यांशी मी कोकणीतच बोलतो . ह्या बोलींना लेखीच्या कृत्रिम बंधनात जखडू नये , श्वासाश्वासातूनच त्यांचा व्यवहार चालावा , असे मला वाटते . माडगूळकरांना केवळ सातारी - कोल्हापुरीच नव्हे , तर त्या भागातल्या निरनिराळ्या बोलींतल्या सूक्ष्म छटाही अवगत होत्या . शब्दांचे रंगढंग ते क्षणात कंठगत करीत . एक काळ असा होता की तासन््तास आमचे संभाषण सातारी बोलीतच चाले . कधी कोकणी ढंगात . प्रथम ज्या बोलीतून सुरूवात व्हायची त्याच बोलीत संवाद चालू .


"" कवा आलायसा म्हमयस्नं ? "" म्हटले की , "" येरवाळीच आलु न्हवं का रातच्या
पाशिंदरनं . ""
"" काय च्या ह्ये जहालं का न्हाई ? "" ह्या थाटात फाजिलपणा सुरू .

` पुढचं पाऊल ' चित्रपटाच्या वेळी आम्ही संवाद लिहित होतो . माडगूळकरांनी एक पार्ट घ्यायचा , मी दुसरा , प्रभाकर मुझुमदार संवाद टिपून घ्यायचा . आम्ही दोघेही नकलावर असल्यामुळे सोंगे वठवायला वेळच लागत नसे . त्या चित्रपटाचे शूटिंग हा तर दोनअडीच महिने त्या स्टुडिओत चाललेला सांस्कृतिक महोत्सवच होता . प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी
आयत्यावेळचे इतके संवाद बोलले जायचे , की शेवटी रेकॉर्डिस्ट शंकरराव दामले म्हणायचे , "" रिहर्सलच्या वेळी बोललेलंच येणार आहे की शेवटी गाववाले ? "" त्या वेळी ` काय गाववाले ' हे कुणीही कुणालाही हाक मारण्याचे सार्वजनिक संबोधन होते . गेल्या कित्येक वर्षांत मी चित्रपटांच्या स्टुडिओत गेलो नाही . ते गाव एके दिवशी सोडले ते सोडलेच . त्यानंतर त्या दिशेने अनेक आमंत्रणे आली . - पण नाही जावेसे वाटले . आता तिथे काय आहे , मला ठाऊक नाही . पण पंचवीसेक वर्षांपूर्वी पुण्यातल्या ` प्रभात ' , ` नवयुग ' , ` डेक्कन ' वगेरे स्टुडिओत
चित्रपटनिर्मिती होत होती त्या वेळी स्टूडिओ हे जणी साहित्या - संगीत कलांचे मीलनक्षेत्र होते . मी आणि माडगूळकर ज्या काळी पुण्यात आलो तो काळ ह्या क्षेत्रात आर्थिक दृष्टीने मुळीच लाभदायक नव्हता . ` प्रभात ' चा संसार कोलमडला होता . ` नवयुग ' स्टुडिओचेही तेच . पलीकडे ` डेक्कन ' स्टुडिओ होता . आता त्या ठिकाणी तेलाच्या गिरण्या वगेरे आल्या आहेत . पेशाच्या दृष्टीने ते दिवस ओढगस्तीतेच . निर्मातेमंडळीत तर चित्रपट म्हणजे कलानिर्मितीचे क्षेत्र मानून धडपडणाऱ्या आमच्यासारख्या येडपटांना पेशात बनवायची चढाओढच लागलेली होती . दिवसावारी येणाऱ्या एक्स्ट्रांपासून ते लेखक , संगीतदिग्दर्शक , नट वगेरेंना ` बुडपणे ' हा मुळी नियमच होता . ठरलेले पेसे देणे हा अपवाद . इतके असूनही त्या स्टुडिओची ओढ जबरदस्त . प्रसिध्दीच्या झगमगाटापेक्षा तिथले वातावरण अधिक आकर्षक असायचे . शिवाय
मराठी चित्रपटात प्रसिध्दीचा तरी कसला कर्माचा झगमगाट ! एक रंगीत पोस्टर करायचे म्हणजे निर्मात्याने त्यापूर्वी ज्याचे पेसे बुडवले नसतील असा होतकरू पेंटर पकडून त्याला चान्स द्यायचा ! पण माडगूळकरांच्या सहवासातल्या तिथल्या मेफिलीत लाभणाऱ्या आनंदाला तोंड नव्हती . मला तर नेहमी वाटते की , माडगूळकरांच्या तोंडून चित्रपटकथा ऐकताना
होणारा आनंद ती पडद्यावर पाहताना मिळाला असे क्वचितच घडले . नाना प्रकारच्या अनुभवांच्या पुड्या तिथे सोडल्या जायच्या . वादविवाद रंगायचे . नव्या कवितांचे वाचन चालायचे . सिनेमावाले असलो तरी मनांची पाळेमुळे साहित्यात , अभिजात संगीतात , उत्तम नाटकांत रूजलेली . तशी सगळीच हुन्नरी मंडळी . आजही डोळ्यांपुढे त्या मेफिली उभ्या राहतात . राजाभाऊ परांजपे , राम गबाले , वसंत सबनीस , ऑफिसला मारलेली टांग सायकली -
वर टाकून आलेले वसंतराव देशंपाडे , हळूच एखादी कोटी करून आपण त्यातला नव्हेच असा चेहरा करून बसलेले बाळ चितळे , अप्पा काळे , ग . रा . कामत , गोविंदराव घाणेकर , सुधीर फडके , बहुगुणी वसंत पवार , अस्सल कोल्हापूरी साज भाषेला चढवून बोलणारे वामनराव कुलकर्णी , गुपचूप बोलल्यासारखे बोलणारे विष्णुपंत चव्हाण , सातमजली हसणारे काका मोडक , खास ठेवणीतून टाकल्यासारखे एखादेच मार्मिक वाक्य टोकणारे शंकरराव दामले ,
कथेतल्या कच्च्या दुव्यावर नेमके बोट ठेवणारे राजा ठाकूर . . . .


पुण्यातला चित्रपटव्यवसाय विसकटला . काहींना काळाने ओढून नेले . माणसे पांगली कायमची हरवली . मेफिली संपल्या . आता तर त्या मेफिलींचा बादशहाच गेला . त्या मेफिलींची ओढ विलक्षण होती . एक तर आमच्या दरिद्री स्टुडिओतली कॅमेऱ्यापासून ते रेकॉर्डिंग मशिनपर्यंतची सारी यंत्रसामुग्री चालण्यापेक्षा मोडून पडण्याचच अधिक तत्पर . अशा वेळी सारे स्थिरस्थावर होईपर्यंत करायचे काय ? अपरात्र झालेली असायची . दरिद्री स्टुडिओचा दरिद्री कँटीन . तिथून येणारा चहा ही जास्तीत जास्त चेन . पण मेफिलीचा रंग असा गहिरा , कडूगोड अनुभवांच्या पोतड्या तुडुंब भरलेल्या . माडगूळकरांनी गावाकडल्या गोष्टी सुरू कराव्या आणि मेफिलीने त्या अवाक होऊन गोष्टी ऐकाव्या . असेच एकदा ते औंध संस्थानातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या छात्रालयातल्या गोष्टी सांगत होते . घटकेत मुलांची बौध्दिक आणि शारीरिक सुदृढता तपासणारे , त्यांच्या हिताची काळजी करणारे औंधकरमहाराज त्यांनी डोळ्यांपुढे उभे केले होते .

माडगूळकरांचे माडगूळ्याइतकेच औंधावर प्रेम . त्या चिमूटभर संस्थानात विद्यार्थिदशे - तल्या माडगूळकरांना फार मोठा सांस्कृतिक धनलाभ झाला होता . तिथे नुसतेच अन्नछत्र नव्हते ; ज्ञानछत्रही होते . फार मोठ्या अंतःकरणाच्या , त्या वरपांगी करड्या वाटणाऱ्या राजाच्या हाताची दणकट थाप त्यांच्या पाठीवर पडली होती . ती ऊब त्यांनी आयुष्यभर जिवापाड जपली होती . किंबहुना सिनेमात नशीब काढायला माडगूळकर आले त्या वेळी त्यांना ` औंझकर ' असेच म्हणत . बेचाळिसच्या सुमाराला त्यांची - माझी पहिली भेट झाली त्या वेळी औंधकराचे माडगूळकर झाले होते .` नाट्यनिकेतना ' त वल्लेमामा म्हणून तबलजी होते . त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात असे . मी आणि माडगूळकर फिरायला चाललो असताना वाटेत एकदा वल्लेमामा भेटले . त्यांनी माडगूळकरांना "" कसं काय औधंकर ? "" म्दटल्यावर मी
जरासा चपापलोच . मग मलामाडगूळकरांनी ` औंधकर ' नावाची कथा सांगितली . औंधकर - काळातले त्यांचे चित्रपटसृष्टीतले अनुभव त्यांनी लिहिले आहेत . काही व्यक्तींचे आणि स्थळांचे स्मरण त्यांना चटकन भूतकाळात घेऊन जाई . मात्र त्या प्रतिकूल काळाचे त्यांनी चुकूनसुध्दा गहिवर काढून भांडवल केले नाही . साऱ्या कडू अनुभवांना त्यांनी थट्टेत घोळून टाकले , आणि वेळोवेळी स्नेहाचा हात पुढे केलेल्या लोकांचे स्मरणही ठेवले . एक मात्र खरे की , गरिबीच्या काळात भोगाव्या लागलेल्या गोष्टींचा त्यांच्या मनावर कुठेही ओरखडा होता . ज्या वयात जे लाभायला हवे होते ते न लाभलेल्यांना नंतर कितीही ऐश्वर्य लाभले तरी कसलेतरी अबोध औदासीन्य मनावर मळभ आणीत असते . सगळ्याच चांगल्या कलावंतांत किंवा भारतीय विचारवंतांतही कलेच्या आणि व्यवहाराच्या क्षेत्रांत व्यवहारिक पातळीवरून सर्व तऱ्हेच्या धडपडी , नाना प्रकारच्या तडजोडी करताना मनाच्या खोल कप्प्यात एक विरक्त दडलेला असतो असे मला वाटते . माडगूळकरही याला अपवाद नव्हते . कधीकाळी बाळझोपेतून जागे होताना कानांवर पडलेली एकतारी त्यांच्या मनात सतत वाजत होती . ते काही कुणी षड्रिपू जिंकलेले किंवा सहजपणाने ` मी ' पण गळलेले संत नव्हते . प्रतिभावंत होते . सर्वस्वी मुक्त असा कोणीही नसतो . माडगूळकांनाही रागलोभद्वेषमत्सर सर्व काही होते . फक्त कुठला रिपू कुठल्या जोमाने उभा
आहे हेच माणसाच्या स्वभावाचे लक्षण शोधताना पाहायचे असते . रामदासांसारखा समर्थ माणूसदेखील ` अचपळ मन माझें नावरे आवरीतां ' असे असहायपणाने म्हणतो . तुकोबाही ` काय करूं मन अनावर ' म्हणताना भेटतात . पण हे सारे असूनही माणसात एक ` अंतर्यामी ' म्हणून असतोच . माडगूळकरांच्या आणि माझ्या सहवासात आम्ही ऐन उमेदीच्या आणि हौसेच्या काळात अविदितगतयामा अशा रात्री घालवल्या आहेत . मनाच्या खोल अज्ञात घळीतल्या अंतर्यामी अशा वेळी बोलत असतो . हा खरे तर आपुला संवाद आपणासी असाच असतो . त्या संवादातून माडगूळकरांचा एकतारी सूर प्रकट व्हायचा . कदाचित ती खुंटी पिळणारे हात ज्ञानदेव - एकनाथ - तुकोरामांचे असतील . कुणी त्या क्षणांना तो त्या वेळचा त्यांचा ` मूड ' असेल असेही म्हणून विश्लेषण केल्याचे समाधान मानील . काही का असेना , त्या ` मूड ' मझले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .

"" श्रीधर कविचे नजिक नाझरें नदी माणगंगा !
नित्य नांदते खेंडे माझें धरूनि संतगंगा ! ! ""


अशी त्यांची एक कविता आहे . माडगूळकरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायचे की नाही याला महत्व नाही : माडगूळकरांच्या मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला होता यात शंका नाही . श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोगा असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत असावे . त्यामुळे व्यावहारिक जगात वावणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे ` मूड ' मधले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .


` श्रीधर कविचें नजिक नदी माणगंगा !
नित्य मांदते खेडें माझे धरूनि संतगंगा ! ! ""


अशीं त्यांची एक कविता आहे . माडगूळरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायेच की नाही याला महत्व नाही ;माडगूळकरांचे मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला होता यात शंका नाही . ह्या श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोग असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत असावे . त्यामुळे व्यवहारिक जगात वागणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे घेऊन वागणाऱ्या माडगूळकांची रस्सीखेचही चाललेली दिसायची . जीवनातल्या श्रेयस आणि प्रेयस वृत्तींचा हा सनातन झगडा आहे . ह्या रस्सीखेचीतमाणूस कधी प्रेयसाच्या किंवा ऐहिक लाभाच्या दिशेला ओढला गेला तर त्याला तेवढ्यासाठी बाद ठरवण्याची गरज नाही . माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे . पण निर्मितिक्षम कलावंताचे अंतर्मन सतत कुठे ओढ घेत असते ते त्याच्या कलाकृतीतून प्रकट झाल्यावाचून राहत नाही . कलावंताच्या निर्मितीची त्याच्या व्यवहारिक आचरणाशी नेहमीच सांगड घालता येत नाही . खरे तर ती घालण्याचा प्रयत्नही करू नये . कवितेत तारूण्यसुलभ भावनांचा रसरसीत अविष्कार करणाऱ्या माडगूळकरांना अकाली पोक्तपणा आला होता , नव्हे , परिस्थितीने तो त्यांच्यावर लादला होता . चित्रपटाशी माझा संबंध तुटला . भेटीगाठींमध्ये महिन्यामहिन्याचे अंतर पडू लागले . मात्र ` फार दिवस झाले , माडगूळकरांची गाठ पडली नाही . एकदा भेटायला हवं , ' असे सतत वाटायचे . आणि मग गाठ पडली की मधला न भेटण्याचा काळ हा काठी मारल्यामुळे वेगळ्या झालेल्या पाण्यासारखा वाटायचा . असाच एकदा खूप दिवसांच्या अंतरानंतर त्यांच्या घरी गेलो होतो माडगूळकरांच्या मातुःश्रींना ओळख लागली नाही . मग अण्णांनी त्यांना ओळख पटवून दिली . आई म्हणाल्या , "" हे काय बरं ? अधूनमधून दिसत असावं बाबा ! "" त्यांचे ते ` दिसतं असावं ' मनाला एकदम स्पर्श करून गेले . जिथे या ना त्या कारणाने ऋणानुबंध जुळलेले असतात तिथे नुसते ` असणे ' याला महत्व नसते ; अशा माणसांनी एकमेकांना ` दिसत असायला ' हवे . अशा अहेतुक दिसण्याला माणसामाणसांच्या संबंधात फार महत्व असते .
आपली माणसे ` आहेत ' एवढेच गृहित धरून चालत नाही . काळ त्यांना ` न दिसणारी ' केव्हा करून टाकील ते सांगता येत नाही ! पुन्हा कधीही न दिसण्याच्या महायात्रेला माडगूळकर असे चटकन निघून जातील असा स्वप्नात , सुध्दा विचार आला नव्हता . चारपाच दिवसांपूर्वीच ह्या आनंदवनातल्या वृक्षारोपणा - साठी ` कोवळ्या रोपट्या आज तूं पाहुणा ' ह्या त्यांनी लिहिलेल्या गाण्याची चाल मी त्यांना फोनवरून ऐकवली होती . "" तिथं जायला हवं . "" असे त्यांनी म्हटल्यावर "" चलता का ? बरोबर जाऊ या "" असे मी त्यांना म्हणालो होतो . बरोबर कुठले जाणे ? ते गाणे बरोबर घेऊन जाताना त्या संध्याकाळी दर्शन घडले ते चिरनिद्रित माडगूळकरांचे . चौतीसएक वर्षापूर्वींची अशीच एक संध्याकाळ . ह्याच पुण्यात ` भानुविलास ' हे नाटकाचे थिएटर असताना आवारात एक लहानसे औटहाऊस होते . ` युध्दाच्या सावल्या ' हे माडगूळकरांचे नाटक चिंतामणराव कोल्हटकरांनी बसवले होते . त्या औटहाऊसमध्येच चिंतामणरावांनी माझी आणि माडगूळकरांची गाठ घालून दिली होती . त्याच्या कितीतरी वर्षे आधी कोल्हापुरातल्या सोळंकुरमास्तरांच्या ` यशवंत संगीत विद्यालया ' त शाळकरी वयाच्या विद्याबाईकडून ` वद यमुने कुठे असे घनश्याम माझा ' हे गाणे ऐकताना प्रथम माडगूळकर हे नाव ऐकले होते . त्यानंतर ` ललकारी राया माझा गे मोटेवरी ' , ` नको बघूस येड्यावाणी ग , तुझ्या डोळ्यांचं न्यारं पानी ' अशी कितीतरी त्यांची गाणी पुरूषोत्तम सोळंकुरकरांकडून मी शिकलो होतो . ` भानुविलास , ' मधल्या त्या औटहाऊसमध्ये आम्ही प्रथम भेटलो तेच जुन्या
ओळखीचे मित्र भेटल्यासारखे . पुण्यातल्या अनोळखी रस्त्यांतून हिंडत हिंडत आमच्या गप्पा चालल्या होत्या . मेफिल सुरू झाली होती - ती गेली इतकी वर्षे चालूच होती . ` पहिल्या पाळण्या ' तला त्यांचा बापाचा अभिनय पाहून माडगूळकर हे कुणीतरी साठीतले गृहस्थ असावेत असा समज झाला होता . ` ब्रम्हचारी ' त तर त्यांनी लहानसहान कितीतरी भूमिका केलेल्या आहेत . अनेक वर्षांनी पुन्हा ` ब्रम्हचारी ' पाहताना त्यात निरनिराळ्या सोगांत सजलेले माडगूळकर शोधून काढीत होतो . . . त्यानंतरच्या काळात आमच्या किती मेफिली रंगल्या त्याचा हिशेब नाही . जीवनात वाट्याला येणाऱ्या मळ्यांच्या आणि माळांच्या वाटा कितीतरी वर्षे जोडीने तुडवल्या . कधी दूरदूरच्या बांधांवरून हाका देत तुडवल्या . आता सारे संपले . आता उरले माडगूळकर नसलेल्या जगात जगणे . त्यांच्याविषयी भूतकालवाचक क्रियापदात बोलणे . ज्या ओळींनी अंगावर आनंदाचे रोमांच उभे केले त्या ओळीच्या स्मरणाने व्याकुळ होणे . ज्या थट्टाविनोदांनी पोट धरधरून हसलो त्यांच्या आठवणींनी फुटणाऱ्या हसण्याला शोकाची चौकट येणे . आमच्यांत कित्येक बाबतीत मतभिन्नता होती . सुरूवातीच्या काळात कॉलेजचे शिक्षण झालेल्या स्त्रीपुरूषांच्या एकत्र मेळाव्यात वागताना ते काहीसे परकेपणाने वागत . अशा समुदायाविषयी त्यांचे काही प्रतिकूल पूर्वग्रह असत . मग त्यांचा धाकटा भाऊ अंबादास याच्या
कॉलेजमधल्या मित्रांबरोबर येणाऱ्या मेत्रिणीही त्यांचा वडीलभावासारखा सहजपणाने मान राखू लागलेल्या पाहिल्यावर त्यांच्या मतात खूप फरक पडला होता . त्यांची मुले - मुली कॉलेजात जाऊ लागली . कॉलेजची पायरी न चढलेल्या माडगूळकरांना कॉलेजच्या संमेलनाला अध्यक्ष होण्याची आग्रहाची निमंत्रणे येऊ लागली . मर्ढेकरांच्या कविता प्रथम प्रसिध्द झाल्या होत्या ,
त्या काळातही त्या कवितेविषयी आमचे खूप वादविवाद व्हायचे . खुद्द मर्ढेकरांनी त्यांची ` जत्रेच्या रात्री ' ही कविता वाचल्यावर त्यांचे मनापासून कौतुक केले होते . पण माणसा - माणसांच्या जीवनातल्या तारा मतभिन्नतेला ओलांडून जुळून येणाऱ्या असतात . हा नेमका काय चमत्कार असतो हे कविकुलगुरूंनाही उमगले नाही . म्हणून तर त्या जुळण्यामागल्या अंतरीच्या हेतूला ` को पि ' म्हणजे ` कसलासा हेतू ' म्हणून त्यांनी हात टेकले . असल्या ह्या सौहार्दाने जुळलेले आमचे धागे . त्यांत केवळ माडगूळकरांच्या कविताप्रतिभेचे आकर्षण नव्हते . आणखीही खूप काही होते . नित्य भेटीच्या आवश्यकतेच्या पलिकडले .


महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत . इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात . ` Song has the lognest life ' अशी एक म्हण आहे . एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते . एवढेच कशाला ? माणसाच्या मनाचे लहानमोठे , रागद्वेष घटकेत घालवून
टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते . हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते . एक विशाल ह्दय ते गाणे गात असते . माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली . चित्रपटांना दिली , तमाशाच्या फडात , देवळात , शाळेत , तरूणांच्या मेळाव्यात, माजघरात , देवघरात , शेतामळ्यांत , विद्वज्जनपरिषदेत . . . त्यांच्या गाण्यांचा संचार नाही कुठे ? माडगूळकरांचे चिरंजीवित्व त्यांच्या गाण्यांनी सिध्दच झाले आहे . व्यक्तिशः मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे म्हणजे माझ्या पंचविशिपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते . आम्ही काम केलेला एकादा जुना चित्रपटच पुन्हा पाहण्यासारखे त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती . कवितेच्या त्या जिंवत झऱ्यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरून प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती . प्राणान्तिक संकटातून ते वाचले होते . इडापीडा टळली असा भाबड्या मनाला धीर होता . आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची ` एक्झिट ' ची लाल अक्षरे पेटावी , आणि ` म्हणजे एवढ्यात संपला चित्रपट ? ' असे म्हणता म्हणता ` समाप्त ' अशी प़डद्यावर पाटी यावी , असेच काहीसे घडले . त्या अज्ञात ऑपरेटरने कुणाच्या जीवनकथेची ` समाप्त ' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?

मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते , "" मित्रा ,अशी मेफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे . "" आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?
शब्द : - 5127