तुझ्या-माझ्या सवे कधी गायचा पाउसही - संदिप खरे.....Tuzya Mazya save Kadhi - Sandip Khare

तुझ्या-माझ्या सवे कधी गायचा पाउसही
तुला बोलावता पोचायचा पाउसही

पडे ना पापणी पाहुन ओले मी तुला
कसा होता नी नव्हता व्हायचा पाउसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाउसही

मला पाहुन ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला शिकवायचा पाउसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाउसही

आता शब्दांवरी फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाउसही...